डाऊ हद्दपार झाली, आता धर्मद्रोही काँग्रेसला हद्दपार करण्यासाठी वारकर्यांनी कंबर कसावी !
वारकर्यांच्या संघटित शक्तीच्या आविष्काराचा विजय !
हर्षवर्धन पाटील यांची माहिती
पुणे, २१ डिसेंबर (वार्ता.) – आतापर्यंत `डाऊ’चे समर्थन करत आलेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारला वारकर्यांच्या संघटित शक्तीपुढे पुरते झुकावे लागले असून या वादग्रस्त कंपनीला राज्यातून हद्दपार करण्याचा निर्णय अखेर शासनस्तरावर निश्चित झाला आहे. संसदीय कामकाजमंत्री श्री. हर्षवर्धन पाटील यांनी आज श्रीक्षेत्र देहू येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज जन्म चतु:शताब्दी सोहळयानिमित्त अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या वारकर्यांना सांगितले, “डाऊ कंपनीबाबत जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला चांगला निर्णय ऐकायला मिळेल. हा वारकर्यांच्या संघटित शक्तीचा विजय आहे.” असे सांगून श्री. पाटील यांनी `डाऊ’च्या हद्दपारीची अप्रत्यक्षपणे पण तरीही पुरेशा स्पष्ट शब्दांत कल्पना दिली. यावर वारकर्यांनी टाळयांचा कडकडाट केला.
“विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने नियमानुसार कोणतीही घोषणा किंवा आश्वासन मी स्पष्टपणे देऊ शकत नाही”, असे सांगत त्यांनी अधिक माहिती देण्याचे टाळले. याच कार्यक्रमात उपस्थित असणारे वनमंत्री श्री. बबनराव पाचपुते यांना मात्र ही आनंदाची बातमी वारकर्यांना सांगण्यावाचून राहवले नाही; म्हणूनच त्यांनी त्यांच्या भाषणात “मंत्र्यांनी तुम्हाला डाऊविषयी सांगितले. ते मी स्पष्टपणेच सांगून टाकतो”, असे म्हणत “डाऊ हद्दपार झालेली आहे”, असे सांगितले. “सरकारला वारकर्यांची भीती वाटते. वारकरी बरोबर राहिले नाहीत, तर अवघड होईल, हे कळल्यावर डाऊ कंपनी `गूल’ झाली”, असेही ते म्हणाले. (यावरून काँग्रेस शासनाने ही कृती धर्मप्रेमापोटी नव्हे, तर येत्या निवडणुकीत वारकर्यांचा रोष परवडणारा नाही, हे लक्षात घेऊन केलेली आहे. या प्रकरणात काँग्रेसचा हा दांभिकपणा वारकर्यांच्या व समस्त हिंदूंच्या पथ्यावर पडणारा असला, तरी `दांभिकता फार काळ राज्य करू शकत नाही’, हे काँग्रेसने लक्षात ठेवलेलेच बरे ! – संपादक) या वेळी श्री. पाटील यांनी असेही स्पष्ट केले की, संतवीर ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासह सर्व आंदोलकांवरील खटलेही मागे घेण्यात आले आहेत.


