दोषी (?) पोलीस हवालदार तडकाफडकी निलंबित !
केवळ मुसलमानांच्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत संवेदनशील असलेली व हिंदूंच्या श्रद्धास्थानांबाबत सनदशीर आंदोलन करणार्या धर्माभिमान्यांना ठेंगा दाखवणारी काँग्रेस हिंदूंवर राज्य करण्याच्या लायकीची आहे का ?
मुंबई, २७ फेब्रुवारी (वार्ता.) – रस्त्यावरील फेरीवाल्यांना हटवतांना कुराणाची प्रत पायदळी तुडवल्याच्या गैरसमजातून आज सकाळी राबोडी (ठाणे) परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही बातमी वार्यासारखी पसरल्याने या परिसरात या घटनेचा निषेध करण्यासाठी काही काळ दुकाने बंद करण्यात आली. पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच या प्रकरणातील दोषी पोलीस कर्मचार्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
(हीच तत्परता हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे विडंबन करणार्याविरुद्ध पोलीस का दाखवत
नाहीत ? – संपादक) वातावरण बिघडू नये, यासाठी परिसरात राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. राबोडी येथील तपासे नगरमधील जामा मशिदीत नमाजासाठी मुसलमानांची गर्दी होती. या मशिदीपासून काही अंतरावरच फेरीवाल्यांनी आपली दुकाने थाटली होती. या फेरीवाल्यांचे अतिक्रमण हटवतांना एका गाड्यावर धार्मिक पुस्तके विकणार्या पुस्तक विक्रेत्याला पोलीस कर्मचारी आजदे यांचा जोरदार धक्का लागला. त्यातच कुराणाची एक प्रत खाली पडली. त्यावर आजरे यांचा घाईगडबडीमध्ये पाय पडल्याची बातमी पसरली. त्यामुळे काही क्षणातच मशीद परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांनी हळूहळू दुकानेही बंद केली. त्यानंतर पोलीस आयुक्त अनिल ढेरे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्थानिकांची समजूत काढून त्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. आता तेथील परिसरातील परिस्थिती निवळली असून नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस हवालदार आजदे यांना निलंबित करण्यात आले असून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.


