लोकहो, दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण करणारी वृत्ते देणार्या देशद्रोही प्रसारमाध्यमांचा निषेध करा !
इराकच्या दौर्यावर असलेले अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्यावर मुतंदर-अल्-झैदी या अल्-बगदादी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने दोन्ही बूट फेकून मारले. ही घटना सध्या जगभर गाजत आहे. पत्रकाराने केलेले कृत्य बरोबर कि चुकीचे हा भाग वेगळा; मात्र इराकला देशोधडीला लावणार्या बुश यांच्या विरोधात एका पत्रकाराने प्रकट केलेला राग यातून दिसून आला. बुश यांचा अशा प्रकारे अपमान करणारे झैदी हे सध्या इराकमध्ये `हिरो’ झाले असून त्यांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले आहेत. झैदी यांच्या कृत्याचे आम्ही समर्थन करत नाही; मात्र भारतातील माजलेल्या राज्यकर्त्यांवर जरब बसवण्यासाठी चपलांचा भडीमार करणारा पत्रकार नको; पण शब्दांचा भडीमार करणार्या पत्रकारांची नितांत आवश्यकता आहे.
अल्पसंख्यांकांच्या मतांसाठी राष्ट्राची अपरिमित हानी करणारे, राष्ट्राच्या सुरक्षेशी खेळणारे व भ्रष्टाचाराने बरबटलेल्या राज्यकर्त्यांच्या डोळयाला डोळा भिडवून त्यांना त्यांच्या कुकृत्याची जाणीव करून देणार्या पत्रकारांची फौज भारतात निर्माण होणे आवश्यक आहे !
पत्रकारांनी नट-नट्यांचा मार खाण्याऐवजी राष्ट्रासाठी मार खावा !
अभिनेते अभिषेक बच्चन व ऐश्वर्या राय यांच्या विवाहाच्या बातमीचे वृत्त संकलन करण्यासाठी वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना अनेक खटाटोप करावे लागले. वैयक्तिक कार्यक्रमात ढवळाढवळ करणार्या सदर वृत्त प्रतिनिधींना अभिषेक बच्चन यांच्या सुरक्षारक्षकांनी चोप दिला. नेहमीच एकमेकांचे स्पर्धक असलेल्या वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांचे प्रतिनिधी या घटनेनंतर मात्र संघटित झाले. `बच्चन कुटुंबियांशी निगडित कोणतेही वृत्त अथवा त्यांचे छायाचित्र प्रकाशित करणार नाही’, असे जाहीर करण्यात आले. याचा फटका बच्चन कुटुंबियांना बसल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी प्रसारमाध्यमांची जाहीर माफी मागितली. अमिताभ बच्चन तसेच ऐश्यर्वा बच्चन हे कर चुकवण्यासाठी अनिवासी भारतीय बनले होते. जया बच्चन या दहशतवाद्यांची पाठराखण करणार्या समाजवादी पक्षाच्या नेत्या आहेत. असे असतांना अशा व्यक्तींच्या विवाहाच्या वृत्ताचे संकलन करण्यासाठी आपले पत्रकार मार खातात ! वाजपेयी पंतप्रधान असल्याच्या कार्यकाळात पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारताचा दौरा केला होता. त्या वेळी अमयामध्ये शिखर परिषद आयोजित केली होती. या परिषदेनंतर परवेझ मुशर्रफ यांनी अनेक भारतविरोधी वक्तव्ये केली. त्या वेळी या पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकणे तर सोडाच मुशर्रफ यांच्यावर शाब्दिक प्रतिहल्ला करण्याची हिंमत तेथे असलेल्या एकाही पत्रकाराने दाखवली नाही ! नट-नट्यांना अद्दल घडवण्यासाठी एकजूट दाखवणारे राष्ट्राच्या शत्रूसमोर अशा प्रकारे नांगी का टाकतात ?
दहशतवाद्यांची प्रेमप्रकरणे उघड करण्याऐवजी त्यांचा क्रूर चेहरा उघड करा !
१९९३ साली मुंबईमध्ये साखळी बाँबस्फोट घडवून आणण्याच्या प्रकरणात अटकेत असलेल्या अबु सालेम याचे उदात्तीकरण `आज तक’ व `झी न्यूज’ यांसारख्या वृत्तवाहिन्यांवरून नेहमीच सुरू असते. अबु सालेम त्याची पत्नी मोनिका बेदी हिच्या प्रेमापायी कसा वेडा झाला आहे, त्या दोघांची भेट कधी झाली व तिच्या विरहामुळे सालेम सध्या कसा तडफडत आहे, तो काय खातो, काय पितो, शरीर मजबूत करण्यासाठी कोणते व्यायाम करत आहे, यांबाबत बित्तंबातम्या देण्यात सध्याच्या वृत्तवाहिन्या धन्यता मानतात. अनेक प्रथितयश वृत्तपत्रांमधूनही याबाबत रकानेच्या रकाने लिहून येते. असे करून प्रसारमाध्यमे समाजाच्या मनात दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण करतात. दहशतवाद्यांच्या उदात्तीकरणाचे हे काही एकच उदाहरण नव्हे. मुंबई बाँबस्फोटाच्या प्रकरणात गुंतलेला संजय दत्त याच्यावर खटला सुरू असतांना प्रसारमाध्यमांनी त्याच्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल, यासारख्या घटनांना प्रसिद्धी देण्यास धन्यता मानली. भारताला दहशतवादाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. असे असतांना प्रत्येक भारतियाच्या मनात दहशतवाद्यांबद्दल `खाऊ कि गिळू’ अशी मानसिकता निर्माण होणे आवश्यक आहे; मात्र प्रेक्षकसंख्या वाढवण्याच्या नादात वृत्तवाहिन्या दहशतवाद पोसतात !
भारताची सद्यस्थिती पहाता समाजातील प्रत्येक घटकाने त्याची जबाबदारी चोखपणे पार पाडल्यास राष्ट्राचा उत्कर्ष नक्कीच होणार, यात शंका नाही. त्यामुळेच समाजातील प्रत्येक घटकाला दिशा देण्याची जबाबदारी पत्रकार व वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी यांच्यावर आहे. त्यामुळे पत्रकार बांधवांनो, झाले गेले गंगेला मिळाले ! टिळक, भारतकार हेगडे-देसाई या आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाचे स्मरण करून समाजप्रबोधनाचे शिवधनुष्य पेलण्यास पुन्हा एकदा सिद्ध व्हा !



