कसाबला फाशी द्या ! – शिवसेनाप्रमुख

कसाबला थेट फाशी देण्याची भाषा शिवसेनाप्रमुख यांच्या व्यतिरिक्‍त कोणीच का करत नाही ?

मुंबई, १७ डिसेंबर (वार्ता.) – निरपराध्यांचे रक्‍त सांडणार्‍या नराधम दहशतवाद्यावर खटले कसले चालवता ? त्याला बाचाबाचीची संधी कसली देता ? लोकशाही व न्यायप्रक्रियेचे फालतू अवडंबर माजवून त्या नराधमांना सरकारी पाहुणे म्हणून का पोसता ? त्या एकमेव जिवंत नराधमास व रक्‍तपिपासू दहशतवाद्यास कोणत्याही चौकशीशिवाय जाहीर फासावर लटकवा. एकदा नाही, शंभर वेळा फासावर लटकवा, असे घणाघाती व हिंदूंना दिलासा देणार विधान शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी केले.

(शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे हेच हिंदूंचे हृदय जाणणारे एकमेव आहेत ! हिंदूंनो, शिवसेनाप्रमुखांसारखे निर्भयपणे व परखड बोलायला तरी शिका. अर्थात असे बोलायलाही अंगी धमक असावी लागते ! – संपादक) शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक `सामना’मधील संपादकीय लेखात त्यांनी हिंदूंच्या मनातील हा संताप व्यक्‍त केला. जगाने कसाबला निर्घृण हत्याकांड करतांना पाहिल्यानंतर पुरावे कसले तपासता ? चौकशांचे `फार्स’ कसले करता ? असा परखड प्रश्‍न श्री. ठाकरे यांनी या संपादकियात विचारला आहे. `दहशतवादी उद्या एखाद्या विमानाचे अपहरण करून प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात कसाबच्या मुक्‍ततेची मागणी करतील आणि ती सुटका केली जाईल. कसाबला घेऊन एक खास विमान लाहोरात किंवा कराचीला उतरेल. शेवटी त्या मसूद अजहरला सोडवण्यासाठी पाकड्यांनी तोच डाव रचला होता. कसाबच्या बाबतीत ते घडू नये, असे वाटत असेल, तर त्याला फासावर लटकवा.’ कसाबचे वकीलपत्र घेऊ इच्छिणार्‍यांबद्दल श्री. ठाकरे म्हणाले, `कसाबसारख्या नराधमाचे वकीलपत्र घेण्याची हिंमत आमच्याच मातीतले बेइमान करतात. दहशतवादी हल्ल्यातील रक्‍त सुकण्याआधीच त्या कसाबच्या बचावासाठी वकिलांनी काळे डगले चढवले. ज्यांना या कसाबचा पुळका आला आहे, त्यांनी स्वत:चे प्रियजन कसाब नावाच्या या कसायाच्या तावडीत द्यावेत व मगच दयावान बनून त्याच्या बचावासाठी उभे रहावे. दुसर्‍याचे रक्‍त सांडते तेव्हा फक्‍त हळहळ व्यक्‍त केली जाते. त्यांचे स्वत:चे प्रियजन दहशतवादी हल्ल्यात मरत नाहीत, तोपर्यंत वकीलपत्रास हात लावला, तर जनक्षोभ उसळेल व शिवसेनाही स्वस्थ बसणार नाही’, असा इशाराही श्री. ठाकरे यांनी दिला आहे.