शंकराचार्य जयेंद्र सरस्वती व साधूसंत यांची वंदनीय उपस्थिती
बेंगळुरू, २२ डिसेंबर (वार्ता.) – कामधेनू टेलीफिल्म्स निर्मित
`श्री शंकरा’ या बहुभाषिक धार्मिक दूरचित्रवाहिनीचा उद्घाटन सोहळा कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती, विविध पिठाधीश आणि संत यांच्या वंदनीय उपस्थितीत पार पडला. कर्नाटकचे राज्यपाल श्री. रामेश्वर ठाकूर हे या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या दूरचित्रवाहिनीवर अध्यात्म, संस्कृती व साधना या विषयांवरील कार्यक्रम सादर केले जाणार असून या वाहिनीवरून सनातनचा धर्मसत्संग व हिंदु जनजागृती समितीचा धर्मशिक्षणवर्गही प्रसारित केले जाणार आहेत.
जीवन आनंददायक बनवण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. अध्यात्ममार्गी होतांना अध्यात्माकडे जाती व धर्म आदी दृष्टींनी पाहू नका, असे आवाहन या वेळी कांची कामकोटी पिठाचे जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती व कर्नाटकचे राज्यपाल श्री. रामेश्वर ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या आरंभी उपस्थित साधूसंत, पिठाधीश व राज्यपाल श्री. ठाकूर यांनी कयपंजीने दीपप्रज्वलन केले. पेजावर मठाचे श्री विश्वेशतीर्थ स्वामीजी, आदी चुंचनगिरी पिठाचे श्री बालगंधारनाथ स्वामीजी, सिद्धगंगा मठाचे श्री शिवकुमार स्वामीजी, श्री राघवेंद्र स्वामी मठाचे श्री सुष्मींद्र स्वामीजी, सुत्तूर मठाचे श्री शिवरात्री देशीकेंद्र स्वामीजी, शृंगेरी पिठाचे श्री व्ही.आर्. गौरीशंकर, श्रीवालीपुत्तूर मठाचे श्री शांतगोपारंगा रामानुजजी, स्वर्णावली मठाचे श्री गंगाधरेंद्र सरस्वती महास्वामीजी, अष्टांगयोग विज्ञान मंदिराचे श्री रंगप्रिया स्वामीजी, कांगीनेले पिठाचे श्री निरंजनानंद पुरी महास्वामीजी आणि साबरमती येथील संत श्री आसारामबापू व संत श्री नारायणजी स्वामी आदींची या कार्यक्रमाला वंदनीय उपस्थिती होती. या सर्वांनी श्री शंकरा वाहिनीला शुभाशीर्वाद दिले. कर्नाटकचे गृहनिर्माणमंत्री श्री. कृष्णा शेट्टी, चित्रपट निर्मात्या पार्वताम्मा राजकुमार, ज्येष्ठ विधीज्ञ सल्लागार अधिवक्ते सी.व्ही. नागेश आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. `सनातन प्रभात’ नियतकालिक समूहाचे संपादक श्री. पृथ्वीराज हजारे हे सनातनचे प्रतिनिधी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते. `श्री शंकरा’ या दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम कन्नड, तामिळ, तेलगू व हिंदी या भाषांमध्ये सादर केले जाणार आहेत. ही वाहिनी बेंगळुरूस्थित असल्याने बहुतांश कार्यक्रम कन्नड भाषेतील असतील, अशी माहिती या वाहिनीचे श्री. हरि कृष्णा यांनी दिली.
शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांचे सनातनला शुभाशीर्वाद !
`सनातन प्रभात’ नियतकालिकांचे समूह संपादक श्री. पृथ्वीराज हजारे यांनी या वेळी जगद्गुरु श्री शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांना भेटवस्तू व कन्नड `साप्ताहिक सनातन प्रभात’चा अंक अर्पण करून त्यांचा सन्मान केला. या प्रसंगी स्वामीजींनी सनातनच्या कार्याला आशीर्वाद दिले व श्री. हजारे यांचा श्रीफळ आणि शाल देऊन सत्कार केला.




