बेंगळुरू येथे ज्येष्ठ इतिहासतज्ञ व संशोधक यांची बैठक !

एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकांविरुद्धची हिंदु जनजागृती समितीची चळवळ !
खरा इतिहास एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकांत समाविष्ट केला जात नसल्याबद्दल बैठकीत नाराजीचा सूर !

बेंगळुरू, २७ जून (वार्ता.) – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एन्.सी.ई.आर्.टी.) खरा इतिहास शालेय पुस्तकांत समाविष्ट करत नाही, असे सांगत ज्येष्ठ इतिहासतज्ञ व संशोधक यांनी त्या संदर्भात नाराजी व्यक्‍त केली. एन्.सी.ई.आर्.टी.च्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकांविरुद्ध हिंदु जनजागृती समितीने चळवळ उभारली आहे. त्याअंतर्गत समितीने काल ज्येष्ठ इतिहासतज्ञ व संशोधक यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपरोल्लेखित नाराजी व्यक्‍त करण्यात आली.

या बैठकीला प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. एम्. चिदानंदमूर्ती, केंद्रातील रालोआ शासनाच्या कार्यकाळात एन्.सी.ई.आर्.टी.मध्ये काम केलेले आणि सध्या कर्नाटक शासनाच्या `गॅझेटीयर’चे मुख्य संपादक असलेले प्रख्यात इतिहासतज्ञ श्री. सूर्यनाथ कामत, बेंगळुरू येथील आय.आय.एस्.मधील संशोधक वैज्ञानिक श्री. शतावधानी गणेश अन् इतिहासाची अनेक पुस्तके लिहिलेले इतिहासतज्ञ श्री. एन्.एस्. राजाराम हे उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्याचे समन्वयक श्री. मोहन गौडा यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एन्.सी.ई.आर्.टी.ने) शालेय पुस्तकांतून विकृत इतिहास समाविष्ट केल्याच्या विरोधात सुरू असलेल्या चळवळीबद्दल माहिती दिली. समितीचे कार्यकर्ते श्री. शिवानंद प्रभू यांनी बैठकीचा उद्देश सांगितला. या प्रसंगी हिंदु जनजागृती समिती शालेय पुस्तकांतील विकृत इतिहास बदलण्यासाठी घेत असलेल्या परिश्रमाबद्दल सर्व इतिहासतज्ञ व संशोधक यांनी समितीचे कौतुक केले. “शालेय इतिहासाच्या पुस्तकांतील आक्षेपार्ह भाग काढून त्याजागी कुठला घ्यायचा, हे आम्ही जरूर सांगू”, असे या सर्वांनी या वेळी सांगितले.

सध्याच्या इतिहासाच्या पुस्तकांतील वर्णाश्रमव्यवस्थेविषयीची माहिती चुकीची ! – डॉ. एम्. चिदानंदमूर्ती
या प्रसंगी डॉ. एम्. चिदानंदमूर्ती म्हणाले, “सध्या इतिहासाच्या पुस्तकांत दिलेली वर्णाश्रमव्यवस्थेची माहिती चुकीची आहे. त्या माहितीत `वर्णाश्रमव्यवस्था म्हणजे जाती’, असे सांगत ब्राह्मण व शूद्र यांच्यात दरी उत्पन्न केली आहे. त्याऐवजी योग्य माहिती पुस्तकात अंतर्भूत केली पाहिजे. महिलांचे सैन्यदल निर्माण करून शत्रूच्या विरुद्ध लढणार्‍या बेलावदी मल्लमा यांच्यासारख्या थोर स्त्रियांची नावे इतिहासात घेतली पाहिजेत. थोर संत अल्लमा महाप्रभू, अक्का महादेवी, कनका दास, पुरंदरा दास यांची माहिती इतिहासाच्या पुस्तकांत घेण्यात आलेली नाही.”

वेदांतील थोर विचारांचा पाठ्यपुस्तकांत समावेश आवश्यक ! – सूर्यनाथ कामत
या वेळी श्री. सूर्यनाथ कामत म्हणाले, “एन्.सी.ई.आर्.टी.ने मागे एकदा पुस्तकाची पाने वाढतात, म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भगतसिंग यांची छायाचित्रे शालेय पुस्तकातून वगळली होती. (क्रांतीकारकांचे शौर्य अन् पराक्रम यांचे वावडे असलेली नपुंसकवादी एन्.सी.ई.आर्.टी. ! – संपादक) खरेतर वेदांतील थोर विचारांचा शालेय इतिहासाच्या पुस्तकांत समावेश असणे आवश्यक आहे.”

