कोरड्या शपथांनी राष्ट्राभिमान कसा रुजणार !

दहशतवाद निपटण्यासाठी निवळ शपथा नकोत, तर धर्म व राष्ट्र यांसाठी कृतीशील व्हायला हवे !

`मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर समाजाच्या सर्व स्तरांतून ज्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या प्रामुख्याने दोन विचारसरणीत विभागाव्या लागतील; एक मवाळ किंवा निधर्मीवादी आणि दुसरी जहाल किंवा राष्ट्रवादी. या हल्ल्यानंतर अशाच मवाळ विचारसरणीचा पुरस्कार करणारा एक कार्यक्रम नुकताच पुण्यात झाला. `देशाच्या सुरक्षेसाठी नागरी पुढाकार’ या अराजकीय व्यासपिठावर पुण्यातील जागरूक नागरिकांनी एक शपथ घेतली. देशाचा विचार करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येणे, ही नक्कीच स्वागतार्ह बाब आहे आणि अर्थातच आजच्या काळाची ती गरज आहे; परंतु ही शपथ जर आपण बघितली व या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सहभागी व्हायला लावले, ही बाब लक्षात घेतली, तर यातून राष्ट्ररक्षणाच्या दृष्टीने नेमके काय साध्य झाले, असा प्रश्‍न पडतो.

या शपथेतील काही ओळी लक्षपूर्वक बघा – `राष्ट्रीय अस्मिता व सामाजिक एकात्मतेची भावना माझ्या रहाण्याच्या आणि कामाच्या ठिकाणी जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी कायम प्रयत्‍नशील राहीन. संपूर्ण देशात माझ्यासह प्रत्येकाच्या मनात ही भावना रुजली तरच दहशतवादाचा खरा पराभव करता येईल, याची मला जाणीव आहे……’
`राष्ट्रीय अस्मिता’ व `सामाजिक एकात्मता’ या भावना काय बाजारात मिळणार्‍या वस्तू आहेत का कि शपथ घेतली आणि त्या लागोलाग आमच्यात निर्माण झाल्या ? बरे काही जणांमध्ये त्या भावना आल्या तरी त्या प्रत्येकाला इतरांच्यात निर्माण करण्यासाठी काय प्रयत्‍न करायचे, हे केवळ शाब्दीक शपथ घेऊन कसे लक्षात येणार ? बरे हे दोन्ही झाले, तर त्यामुळे `दहशतवादाचा खरा पराभव’ तो कसा होणार ? त्यामुळे मुंबईवरील हल्ल्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी ठिकठिकाणी घेण्यात येणारे हे असे शपथा घेण्याचे कार्यक्रम म्हणजे भारतियांना जी निधर्मीवादाच्या रोगाची लागण झाली आहे व गांधीवादाचे जे भूत त्यांच्या मानगुटीवर बसले आहे, त्याचेच दुष्परिणाम म्हणावे लागतील !

राष्ट्राभिमान निर्माण होण्यासाठी धर्माभिमान हवा !
यातील `माझ्यासह प्रत्येकाने’ ही गोष्ट नक्कीच स्वागतार्ह आहे; मात्र खर्‍या अर्थाने `राष्ट्रीय अस्मिता’ विद्यार्थ्यांसह तुमच्या-आमच्यात निर्माण करायची असेल, तर ती केवळ अशा शाब्दीक बुडबुड्यांनी होणार नाही; त्यासाठी आमची भाषा, संस्कृती, धर्मग्रंथ, परंपरा, इतिहास, आमचे आचार-विचार, चारित्र्य, शौर्य; थोडक्यात म्हणजे आमचा `धर्म’ याचा जाज्ज्वल्य अभिमान आम्हाला हवा. तो आमच्यात कधी निर्माण होईल ? जेव्हा आम्हाला आमच्या (हिंदूंच्या) या सर्व गोष्टींचे अनन्यसाधारण महत्त्व समजेल तेव्हा ! हे महत्त्व कधी समजेल, जेव्हा आपण या सर्व गोष्टींचे प्रत्यक्षात आचरण करू तेव्हा ! म्हणजेच आपल्या संस्कृतीचे आणि धर्माचे आचरण करू तेव्हा ! आणि आज आपल्याला दिसणारे चित्र काय आहे ? या सर्वच गोष्टींचा आपल्यात अभाव आहे. असे असतांना या निधर्मीवाद्यांच्या पठडीत घासून गुळगुळीत झालेल्या `राष्ट्रीय अस्मिता’ आणि `सामाजिक एकात्मता’ यांसारख्या शब्दांच्या शपथा घेतांना त्यांचे गर्भितार्थ लक्षात घ्यावेत, असे पोटतिडकीने सांगावेसे वाटते.
जे माझ्या देशाचे हित, मान, गौरव, उत्कर्ष तेच माझे हित, तोच माझा मान, गौरव आणि उत्कर्ष आणि त्यासाठी प्राणार्पण करण्याची तयारी याला राष्ट्राभिमान म्हणतात. पूर्वी इंग्रजांमध्ये असा राष्ट्राभिमान होता. आपल्याला आपल्या संस्कृतीची महत्ता कळली, तर खरा राष्ट्राभिमान जागृत होईल व या राष्ट्राभिमानाचा देशभर प्रसार झाला तर नाना प्रकारच्या भेदांनी भरलेल्या खंडप्राय देशातही ऐक्य निर्माण होऊ शकेल. ती खरी `सामाजिक एकात्कता’ असेल. नुसते `एकता पाहिजे’, `विविधतेतून एकता’ असे घोष केल्याने ती साध्य होणार नाही.

गांधीवादाचे भूत उतरवल्याशिवाय दहशतवाद नष्ट करता येणार नाही !
जसे आमचे राज्यकर्ते पाकिस्तानच्या तोफगोळयांवर शांतीची कबुतरे आणि सहिष्णूतेत बुडालेले एकतर्फी प्रेमाचे संदेश उत्तरादाखल पाठवत आहेत, तसे आमच्या या निधर्मी देशाचे नागरिक मेणबत्त्या पेटवणे, मानवी साखळया करणे, एकात्मतेच्या प्रतिज्ञा घेणे अशा पोकळ गोष्टी करत आहेत आणि प्रसारमाध्यमे आणि `मुंबई कशी पुन्हा उभी राहिली’ हे निर्बुद्धपणाने सांगत आहेत. या सर्व दहशतवाद्यांशी लाळघोटेपणा करणार्‍या लाचार मानसिकतेच्या कृती आहेत. आपले बाकी सर्व वागणे राष्ट्र व धर्म द्रोहीपणाचे असतांना कोरड्या शपथांनी `दहशतवादाचा खरा पराभव’ कसा करणार ? दहशतवाद ही तातडीने संपवण्याची गोष्ट आहे. गांधीवादाच्या भूताने पछाडलेल्या भारतियांनो, लक्षात घ्या, `दहशतवाद हा नष्ट करूनच संपवावा लागतो !’ त्यासाठी लागते छत्रपतींची आणि स्वातंत्र्यवीरांची मुत्सद्देगिरी, कणखरता, निश्चयात्मकता आणि आक्रमकता !

Leave a Reply