मालेगाव बाँबस्फोटांत आरोपी असलेल्या हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी `अभिनव भारत’ संघटनेच्या अध्यक्षा व हिंदूंच्या तेजस्वी नेत्या श्रीमती हिमानी अशोक सावरकर खंबीरपणे उभ्या आहेत. त्या देशभक्त नथुराम गोडसे यांची पुतणी असून गांधी अभियोगात जन्मठेप झालेले गोपाळराव गोडसे यांच्या कन्या होत. त्यामुळे श्रीमती हिमानी सावरकर यांना बालपणीच हिंदुत्वाचे बाळकडू मिळाले. विवाहानंतर सावरकर कुटुंबात प्रवेश केल्यामुळे त्यांचे संबंध आयुष्य हिंदुत्वाच्या कार्याला समर्पित झाले. या संघर्षमय जीवन जाणून घेण्यासाठी पुणे येथील आमचे प्रतिनिधी श्री. नीलेश कुलकर्णी यांनी त्यांची घेतली असता, श्रीमती सावरकर यांनी व्यक्त केलेले मनोगत !
जन्म व बालपण
माझा जन्म १९४७ साली झाला. १९४८ साली गांधींचा वध झाल्यानंतर माझे वडील म्हणजे गोपाळराव गोडसे यांना तुरुंगात जावे लागले. त्या वेळी माझे वय फक्त १० महिन्यांचे होते. तो वध का झाला वगैरे कळण्याचे वय नव्हते; मात्र समजायला लागल्यापासूनच राजनीती, समाज वगैरे गोष्टी मला कळू लागल्या. माझी आई अत्यंत ध्येयवादी व कष्टाळू. वडील तुरुंगात असतांनाही म्हणजेच संसाराचे एक चाक निखळले असतांनाही तिने आम्हा दोघा बहिणींचे जिद्दीने पालनपोषण केले. मुलींनी सुट्टीत सतत काहीतरी काम केले पाहिजे, त्यांनी स्वस्थ बसू नये, असा तिचा विशेष आग्रह असे. माझे आई-वडील दोघेही अर्थातच तात्यांचे म्हणजेच स्वा. सावरकर यांचे अनुयायी होत. मी पुण्यातून माझे सबंध शिक्षण पूर्ण केले. शाळेत असतांना एकदा मी स्वा. सावरकर यांच्यावर केलेली कविता शाळेच्या एका मासिकात छापून आली. ती मी तात्यांना दाखवल्यावर त्यांनीही मला शाबासकी देऊन प्रोत्साहन दिले. पुढे १९६१ मध्ये त्यांचे स्वा. सावरकरांशी एका सभेनिमित्त प्रत्यक्ष संभाषणही झाले. मला खरे तर डॉक्टर व्हायचे होते; मात्र त्यांच्या स्वकियांनी मला आर्कीटेक्चर (वास्तुविशारद) होण्याचा सल्ला दिला. त्यानुसार मी आर्किटेक्चर झाले. माझे आडनाव `गोडसे’ असल्याने नोकरी केल्यास त्यावर येणारी संभाव्य गदा आधीच लक्षात घेऊन आईने मला स्वतंत्र व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पुण्यात तब्बल २७ वर्षे आर्किटेक्चर (वास्तुविशारद) म्हणून स्वत:चा व्यवसाय केला.
लहानपणापासूनच हिंदुत्वाची आवड
स्वा. सावरकरांचा पक्ष म्हणजे `हिंदु महासभा.’ १९६३ साली पुण्यातील मॉर्डन हायस्कूलमधून मी मॅट्रीक झाले. त्यानंतरच्या सुट्टीत मी हिंदु महिला सभेच्या गिरीजाबाई गोरे यांच्याबरोबर निधी गोळा करायला जात असे. सततचे शब्द कानावर पडल्यामुळे तेव्हापासूनच मला एकप्रकारचे बाळकडू मिळाले. त्या वेळी कानखोजे, जयंतराव टिळक यांचा सहवास लाभला त्यामुळे मी घडत गेले.
१९६६ मध्ये तात्या म्हणजे स्वा. सावरकर गेले. १९६७ वर्षांपासून मी अचानक स्वयंस्फूर्तीने लिखाण करू लागले. पुढे माझे काका म्हणजे हिंदु महासभेचे तत्कालीन अध्यक्ष श्री. विक्रम सावरकर यांच्या व्यक्तीमत्त्वाचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला. त्यांची भाषणे, आंदोलने मला विशेष आवडत.
