समविचाराने एकत्र आणि शक्ती एकवटून लढायचे ठरवल्यासच सेनादलांना अधिक बळ प्राप्त होईल !
गुरुवारी भारताच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांची अधिवेशने सुरू झाली. मुंबईवर नोव्हेंबरात दहा पाकिस्तानी म्हणजेच इस्लामी आतंकवाद्यांनी आक्रमण करून २०० निरपराध नागरिकांना ठार मारले. ४०० माणसांना घायाळ केले आणि प्रचंड भीतीचे साम्राज्य निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. त्या पार्श्वभूमीवर सर्व संसदसदस्य एकत्र जमले. त्यांनी एकजुटीने आतंकवादाशी झुंज घेण्याचा निर्णय घेतला. आपापसांत भांडून समान राष्ट्रीय संकटाच्या वेळी शक्ती फुकट घालवू नये, हा शहाणपणा सगळयांना सुचला, हे सुचिन्ह म्हणता येईल. दुर्योधनाने एकदा अतीप्रसंग केला, तेव्हा विराट राजाने त्याला आणि त्याच्या सैन्याला झोडपून बंदी केले. त्या वेळी त्यांना सोडवण्याच्या प्रश्नावरून पांडवांत साहजिकच मतभेद झाले; कारण दुर्योधन पांडवांशी नेहमीच कपटकारस्थाने करून वागला होता; परंतु युधिष्ठिराने समजावले की, आपापसांत भांडतांना कौरव शंभर आणि पांडव पाच असले, तरी तिसरा आपल्यापैकी कोणाशीही लढत असेल, तेव्हा आपण एकशेपाच होऊन त्याचा पराभव केला पाहिजे. `वयं पंचाधिक शतम्’ असे उद््गार त्या वेळी युधिष्ठिराने काढले होते. त्यांचा पुनरुच्चार काही सदस्यांनी केला, हे चांगले झाले. परक्याला घरात घेऊन आपापसांतील भांडणात त्याला मध्यस्थी करायला सांगायची वाईट सवय हिंदूंना आहे. या वेळी सगळयांनी समविचाराने एकत्र येऊन आणि शक्ती एकवटून लढायचे ठरवले असल्याने भारतीय सेनादलांना अधिक बळ प्राप्त होणार आहे. शक्ती ही साधनांपेक्षा इच्छाशक्तीत वस्ती करून असते, इच्छाशक्ती सदैव तेजस्वी आणि चिरंजीव राहिली पाहिजे. यासाठी तिला अधूनमधून पाणी दिले पाहिजे. धार लावली पाहिजे. ती वेळ ही आहे. त्यासाठी पंतप्रधानांचे एक विधान तपासून पाहू.
इस्लामची सेवा करणे, हेच भारताचेही उद्दिष्ट आहे, असे दाखवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न !
मुंबईवर पाकिस्तानी आतंकवादी तरुणांनी जो प्राणघातक हल्ला केला, तो भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला होता, असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले. हे विधान वस्तूस्थितीला सोडून आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. सत्याच्या जेवढे जवळ जाता येईल, तेवढे नेतृत्वाने गेले पाहिजे. शक्तीला ज्ञानाचे अधिष्ठान असेल, तर शत्रूदमन योजना अचूकपणे आखता येते. पाकिस्तानला भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर आघात करून समाधान होणार नसून त्यापेक्षा अधिक काहीतरी करायचे आहे. पाकिस्तानला संपूर्ण भारत इस्लाममय करायचा आहे, पाकिस्तानचे हे उद्दिष्ट सफल होऊ द्यायचे नसेल, तर इस्लामपेक्षा चांगले असे भारताजवळ आहे, असा विश्वास भारतात रहाणार्या लोकांना दिला गेला पाहिजे; परंतु भारत सरकार अगदी उलट्या पद्धतीने वागत आहे. काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाचे सरकार पाकिस्तानची नेहमी खात्री पटवण्याचा प्रयत्न करत असते की, पाकिस्तानचे जेवढे इस्लामवर प्रेम आहे, त्यापेक्षा भारताचे इस्लामवरील प्रेम मुळीच कमी नाही; म्हणून पाकिस्तानने भारताशी लढू नये. असे नुसते सांगून भारत सरकार आणि काँग्रेस पक्ष थांबत नाही, तर प्रत्यक्ष कृतीने इस्लामची सेवा करणे, हे भारताचेही उद्दिष्ट आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात येत असतो. पाकिस्तान आणि भारतातील मुसलमान या दोन वेगळया गोष्टी आहेत. असे काँग्रेस पक्ष मानीत नाही. भारतातील मुसलमानांच्या मागण्या सारासार विचार न करता आणि देशहिताकडे दुर्लक्ष करून मान्य करण्याचे धोरण ठेवले की, पाकिस्तानचे समाधान होईल आणि तो भारताशी स्नेहपूर्ण वर्तन ठेवेल, अशी आशा काँग्रेसला आहे. मुसलमानांच्या मागण्या कितीही भयंकर असल्या, तरी त्या मान्य करण्यातच हिंदूंचे आणि भारताचे हित आहे, असा विचार करण्याची सवय काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळीत लावल्याने हिंदूंचा शक्तीपात होऊन पाकिस्तान निर्माण झाले; परंतु युधिष्ठिराला द्युताच्या व्यसनाची नशा चढली होती. तशी काँग्रेसला हिंदु-मुस्लीम ऐक्याची नशा गांधीयुगात चढवण्यात आली. भारत स्वतंत्र झाल्यावरही काँग्रेसने आपल्या सवयी बदलल्या नाहीत. भारतातील मुसलमानांना प्रसन्न ठेवले की, पाकिस्तान प्रसन्न राहील, असा सिद्धांत काँग्रेसने मांडला. तो सिद्धांत कृतीत उतरवतांना पाकिस्तानला प्रिय असलेली गोष्ट केली की, भारतातील मुसलमान प्रसन्न होतील, असा उपसिद्धांत मांडण्यात आला. परिणामी हिंदूंना वार्यावर सोडण्यात आले.
