मंगळुरू, २७ जानेवारी (वृत्तसंस्था) – शहरात श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी पबमध्ये अश्लील अंगविक्षेप करत नाचणार्या तरुणींना हिसका दाखवल्यावर या संघटनेचे संस्थापक श्री. प्रमोद मुतालिक यांना अटक करण्याची मागणी होती. या दबावाला अखेर बळी पडून राज्यातील भाजप शासनाने श्री. मुतालिक यांना बेळगावमध्ये अटक केली.
(राज्यात पबसारख्या माध्यमातून नैतिकतेचे अध:पतन होत असतांना त्याच्या विरोधात कृती करण्याऐवजी श्री. मुतालिक यांना अटक करून भाजपही आता काँग्रेसच्या वाटेने जात आहे, हे दिसून येते ! – संपादक) मात्र श्री. मुतालिक यांना पब प्रकरणात अटक करण्यात आली नसून धार्मिक सलोखा बिघडवण्याच्या जुन्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. (यावरून श्री. मुतालिक यांना झालेली अटक ही दबावापोटी आहे, हे सिद्ध होते ! – संपादक) आज पबमध्ये तरुणींना मारहाण केल्याच्या प्रकरणात श्रीराम सेनेचे उपाध्यक्ष श्री. प्रसाद अट्टवार यांच्यासहीत १० जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे. (हिंदूंनो, शासन कोणाचेही असले, तरी धर्मरक्षणासाठी प्रस्थापित राज्यकर्त्यांविरुद्ध लढावेच लागेल, हे जाणा ! – संपादक) देवांगेरे येथे श्री. मुतालिक यांच्या विरोधात एक प्रकरण प्रलंबित होते. त्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली, अशी माहिती बेळगावच्या पोलीस अधीक्षक श्रीमती सोनिया नारंग यांनी दिली. श्री. मुतालिक यांना मंगळुरूमधील पबप्रकरणामध्ये अटक का करण्यात आली नाही, असे विचारल्यावर त्या म्हणाल्या, “या प्रकरणात त्यांना अटक करण्याबाबत मंगळुरूमधून काहीही सूचना मिळाली नाही. अशी सूचना मिळाल्यास त्यांना त्या न्यायालयात हजर करण्यात येईल.” धार्मिक सलोखा बिघडल्याच्या प्रकरणात श्री. मुतालिक यांच्या विरोधात देवांगगेरे येथे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना देवांगगेरे येथील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पबमध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या वेळी श्री. मुतालिक राज्याच्या बाहेर होते. त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कृत्याचे त्यांनी समर्थन केले होते; मात्र झालेल्या प्रकाराबद्दल क्षमाही मागितली आहे.


