बेंगळुरू, १ डिसेंबर (वृत्तसंस्था) – हॉटेल ताजमध्ये दहशतवाद्यांशी लढतांना वीरमरण प्राप्त झालेले मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेलेले केरळचे मुख्यमंत्री श्री. एस. अच्युतानंदन यांना मेजर संदीप यांच्या वडिलांनी बाहेरचा रस्ता दाखवला.
(राजकारण्यांना त्यांची जागा दाखवून देणार्या श्री. उन्नीकृष्णन यांचे अभिनंदन ! – संपादक) उन्नीकृष्णन कुटुंब हे मूळचे केरळ येथील असून ते बेंगळुरू येथे स्थायिक झाले आहे. मेजर संदीप उन्नीकृष्णन यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री श्री. येडीयुरप्पा यांच्यासह अनेक मंत्री सहभागी झाले होते; मात्र त्या वेळी केरळमधील एकही मंत्री उपस्थित नव्हता. (काही महिन्यांपूर्वी केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील एका जवानाला काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढतांना वीरमरण आले होते. त्याच्या अंत्ययात्रेच्या वेळीही केरळमधील एकही मंत्री उपस्थित नव्हता. या दोन्ही घटनांवरून केरळमधील डावे सरकार राष्ट्रप्रेमींची हेटाळणी करते, हेच दिसून येते ! लोकहो, राष्ट्रप्रेमींचा सन्मान न करणार्या डाव्यांना आता निवडणुकीच्या वेळी त्यांची जागा दाखवा ! – संपादक) त्यामुळे केरळ सरकारवर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री श्री. अच्युतानंदन यांनी उन्नीकृष्णन कुटुंबियांना वारंवार दूरध्वनी करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला; मात्र उन्नीकृष्णन कुटुंबियांनी त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे श्री. अच्युतानंदन आज उन्नीकृष्णन कुटुंबियांच्या घरी गेले. त्यामुळे मेजर संदीप यांचे वडील संतप्त झाले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना घरात घेतले नाही व त्यांना `कुत्र्यांनो, चालते व्हा !’ म्हणून बजावले. (जवानांच्या बलीदानाची किंमत नसणार्या अशा राजकारण्यांना मेजर संदीप यांच्या वडिलांनी दिलेली वागणूक अगदी योग्य आहे ! – संपादक) `कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये. जर कोणी माझ्या घरी आला, तर मी आत्महत्या करीन’, असा इशारा मेजर संदीप यांच्या वडिलांनी दिला होता.