धर्मनिरपेक्षतेचे एकही तत्त्व कार्यवाहीत न आणल्याने भारतातील मुसलमानांना काँग्रेस देशभक्त करू शकली नाही !
पाकिस्तानने मुंबईवर आतंकवादी हल्ला केला आणि भारताची धर्मनिरपेक्षता धोक्यात आणली, हे पूर्ण सत्य नसून धर्मनिरपेक्षतेचे एकही तत्त्व कार्यवाहीत न आणल्याने भारतातील मुसलमानांना काँग्रेस देशभक्त करू शकली नाही, त्यामुळे पाकिस्तानला हल्ला करणे अतिशय सोपे झाले. असलेच तर हे पूर्णसत्य आहे. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्वज्ञान जगात जसे मांडले जाते, त्यापेक्षा अगदी उलटे तत्वज्ञान भारतात मांडले जाते. धर्मनिरपेक्षतेची पहिली अट अशी आहे की, निर्बंधासमोर म्हणजे कायद्यासमोर सर्व समान असतात. त्या त्या देशाची संसद जे कायदे करते, ते सगळयांना पाळावे लागतात. एखाद्या विशिष्ट धर्ममताचे लोक आपल्या धर्मग्रंथातील वचने उद्धृत करून ती श्रेष्ठ आहेत आणि आम्ही त्यांचेच पालन करणार असून संसदेला आम्ही जुमानीत नाही, असे म्हणू शकत नाहीत; परंतु भारतात तसे स्वातंत्र्य मुसलमानांना आहे.
मुसलमानांच्या अवास्तव मागण्या मान्य करणे, ही काँग्रेस सरकारची धर्मनिरपेक्षता !
शहाबानो नावाच्या मुसलमान बाईला घटस्फोटानंतर नवर्याकडून पोटगी मिळाली पाहिजे, असा आदेश न्यायालयाने दिला; परंतु तो मुसलमानानांनी मानला नाही. घटस्फोटाने टाकून दिलेल्या बाईला पोटगी द्या, असे आमचा धर्म आम्हाला सांगत नाही, असे मुसलमानांनी दरडावून सांगितले आणि लढाईच्या पवित्र्यात ते मैदानात उतरले. त्याबरोबर काँग्रेस सरकार घाबरले. नेहरूंचे नातू आणि राहुल गांधीचे पिताश्री राजीव गांधी तेव्हा पंतप्रधान होते. त्यांनी लोटांगण घातले. मुसलमानांना शरीयतप्रमाणे भारतात सुखाने आणि निर्भयपणे जगता येईल, न्यायालयाचे आदेश मानण्याचे त्यांच्यावर बंधनकारक नाही, असे आश्वासन राजीव गांधींनी दिले. तसे विधेयक संसदेत पारित करून घेतले. राजीव गांधींनी न्यायालयाची प्रतिष्ठा राखली नाही. स्त्रीजातीचे अश्रू पुसले नाहीत. उलट भारताच्या संसदेला वेसण घालून त्यांनी तिला मुसलमानांच्या पडवीत बांधून टाकले. मुसलमानांच्या हिताविरुद्ध विधेयक पारित होणार नाही, हे त्यांनी जगप्रसिद्ध केले. भारतावर पाकिस्तानी आतंकवादी शेवटी हल्ला करतात. आधी हल्ला भारतातील मुसलमान करतात. त्यांच्या अवास्तव मागण्या काँग्रेस सरकार मान्य करते. अशा वर्तनालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात. काँग्रेसच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणाने पाकिस्तानला हल्ला करण्यास प्रोत्साहन मिळते; म्हणून `कायद्यासमोर मुसलमान धरून सर्व समान’ हे तत्त्व काँग्रेसने मान्य केले पाहिजे. भारतात शरीयतचे नाही, तर संसदेचे राज्य चालेल, असे मनमोहनसिंग सरकारने घोषित केले पाहिजे. काँग्रेस आणि सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. तर त्यांनी देशभर समान नागरी संहिता लागू करण्याचे विधेयक संसदेत आणले पाहिजे. भारतातील मुसलमानांनी समान नागरी संहिता मान्य केल्यास पाकिस्तानचे निम्म्याहून अधिक सामर्थ्य कमी होईल.