एन्.सी.ई.आर्.टी.च्या पाठ्यपुस्तकांत अर्धवट इतिहास ! – एन्.एस्. राजाराम
हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन शहरे सरस्वती आणि गंगा या नद्यांच्या काठी होती, हे शालेय इतिहासाच्या पुस्तकातून नमूद केले आहे; पण सरस्वती व गंगा या नद्यांचे महत्त्व त्यातून वगळले आहे. औरंगजेबाने `जिझिया’ कर लागू केल्याचे पुस्तकात आहे; पण त्या कराचा हेतू वगळण्यात आला आहे, असा हा अर्धवट इतिहास आहे, या शब्दांत इतिहासतज्ञ एन्.एस्. राजाराम यांनी त्यांचा संताप व्यक्‍त केला.

पाठ्यपुस्तकांतून संस्कृत भाषेची माहिती वगळणे चुकीचे ! – शतावधानी गणेश
`ब्राह्मणाची भाषा’, असे सांगत पाठ्यपुस्तकांतून संस्कृत भाषेची माहिती वगळणे, हे चुकीचे आहे; कारण पूर्वीच्या काळी ती सगळयांची भाषा होती. श्री बसवण्णा यांच्या वेळी संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारे शूद्र होते, असे उद्‌गार श्री. शतावधानी गणेश यांनी या प्रसंगी काढले.

निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती

ज्यांना रामदासस्वामी, दादोजी व पुरंदरे मान्य नाहीत, ते छत्रपती शिवराय व महाराष्ट्राचे शत्रू ! – बाळासाहेब ठाकरे

असे बोलण्याचे धाडस शिवसेनाप्रमुखांच्या व्यतिरिक्‍त कोणीच का दाखवत नाही ?

मुंबई, १ जून (वार्ता.) – आजही जी मंडळी शिवरायांचे स्मारक करू इच्छित आहे, ती कुठेही शिवरायांच्या मूलभूत कार्याचा उल्लेख करू इच्छित नाही. त्यांना दादोजी कोंडदेव मान्य नाहीत. त्यांना समर्थ रामदास मान्य नाहीत. त्यांना आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेही मान्य नाहीत. असा विचार करणारे जातीयवंत मराठेच शिवाजीचे व महाराष्ट्राचे शत्रू आहेत, असे प्रतिपादन शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज `सामना’च्या संपादकीयातून केला आहे. या संपादकीयात श्री. ठाकरे यांनी मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे !

आम्हाला अभिप्रेत असलेले हिंदवी स्वराज्य, हे नाही !
मुंबईच्या अरबी समुद्रात शासन भव्य शिवस्मारक उभे करीत आहे. त्या निमित्ताने महाराष्ट्रातील काही `मराठे’जनांनी शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांना विरोध सुरू केला. श्री. पुरंदरे हे ब्राह्मण असल्यानेच त्यांना सुरू असलेला हा विरोध महाराष्ट्राच्या इभ्रतीला व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला शोभणारा नाही. स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून बाबासाहेब पुरंदरे यांना काढा नाहीतर शिवशाहिरांवर हल्ला वगैरे करण्याच्या धमक्या काही जातीयवादी मराठा संघटनांनी दिल्या आहेत. `स्मारक’प्रश्‍नी हात एकमेकांना उखडून टाकण्यासाठीच उठणार असतील, तर छत्रपती शिवरायही `मराठी माणसांचे थडगेच या जातीयतेने उभे रहाणार असेल, तर कृपा करून माझ्या नावाचा वापर करून ते बांधले जाऊ नये. आम्हाला अभिप्रेत असलेले `मराठा साम्राज्य’ व `हिंदवी स्वराज्य’ हे नाही’, असे म्हणतील.

