शरद पवारांसह काँग्रेसमधील सर्व मराठी नेते आपत्तीचे संधीत रूपांतर करण्यात कमी पडत आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबरला पाकिस्तानी आणि इस्लामी आतंकवाद्यांनी जो प्राणघातक हल्ला केला, त्याचा व्यवस्थित उपयोग करून देशाची सुरक्षितता आणि एकात्मता निर्धोक पातळीवर नेऊन ठेवता येईल. पवारांचे लक्ष महाराष्ट्रातून जो पैसा निर्माण होतो, त्याच्या स्रोतावर आपले अधिकाधिक नियंत्रण कसे राहील, यावरच नेहमीप्रमाणे एकवटले आहे.
महाराष्ट्रातील काँग्रेसजन शिवाजी महाराजांना स्मरतील, तर कर्तव्यपालन राष्ट्रीय भावनेने करू शकतील. मुंबईवरचा हल्ला वेळीच सूचना मिळूनही रोखला नाही, म्हणून शिवराज पाटील, विलास देशमुख आणि आबा पाटील यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध सत्तात्याग करण्यास काँग्रेसश्रेष्ठींनी भाग पाडले. झाले ते चांगलेच झाले. शिवराजना सोनियांना प्रसन्न करण्यावाचून राष्ट्रकार्य नव्हते. आपण मुख्यमंत्री असतांना दहा पाकिस्तानी आणि इस्लामी आतंकवादी भारतात बेधडक घुसले, सतत ६० तास त्यांनी मुंबईस वेठीस धरले, सहाशे लोकांना गोळया घातल्या, याविषयी देशमुखांना लाज वाटल्याचे एकदाही जाणवले नाही. त्यांना मंत्रालयातून हटविले असले, तरी सत्तेच्या लाभापासून ते वंचित झाले आहेत, असे नाही. आबा पाटलांनी तर सत्ता अशी वापरली की, आतंकवाद पाकिस्तान पसरवीत नसून तो भारतीय सेनादले आणि हिंदुत्ववादी संघटना मिळून करीत आहेत, असाच कोणाचाही समज व्हावा. त्यामुळे या तिघांना सत्ता सोडावी लागली. याकरिता एकाही सज्जनाच्या डोळयांत अश्रू येणार नाही; परंतु मुंबईवरील हल्ल्याला आणखीही काही व्यक्ती उत्तरदायी आहे. तिलाही शिक्षा व्हावयास हवी आहे; परंतु त्या विषयावर मराठी काँग्रेस नेते मूग गिळून गप्प बसले आहेत, उदा. भारताची सुरक्षितता बाहेरून आणि आतून धोक्यात येणार असेल, तर त्यासंबंधीची सर्व माहिती सध्या सर्वप्रथम गृह खात्याकडे येतेच असे नाही. ती माहिती थेट राष्ट्रीय सुरक्षा विभागाकडे जाते. हा विभाग पंतप्रधानांच्या थेट नियंत्रणाखाली येतो. पंतप्रधान मनमोहन सिंग हे सोनिया गांधींचे खाजगी चाकर म्हणून वावरतात. ते सोनियांपासून लपवतील, असे काही नाही. म्हणजे मुंबईवर हल्ला होणार, हे सोनिया, मनमोहन आणि त्यांचे सुरक्षा समादेशक एम्.के. मेनन यांना पूर्वीच माहीत होते. त्यांच्याकडे काय माहिती होती आणि ती त्यांनी प्रसृत कशी व कोठे केली, याविषयी सर्व जाणून घेण्याचा राष्ट्राला हक्क आहे. चीन भारतावर हल्ला करण्याची शक्यता असल्याचे लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांनी नेहरूंना कळवले होते; पण त्यांनी त्याची घ्यावी तशी दखल घेतली नाही. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या विषयात नेहरू घराण्यावर विश्वास टाकता येत नाही. हे घराणे परक्यांना धार्जिणे आहे. अपवाद इंदिराबाईंचा. पवारांसारखा मराठी माणूस दिल्लीत असून तो राष्ट्रीय सुरक्षिततेच्या विषयात ढिला पडला आहे आणि महाराष्ट्रात सत्तापालट केल्याचे श्रेय राहुल गांधींनी उपटले आहे. असे विपरीत घडते आहे.
- सुघोष



