मनसे करणार `मराठी भाषा अकादमी’ची स्थापना

श्री. प्रशांत कोयंडे, मुंबई
मुंबई, २८ फेब्रुवारी – महाराष्ट्रासह मराठी बांधवांच्या उत्कर्षाचे ध्येय समोर ठेवून स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेची सर्वत्र होणारी अवहेलना थांबवण्यासाठी व मराठीला पुढे नेण्यासाठी `मराठी भाषा अकादमी’ची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.

(`अकादमी’ हा शब्द `अँकॅडमी’ या इंग्रजी शब्दाचे भ्रष्ट रूप आहे. तरी मराठी भाषाप्रेमी मनसे मराठीच्या उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेचे नाव शुद्ध मराठीत करेल काय ? – संपादक) याबाबतची माहिती काल पक्षाने सुरू केलेल्या www.manase.org या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संकेतस्थळाचे उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या हस्ते काल वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात करण्यात आले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्‍न करणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी या वेळी सांगितले. या संकेतस्थळाचे काम पुणे येथील श्री. अनिल शिदोरे हे पहात आहेत. मराठी भाषेविषयी कार्य करू इच्छिणार्‍या संस्था व व्यक्‍ती या अकादमीच्या अधिक माहितीविषयी श्री. शिदोरे यांना संपर्क करू शकतात. संपर्क : श्री. अनिल शिदोरे (०२०) २६०५९२८२/८३

मनसेच्या मराठी भाषा अकादमीचा हेतू
भाषा टिकली, तर समाज टिकतो आणि समाज टिकला, तर तो पुढे जातो. त्यामुळे मराठी भाषा जपण्याची आणि तिचा वापर समाजव्यवहारात वाढवण्याची आवश्यकता आहे. हे काम एखाद्या विशिष्ट संस्थेने सातत्याने करण्याची गरज आहे. त्यासाठी मराठी भाषा अकादमी आहे, असे या संकेतस्थळावर म्हटले आहे.

संकेतस्थळाचे ध्येय
या प्रस्तावित अकादमीच्या माध्यमातून मराठी भाषेविषयी विविध प्रकारचे संशोधन करणे, व्यावहारिक मराठीचा विकास करणे, विविध ज्ञानशाखांतील शब्दांना सुलभ पर्यायी मराठी शब्द सुचवणे आणि ते रूढ करणे, सुलभ मराठी शिकवण्यासाठी अभ्यासक्रम तयार करणे आणि ते अभ्यासक्रम चालवणे, तसेच सर्व ठिकाणी मराठीचा वापर सतत होत रहाण्यासाठी अविरत प्रयत्‍न करणे, जिथे जिथे मराठी भाषेची गळचेपी होत असेल, त्या त्या ठिकाणी त्या विषयात संशोधन करून तेथील चळवळींना मदत करत रहाणे, असे ध्येय ठेवण्यात आल्याचे या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.

मनसे लोकसभेच्या जागा स्वबळावर लढवणार
मनसे येत्या निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाशी युती न करता स्वबळावर लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे श्री. ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच आपण स्वत: कधीही निवडणूक लढवणार नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.

Leave a Reply