मुंबई, ३० डिसेंबर (वार्ता.) – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर २० दिवस पाकिस्तानसोबत शाब्दीक युद्ध करणार्या भारत शासनाला जर खरोखरच दहशतवाद नष्ट करण्यासाठी युद्ध करायचे असेल, तर आताच करावे, मार्चपर्यंत हिमालय पर्वत रांगांवर व चीनच्या दिशेने असलेल्या भारतीय सीमेवर बर्फ जमा झाल्याने युद्धात चीनकडूनचा धोका नसेल. मार्चनंतर भारताला युद्धाचा पर्याय महागात पडेल, असे मत निवृत्त मेजर जनरल ई. डिसुझा यांनी `दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना व्यक्त केले.
भारताची युद्धसज्जता पाकिस्तानपेक्षा अधिक असली, तरी चीनच्या तुलनेत ती कमीच आहे. पाकिस्तान व चीन हे दोघेही भारताचे शत्रू आहेत. त्यामुळे चीनचा पाकिस्तानला जाणीवपूर्वक पाठिंबा आहे; म्हणून भारताला युद्धाचा पर्याय निवडतांना तो आताच लवकरात लवकर स्वीकारायला हवा. आता नाही, तर कधीच नाही. चीनला थोपवण्यासाठी हीच वेळ अनुकूल आहे. बर्फामुळे चीनला आक्रमण करणे अवघड होणार आहे, यापूर्वीही आम्ही `ऑपरेशन पराक्रम’ करण्यासाठी जानेवारी महिन्याचीच वेळ निवडली होती, असेही निवृत्त मेजर जनरल डिसुझा म्हणाले. निवृत्त मेजर जनरल डिसुझा पुढे म्हणाले की, हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडे केलेल्या मागण्यांकडे पाकिस्तानने आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे. पाकिस्तानला धडा शिकवला नाही, तर जनता जोडे मारील, याची जाणीव झाल्याने केंद्रशासनाने युद्धाची तयारी सुरू केल्याची चिन्हे दिसत आहेत; परंतु अद्याप ठोस काही आढळून येत नाही. संरक्षणमंत्र्यांनी नुकतीच देशातील सुरक्षा समितीची बैठक घेतली. या बैठकीने युद्धाची शक्यता बळावत असल्याचे संकेत दिले. शस्त्रास्त्रांमध्ये भारत, तर राजकीय डावपेचांमध्ये पाकिस्तान हुशार आहे. सद्यस्थितीत भारताकडे २ कोटी ५० लाख, तर पाकिस्तानकडे ६ लाख १९ हजार सैन्यबळ आहे. पाकिस्तानने भूदल हे अमेरिका व चीनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विकसित केले आहे, तर भारताने स्वबळावर विकसित केले आहे. ज्यात मशिन गन, रणगाडे इत्यादींचा सामावेश आहे. भारताचे वायुदल हे जगात चौथ्या क्रमांकाचे आहे. त्यात १ लाख ७० हजार सैन्यबळ आहे. ३ हजार ३८२ लढाऊ विमाने आहेत. `मिराज’ व `सुखोई’ या आधुनिक तंत्रज्ञानांच्या लढाऊ विमानांचा समावेश यात आहे. हीच वरचढ अवस्था नौदलाबाबतही आहे. नौदलाच्या सामर्थ्याच्या तुलनेत पाकिस्तान भारताशी कुठेच बरोबरी करू शकत नाही. असे असले, तरी क्षेपणास्त्र आणि अणूबाँब या दोन महत्त्वाच्या शस्त्रास्त्र स्पर्धेत पाकिस्तानने भारताशी सतत बरोबरी केलेली आहे; कारण येणार्या काळात होणार्या युद्धात केवळ ही दोन प्रकाराची शस्त्रास्त्रे महत्त्वाची भूमिका बजावणारी आहेत. त्यामुळे पारंपरिक युद्धनीतीपेक्षा आधुनिक युद्धनीती विकसित करण्याकडे पाकिस्तान अधिक प्रयत्नशील होता, हे यातून सिद्ध होत आहे. युद्धनीतीमध्ये पाकिस्तान हुशार आहे, याचे भान आतापासूनच भारतीय राज्यकर्त्यांनी ठेवण्याची गरज आहे, असेही निवृत्त मेजर जनरल डिसुझा यांनी सांगितले.


