जनहो, तुम्हाला पोलिसांनी दिलेल्या अन्यायकारक वागणुकीचा सूडाग्नी योग्य वेळ येईपर्यंत धगधगत ठेवा !
हिंदु जनजागृती समिती मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार !
पुणे, २९ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समिती विविध संघटनांच्या सहकार्याने गेल्या सहा वर्षांपासू्न `राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ ही चळवळ राबवत आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून यंदा २६ जानेवारी रोजी समितीचे चार कार्यकर्ते राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या उद्देशाने तक्रार दाखल करण्याकरता शुक्रवार पेठ पोलीस चौकीत गेले असता पोलिसांनी त्यांना बेदम मारहाण करत त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले व त्यांना अटक केली. (आपण पोलीस आहोत, म्हणजे जनतेशी कसेही वागले, तरी चालेल, असे पोलिसांना वाटते कि काय ? जनतेने घाम गाळून भरलेल्या करांतून पोलीस पगार घेतात व ते जनतेचे मालक नव्हे, तर सेवक आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)
पोलिसांनी दिलेल्या या अन्याय्य वागणुकीच्या विरोधात समिती पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकार्यांकडे तक्रार केली असून मानवाधिकार आयोगाकडेही दाद मागणार असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी पत्रकारांना सांगितले.
पोलिसांवर कारवाई करण्यासाठी आंदोलनाचा हिंदुत्ववाद्यांचा इशारा
या घटनेचा हिंदु जनजागृती समितीसह अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आज जाहीर पत्रकार परिषदेत तीव्र निषेध केला. येत्या ७ दिवसांत कार्यकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्यांना मारहाण करणार्या सर्व पोलिसांवर कडक कारवाई न केल्यास व्यापक जनआंदोलन छेडण्याचा इशारा या पत्रकार परिषदेत देण्यात आला. त्याचबरोबर प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची बेकायदेशीर विक्री करणार्या दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणीही या परिषदेत करण्यात आली.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पुणे व नगर जिल्ह्याचे प्रवक्ते श्री. सुनील घनवट, पुणे जिल्हा समन्वयक श्री. सारंग अकोलकर, समस्त हिंदु आघाडीचे अध्यक्ष श्री. मिलिंद एकबोटे, भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक श्री. अनिल शिरोळे, भाजपचे शहर उपाध्यक्ष श्री. संदीप खर्डेकर, सनातन संस्थेचे श्री. शंभू गवारे, शिवसेनेचे श्री. सुनील जाधव, प्रतापगड उत्सव समितीचे श्री. राज यादव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर प्रवक्ते श्री. नवनाथ बांदल व हिंदु एकता आंदोलनाचे अधिवक्ता राजीव देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी या घटनेत प्रत्यक्ष उपस्थित असणारे समितीचे श्री. सुनील घनवट यांनी सर्व घटनाक्रम उपस्थितांसमोर मांडला.
हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांत एकजूट
पुणे येथे हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी केलेल्या निघृण मारहाणीचे पडसाद हिंदुत्ववादी संघटनांत उमटले. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत डावीकडून सर्वश्री मिलिंद एकबोटे, सुनील घनवट, सारंग अकोलकर, अँड्. राजीव देशपांडे, नवनाथ बांदल.
या वेळी संदीप खर्डेकर व अनिल शिरोळे हेही उपस्थित होते .
पोलीस उपायुक्त खैरे यांच्याकडे तक्रार दाखल
पोलिसांच्या या अन्यायाच्या विरोधात समितीने काल परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त श्री. चंद्रकांत खैरे यांच्याकडे तक्रार केली. या वेळी श्री. खैरे यांनी येत्या ७ दिवसांत दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन समितीच्या शिष्टमंडळाला दिले. या तक्रारीची प्रत राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, पुणे जिल्हाधिकारी व पुणे शहर पोलीस आयुक्त यांना पाठवण्यात आली आहे.
पोलिसांची निष्क्रीयता निषेधार्ह !
आपल्या पोलीस ठाण्याच्या किंवा चौकीच्या कार्यक्षेत्रात घडणार्या गुन्ह्यांबाबत पोलीसच जागरूक असायला हवेत व ते गुन्हे त्यांच्या लक्षात आले पाहिजेत. असे असतांना तसे पोलिसांकडून होत तर नाहीच; पण कोणी जागरूक नागरिक गुन्ह्यांसंदर्भात तक्रार घेऊन आल्यास त्यांना अशा पद्धतीची चुकीची वागणूक दिली जाते, हे निषेधार्ह आहे.
या प्रकरणी धर्माभिमानी हिंदू, तसेच समस्त लष्कर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व अधिवक्ता श्री. प्रशांत यादव यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना कायदेशीर मदत केली. (हिंदु जनजागृती समितीच्या सदस्यांच्या मदतीसाठी धावून येणारे धर्माभिमानी व अधिवक्ता श्री. प्रशांत यादव यांचे अभिनंदन ! त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. – संपादक)