हिंदु महासभेत प्रवेश
हिंदु महासभा हा राजकीय पक्ष आहे. देशात `समान नागरी कायदा’ लागू करावा, यासाठी गेल्या कित्येक दशकांपासून `हिंदु महासभा’ लढा देत आहे. हा पक्ष निखळ हिंदूंचा आहे. येथे गैरहिंदूंना स्थान नाही. राष्ट्रभक्तीने जे जे प्रेरीत झाले आहेत, अशा सर्व हिंदूंना या पक्षात मुक्त प्रवेश आहे.
१९६३-६४ पासून मी हिंदु महासभेच्या कार्यात सक्रीय सहभाग घेतला. यामध्ये विविध अधिवेशने केली. १९८५ साली हिंदु महासभेचे एक अराजकीय अंग असलेल्या `हिंदु महिला सभे’च्या अध्यक्षपदाची धुरा सन २००५ पर्यंत सांभाळली.
असे केले हिंदूंचे संघटन
हिंदूंचे संघटन करण्यासाठी अनेक ठिकाणी सभा, घरोघरी जाऊन लोकांना संपर्क करणे, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, आदींची जयंती, पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम आयोजित करणे, असे उपक्रम सुरू केले. पुढे `सावरकर स्मृती प्रतिष्ठान’या संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेतले. काहीही करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती जागृत ठेवणे, हाच या सर्व खटाटोप करण्याचा मागील हेतू. आता अनेक राज्यांमधून निवडणुकांच्या प्रचारासाठी जात असल्याने अनेक ठिकाणी राष्ट्राभिमानी नागरिक भेटतात. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यक्रमांनाही मी गेले आहे.
आध्यात्मिक अधिष्ठान
लहानपणापासून मी माझ्या आजीबरोबर येथील खुन्या मारुतीच्या देवळात कथा, कीर्तने ऐकायला जात असे. स्तोत्र म्हणणे हा माझ्या आवडीचा भाग. याशिवाय नित्यनियमाने देवदर्शन, पोथीवाचन वगैरे आजतागायत सुरू आहे. अभिलाषा न ठेवता देवाचे स्मरण केल्याने मनाला शांतता मिळते. भगवंताचे स्मरण करणे पूजा करणे वगैरे आपली कर्तव्यच आहेत. अनेकजण म्हणतात `मी पूजा करतो’. पण आपला श्वासही आपल्या हातात नसतांना पूजा `मी’ कशी करू शकतो ? हल्ली लोकांना फक्त व्यायाम व देवपूजे सोडून सगळया गोष्टींना वेळ असतो! त्यामुळे मी पूजा करतो असे कोणी म्हणत असेल, तर त्याने ती केलीच पाहिजे, असे माझे मत आहे. प्रार्थनेचे महत्त्व अफाट आहे. माझे वय आज ६२ वर्षे असून मला आजपर्यंत ना रक्तदाबाचा ना मधुमेहाचा त्रास आहे. ही केवळ परमेश्वराची कृपा आहे. म्हणूनच मी निरोगी आहे.
एकसंधता हेच हिंदु राष्ट्राचे मूळ
`हिंदु’ हे राष्ट्रवाचक तसेच धर्मवाचक आहे आणि म्हणूनच गल्लत होते. हिंदुस्थानात रहाणारा हा हिंदु आहे. धर्म ही आचारपद्धती आहे. धर्म हवा, पण तो आतमध्ये बाहेर एकच म्हणजे राष्ट्रधर्म असायला हवा. तरच सर्व प्रश्न सुटतील. काश्मीरमध्ये काही झाल्यास कन्याकुमारीतील लोकांना काही वाटल्यास ते हिंदु राष्ट्र होय.
मालेगाव प्रकरणी निर्भीड भूमिका !
मालेगाव बाँबस्फोटानंतर मी जी निर्भीड भूमिका घेतली, त्याबाबत मी एवढेच म्हणेन की, माझ्याकडे सत्ता, संपत्ती वगैरे काहीच नाही. त्यामुळे मला काही गमावण्याची भिती नाही व काही कमावण्याची अभिलाषाही नाही.
कर्नल पुरोहितांना अटक करणारे मंगळूरू येथील पाकिस्तानी वेशातील सैन्याबाबत गप्प का ?
