संवेदनशील इस्रायलकडून संवेदनाहीन भारतीय राज्यकर्ते काही शिकतील का ?

आपल्या नागरिकांच्या मदतीसाठी त्वरित पावले उचलणार्‍या इस्रायलचा आदर्श भारतीय राज्यकर्ते घेतील तो सुदिन !

इस्रायली नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तेथील सरकार किती जागरूक आहे, हे मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर दिसून आले. आतापर्यंत इस्रायली नागरिकांचे राष्ट्रप्रेम, तेथील सरकार नागरिकांची घेत असलेली काळजी यांबाबत सर्वांनाच माहिती होती; मात्र वेगवेगळया घटनांमधून इस्रायलच्या राष्ट्रप्रेमाचे जे वेगवेगळे पैलू समोर येतात; त्याबाबत भारतीय जनतेचा अभ्यास होणे आवश्यक आहे.

जनतेच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देणारे इस्रायल सरकार !
ज्यंूचे वास्तव्य असलेल्या नरीमन हाऊसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यावर इस्रायल सरकार पेटून उठले. इस्रायल सरकारने `नरीमन हाऊसवरील हल्ला हा इस्रायलवर हल्ला आहे’, असे जाहीर केले. त्यामुळेच नरीमन हाऊसमध्ये अडकून पडलेल्या ज्यूंच्या सुरक्षिततेसाठी इस्रायल सरकारने त्वरित कमांडोंचे पथक व वैद्यकीय पथकही भारतात पाठवले. इस्रायल सरकारच्या या कृती अतिशय जलद व सहज होत्या. आपल्या नागरिकांबद्दल वाटणारे प्रेम व काळजी यातून दिसून येत होती. मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर दोन ज्यू बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी इस्रायलची गुप्‍तचर संघटना `मोसाद’ यांचे एक पथक भारतात आले आहे. हे पथक आकाश-पाताळ एक करून या ज्यूंना शोधून काढील, यात दुमत नाही. बेपत्ता भारतियांबद्दल काँग्रेस सरकारला असा कळवळा आहे का ? याचे उत्तर `नाही’, असेच आहे. भारतीय मच्छीमारांना अवैधरीत्या अटक करून त्यांना तुरुंगात डांबण्याची पाकिस्तानची खोड आहे. भारतीय मच्छीमारांवर पाकिस्तानी तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांकडून होत असलेला अत्याचार, ही आता एक भीषण समस्या झाली आहे. या बेपत्ता भारतीय मच्छीमारांच्या सुटकेसाठी अथवा त्यांना सुखरूप परत भारतात आणण्यासाठी काँग्रेस सरकारने आतापर्यंत काहीही केले नाही. परदेशात वास्तव्य करणार्‍या ज्यूंवर हल्ला केल्यानंतर इस्रायलला तो हल्ला, हा आपल्या देशावरील हल्ला वाटतो व त्या अनुषंगाने तेथील सरकार कृतीप्रवणही होते. या उलट मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला करूनही काँग्रेस सरकार या हल्ल्याच्या मागे असणार्‍या पाकिस्तानच्या विरोधात
कोणत्याही ठोस कारवाईचे संकेत देत नाही. ज्यूंबद्दल प्रेम व आपुलकी असल्यामुळे तेथील सरकार लगेच कार्यप्रवण होते. काँग्रेसच्या राज्यकर्त्यांमध्ये भारतीय जनतेबद्दल अशी संवेदनशीलता नसल्यामुळेच त्यांच्याकडून दहशतवादाच्या विरोधात धडक कृती होत नाही.

कमांडोंबद्दल आदर असणार्‍या इस्रायल सरकारकडून अच्युतानंदन यांनी बोध घ्यावा !
सध्या इस्रायलचे एक मदतपथक मुंबईत कार्यरत आहे. `नरीमन हाऊसमध्ये ठार झालेले ज्यू हे कदाचित भारतीय कमांडोंनी झाडलेल्या गोळया लागूनही ठार झाले असतील’, असा अंदाज या मदतपथकाने वर्तवला आहे. जिवाची बाजी लावून दहशतवाद्यांशी अव्याहतपणे लढणार्‍या कमांडोंवरच संशय घेणार्‍या आपल्या मदतपथकाचा इस्रायल सरकारने खरपूस समाचार घेतला. शवविच्छेदन व गुन्हे वैद्यकशास्त्रज्ञ यांनी अजूनही याबद्दल अहवाल सादर केलेला नाही. असे असतांना अशी बेछूट विधाने करणार्‍या या मदतपथकाला इस्रायल सरकारने फटकारले. कमांडोंनी केलेल्या कामगिरीमुळे दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या अनेक विदेशी नागरिकांची सुटका झाली. या कमांडोंच्या अतुल्य कामगिरीची जाणीव इस्रायल सरकारलाही आहे; मात्र केरळचे मुख्यमंत्री श्री. व्ही.एस्. अच्युतानंदन यांना या कमांडोंच्या पराक्रमाबद्दल काहीही वाटत नाही. त्यामुळेच ते मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या अंत्ययात्रेला हजर रहात नाहीत. यावर कहर म्हणजे श्री. अच्युतानंदन यांना त्यांच्या कृतीबद्दल काहीही गैर वाटत नाही. उलट ते उन्नीकृष्णन कुटुंबियांना अपमानित करतात.
भारत व इस्रायल या दोन्ही देशांवर दहशतवादाचे सावट आहे. त्यामुळे दहशतवादी हल्ल्यांबाबत ज्या ज्या वेळी चर्चा केली जाते, त्या वेळी दोन्ही देशांच्या दहशतवादविरोधी धोरणांची तुलना करावीशी वाटते. अशी तुलना केल्यानंतर दहशतवाद्यांच्या विरोधात तत्परतेने लढणार्‍या, देशवासियांच्या सुरिक्षततेसाठी झटणार्‍या इस्रायलच्या नखाची सरही भारतातील काँग्रेस सरकारमध्ये नाही, हे इथे खेदाने नमूद करावे लागते. ही स्थिती जर बदलायची असेल, तर दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उचलणारे व जनतेवर पित्याप्रमाणे प्रेम करणारे राज्यकर्ते हवेत. ते वैचारिक क्रांतीनेच मिळू शकतात !