देशावरील परचक्रांना विरोध न करता पुरंदरेंना संपवण्याची भाषा, हा षंढपणा !
शिवरायांच्या वेळी मोगल बादशहांचे परकीय राज्य चालविणार्‍यास अनेक स्वकीय वर्ग व घराणी मदत करीत होती. साडेतीनशे वर्षांनंतर महाराष्ट्रात व हिंदुस्थानातही तोच इतिहास परत घडत आहे. परदेशी बाईला दिल्लीत मुजरे झडत आहेत. महाराष्ट्रातील लाचार वतनदारांनी स्वाभिमान खुंटीला टांगून पदे मिळविली आहेत. इस्लामचे अतिरेकी परचक्र धडका मारत आहे. `सिमी’च्या हातात हात घालून देशाचे इस्लामीकरण सुरू आहे. त्याविरोधात `ब्र’ न काढणारे व या परचक्राविरोधात लढण्याची भाषा न करणारे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना संपवण्याची भाषा करतात, हा षंढपणा व नादानपणाच आहे.

काँग्रेसचे शिवप्रेम निवळ एक ढोंग !
जे लोक शिवस्मारकाचे उद्घाटन घाईघाईने उरकण्याचा डाव रचत आहेत, त्यांचे शिवप्रेम निवळ एक ढोंग आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस राजवटीने आतापर्यंत कुठच्या ऐतिहासिक स्थळांची, विशेषत: शिवछत्रपतींच्या ऐतिहासिक स्थळांची दखल घेतली ? शिवछत्रपतींचा जिथे राज्याभिषेक झाला, त्या रायगडवरील वाड्याची छपरे उडून गेली व माळावरचा महाराजांचा पुतळा उघड्यावरच आहे. पुरातन खात्याच्या अक्षम्य दायित्वशून्यतेचा हा साक्षात नमुना आहे. मग समुद्रातील स्मारकाचा नारळ फोडण्याची व त्यानिमित्ताने जातीयवादाचे फुत्कार सोडण्याची एवढी घाई कशासाठी ?

शिवचरित्राचा जनताभिमुख भाग झाकण्याचा इंग्रजांप्रमाणेनच काँग्रेजींचा प्रयत्‍न !
काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी छत्रपतींचे स्मारक जणू निवडणुकीत प्रचारात वापरायचे एक `प्यादे’ आहे. ठीक आहे, तुमची प्यादी तुम्ही चालवा; पण त्यासाठी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंविरुद्ध विखारी चळवळी राबवून महाराष्ट्रात प्रदूषण पसरवण्याची गरज काय ? जे जातीयवादी लोक `मराठे’पणाचा आव आणत आहेत, त्यांना शिवराय समजलेच नाहीत. याच काँग्रेसवाल्यांच्या `बापजाद्यांनी’ आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना चोर, लुटारू व दरोडेखोर ठरवलेच होते व शिवाजी हे राष्ट्रपुरुष नसल्याची आरोळीही काँग्रेसवाल्यांनी ठोकली होती. त्या नतद्रष्टांना शिवरायांचा जो पुळका आला आहे, तो हास्यास्पदच आहे. या दोन्ही काँग्रेसवाल्यांनी खरोखरच शिवचरित्र वाचले असते, तर आज महाराष्ट्राची ही अशी दशा झाली नसती. शिवचरित्राचा जनताभिमुख भाग झाकून ठेवण्याचा जसा इंग्रजांनी प्रयत्‍न केला, तसाच त्यांच्यानंतर आलेल्या काँग्रेजी बगलबच्च्यांनीही केला.

तळेगाव शहर मराठा युवा दलाच्या वतीने खेडेकर, मेटे व दलवाई यांच्या पुतळयाचे दहन
तळेगाव दाभाडे, १ जून – महाराष्ट्र शासनाच्या शिवस्मारक समितीच्या अध्यक्षपदाच्या संदर्भात शिवशाहीर श्री. बाबासाहेब पुरंदरे यांच्याविषयी अनुद्‌गार काढल्याने संतप्‍त झालेल्या तळेगाव शहर मराठा युवा दलाच्या कार्यकर्त्यांनी पुरुषोत्तम खेडेकर, विनायक मेटे व हुसेन दलवाई यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे नुकतेच दहन केले. या वेळी येथील शाळा चौकातून निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी संभाजी ब्रिगेड व त्यांचे नेते आणि दलवाई यांच्या विरोधात घोषणा देत मोर्चा काढण्यात आला.