१५ ऑगस्ट २००८ रोजी मंगळूरू (कर्नाटक)मधील नेहरू मैदान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वेशातील लोकांनी संचलन केले. कर्नल प्रसाद पुरोहित यांना तत्परतेने अटक करणारे पोलीस या `समांतर लष्करा’च्या उघड उघड कारवायांकडे कोणत्या कारणामुळे दुर्लक्ष करत आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे.
गांधीहत्येचा उल्लेख करून प्रसारमाध्यमांकडून अवहेलना
माझे पूर्वीचे आडनाव गोडसे व आताचे सावरकर आहे. या दोन्ही आडनावांना समाज, सरकारकडून दिला जाणारा त्रास नवीन नाही. म्हणूनच की काय, प्रसारमाध्यमांकडून मालेगाव प्रकरणात माझी ओळख करून देतांना जाणूनबुजून गांधीहत्येतील कै. नथुराम गोडसे यांची पुतणी अशी करून दिली जात आहे. गांधीहत्या होऊन आता ६० वर्षे उलटली आहेत. या घटनेचा व मालेगाव प्रकरणाचा काय संबंध ? ही घटना घडली तेव्हा मी केवळ १० महिन्यांची होते. मग या प्रकरणात माझा काय दोष ? या प्रकरणाचा गांधीहत्येशी संबंध लावणारी प्रसारमाध्यमे कधी काँग्रेसच्या राहूल गांधी यांचे आजोबा फिरोज खान यांच्याविषयी बोलतात का ?
केवळ `गोडसे’ व `सावरकर’ आडनावामुळे माझी बदनामी केली जात आहे. ६० वर्षांनंतरही आमच्या वाट्याला ही अवहेलना येत आहे. या अवहेलनेपायी आमच्या घरातील दोन जणांना फासावर, तर ३ जणांना जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागली आहे. या घरात जन्म घेणे हा काय आमचा अपराध आहे का ? प्रसारमाध्यमांकडून मला मानसिक खच्चीकरण केले जात असून त्याबाबत संबंधितांना मी नोटीसही देणार आहे.
माझ्या अटकेची मागणी करणार्यांनी कधी इमाम बुखारी, अबू आझमी यांच्या अटकेची मागणी केली आहे का ?
मालेगाव प्रकरणी माझ्या अटकेची मागणी करणार्या राष्ट्रवादी काँग्रसचे मदन बाफना यांनी अनेक वेळा देशद्रोही विधाने करणारे इमाम बुखारी व विखारी फुत्कार टाकणारे अबू आझमी यांच्या अटकेची मागणी केली का ?
मालेगाव प्रकरणामागे विदेशी शक्ती कार्यरत
मालेगाव प्रकरणाच्या तपासाची दिशा हेच एक राजकीय षडयंत्र आहे. यामागे मोठी विदेशी शक्ती कार्यरत आहे, हे राज्यकर्त्यांना कळत नाही. मतांसाठी एकीकडे महंमद अफझलला फाशी देण्याचे टाळायचे, तर दुसरीकडे संशयित हिंदूंना `मोक्का’ लावायचा! कसेही करा पण हिंदूंना छळा, असे सर्रास सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयात टिकू शकणार नाही.
सरकारपुढे हे दोनच पर्याय आहेत….
हिंदूंचा छळकपट सुरू असून हिंदु धर्माला नाहक बदनाम केले जात आहे. यातून कायमचा मार्ग काढण्यासाठी एकतर `हे हिंदुराष्ट्र घोषित करा’ अन्यथा `सर्व देशभक्त हिंदूंना कापून टाका’ त्यामुळे एकतर `अखंड हिंदुस्थान’ निर्माण होईल अन्यथा `अखंड पाकिस्तान’ निर्माण होईल.
हिंदूंनी जागृत रहाणे गरजेचे
माझ्या मते `धर्मांतर’ ही देशासमोरील सर्वांत ज्वलंत समस्या आहे.
त्यापाठोपाठ अशिक्षितपणा व गरिबी याही गंभीर समस्या आहेत. देशातील सर्व हिंदूंनी जागृत रहाणे आवश्यक आहे. तरच आणि तरच सध्याचे आपल्यासमोरी प्रश्न सुटणार आहेत. सर्व हिंदूंनी एकजूट दाखवल्यास या देशावर कायमचे भगवे राज्य येऊन सर्वजण सुखी रहातील.


