दहशतवाद संपवण्याच्या नुसत्या वल्गना करणारे नको, तर ठोस कृती करणारे राज्यकर्ते देशाला हवेत !
मुंबईवर हल्ला करून दहशतवाद्यांनी भारताची अब्रू वेशीवर टांगली. या वेळी सर्वांना राहूनराहून आठवण झाली, ती दहशतवादाचा नि:पात करणार्या भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची ! त्यांचा हा वारसा राहुल गांधी व प्रियांका गांधी ही त्यांची नातवंडे पुढे चालवतील, अशी भाबडी आशा काँग्रेससह भारतीय जनतेलाही वाटत आहे. दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केल्यानंतर काँग्रेसचे `युवराज’ राहुल गांधी व
`युवराज्ञी’ प्रियांका गांधी यांनी जनतेच्या भावनांना हात घालणारी भाषणे ठोकून
काम भागवले.
`देशाला नेहरू-गांधी घराण्यांशिवाय कोणी तारणहार नाही’,असे काँग्रेसला वाटते; मात्र याच घराण्याची भावी पिढी ही कर्तृत्वहीन असल्याचे या घटनेनंतर लक्षात आले. काल संसदेमध्ये मुंबईवरील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आवेशपूर्ण भाषण केले. “हल्ल्यात ठार झालेल्या प्रत्येक नागरिकाच्या प्राणाची किंमत दहशतवाद्यांना चुकवावी
लागेल”, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मुंबईवर हल्ला होऊन दोन आठवडे
झाले; मात्र सत्तेवर असलेल्या काँग्रेसमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या राहुल गांधी यांनी पाकिस्तानवर हल्ला करायला काँग्रेसला कृतीप्रवण केले नाही. हे त्यांचे मोठे अपयश आहे. काँग्रेस राहुल गांधी यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणून पहाते; मात्र दहशतवादाच्या विरोधात निष्क्रीय भूमिका घेणार्या व्यक्तीने आपले नेतृत्व करावे का, याचा विचार भारतीय जनतेने करायला हवा !
`विलासराज’ खालसा करतांनाची खुमखुमी आता कुठे गेली ?
मुंबईवरील हल्ल्यानंतर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा
द्यावा लागला. देशमुख यांचा राजीनामा मंजूर होऊ नये, यासाठी दिल्लीतील
`देशमुख लॉबी’ कार्यरत होती. देशमुख यांची खुर्ची वाचणार, असे चित्र असतांनाच राहुल गांधी यांनी देशमुख यांच्या विरोधात जोरदार आघाडी उघडली. त्यांनी महाराष्ट्राचे समन्वयक ए.के. अँथनी यांची भेट घेतली व देशमुख यांचा राजीनामा मंजूर करण्यासाठी दबाव आणला. राहुल गांधी यांच्या हस्तक्षेपामुळेच देशमुखांना खुर्ची सोडावी लागली. या गोष्टीवरून एक गोष्ट सिद्ध होते की, राहुल गांधी यांच्या शब्दाला काँग्रेसमध्ये मान आहे. `भारताचे नाक कापणार्या पाकिस्तानवर हल्ला करावा’, असा दबाव राहुल गांधी काँग्रेस
सरकारवर आणू शकले असते; मात्र त्यांनी ही बाब मनावर घेतली नाही. ते शाब्दिक तोफगोळे फेकण्यातच धन्यता मानत आहेत. `पाकिस्तानला धडा शिकवायचाच’, अशी खुमखुमी ठेवून जर राहुल गांधी यांनी पावले उचलली असती, तर एव्हाना पाकिस्तानावर तोफगोळयांचा वर्षाव झाला असता !
त्यामुळे राहुल गांधी यांना एकच सांगावेसे वाटते की, छान छान भाषणे करून ते काँग्रेसवाल्यांना भुलवू शकतील; मात्र जनतेच्या डोळयांत धूळ फेकू शकणार नाहीत !
काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी हातांत बांगड्या भराव्यात !
राहुल गांधी यांच्या प्रमाणेच प्रियांका गांधीही भाषणबाजी करण्यात
पटाईत आहेत. `या वेळी जर इंदिरा गांधी असत्या, तर त्यांनी दहशतवाद वेगळया प्रकारे हाताळला असता’, असे वक्तव्य मुंबईवर हल्ला झाल्यानंतर त्यांनी केले. प्रियांका गांधी म्हणजे काँग्रेसमधील एक `वजनदार’ व्यक्तीमत्त्व ! काँग्रेसवाल्यांना म्हणे प्रियांका गांधी यांच्यामध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांची छबी दिसते; मात्र वास्तव काही वेगळेच आहे. प्रियांका गांधी यांच्यामध्ये जर खरोखरच श्रीमती इंदिरा गांधी यांच्यासारखा कणखरपणा असता, तर त्यांनी `काँग्रेस सरकारने पाकिस्तानशी युद्ध पुकारले नाही’, म्हणून सरकारला धारेवर धरले असते. नेभळट बनलेल्या काँग्रेसच्या राज्यकर्त्यांना कृतीप्रवण करण्याऐवजी प्रियांका गांधी यांनी भूतकाळात रमणे पसंत केले. इंदिरा गांधी
वयोवृद्ध असतांनाही त्यांनी पाकिस्तानला इंगा दाखवला; मात्र राहुल व प्रियांका ही त्यांची नातवंडे ठणठणीत असतांनाही दहशतवाद निपटण्यासाठी ठोस कारवाई करतांना दिसत नाहीत. त्यामुळे आजींची दहशतवादविरोधी परंपरा त्यांची नातवंडे पुढे चालू ठेवणार नाहीत, याची खूणगाठ भारतियांनी मनात बाळगावी ! ही झाली श्रीमती इंदिरा गांधी यांच्या नातवांची कर्मकहाणी.
काँग्रेसच्या राज्यकर्त्यांची स्थितीही या दोघांपेक्षा वेगळी नाही. दहशतवादाच्या विरोधात कणखर भूमिका घेणार्या इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसमध्ये असा एकही मायेचा लाल नाही, जो पाकिस्तानला अद्दल घडवू शकेल ! श्रीमती इंदिरा गांधी या महिला असतांनाही त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला; मात्र आताचे काँग्रेसचे राज्यकर्ते पाकिस्तानला केवळ इशार्यांवर इशारे देत आहेत.
पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवण्याचे महान कार्य काँग्रेसवाल्यांना जमणार नाही. त्यामुळे बिनकामाच्या काँग्रेसवाल्यांनी आता हातांत बांगड्या भरून घरी बसावे, हेच उत्तम !



