दहशतवादाशी दोन हात करण्यास आपण तयार आहोत का ?

दहशतवाद्यांच्या विरोधातील लष्करी कारवायांचे चित्रण दाखवून त्यांना सावध करणार्‍या विवेकशून्य वृत्तवाहिन्या !

राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या कमांडरांनी हॉटेल ओबेरॉय, हॉटेल ताज व नरीमन हाऊस येथील दहशतवाद्यांना ठार मारून मोहीम फत्ते केली. येथील घटनांनंतर एक प्रश्‍न आपल्याला सतत भेडसावत रहाणार व तो म्हणजे भारतीय जनता दहशतवादाशी दोन हात करण्यास खरोखर तयार आहे का ? दहशतवादाचा नि:पात करण्यासाठी जनता, राज्यकर्ते व लष्कर यांनी त्यांचे काम चोखपणे बजावणे आवश्यक असते; मात्र मागील तीन दिवसांत घडलेल्या घटनांचा आढावा पहाता राज्यकर्ते, वृत्तवाहिन्या व जनता त्यांची भूमिका बजावतांना अनुत्तीर्ण झाल्याचेच दिसून आले. दहशतीचे सावट असतांना एकमेकांना धीर देण्याऐवजी मुंबईत अफवांचा पूर आला. याही पुढे जाऊन ताज हॉटेल, ओबेरॉय हॉटेल व नरीमन हाऊस येथे कमांडो त्यांची मोहीम तडीस नेत असतांना तेथे उपस्थित असलेल्या बघ्यांनी बाँबस्फोट झाल्यावर टाळया वाजवून हीन मानसिकतेचे दर्शन घडवले.

बाँबस्फोट झाल्यावर टाळया पिटणारा समाज हा देशद्रोहीच !
`रेल्वेस्थानकावर दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा गोळीबार केला’, अशी अफवा व्हिक्टोरिया टर्मीनसवर काल पसरली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रवाशांवर दहशतीचे सावट पसरले. मंत्रालयामध्ये बाँब ठेवल्याच्या अफवेमुळे तेथे काम करणारा एक कर्मचारी हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला. आणीबाणीच्या काळात सूचनांचे तंतोतंत पालन करणे, हेच जनतेचे प्रथम कर्तव्य असते; मात्र मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर जनता सैरभैर झाल्याचे चित्र होते. अशी दुबळी मानसिकता असलेली जनता दहशतवादाशी दोन हात काय करणार ? दहशतवादाचा नि:पात करायचा असेल, तर जनता मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे, हे मुंबईवरील हल्ल्यांच्या घटनांवरून दिसून आले.
हॉटेल ताज, नरीमन हाऊस व हॉटेल ओबेरॉय येथील दहशतवाद्यांवर कारवाई करतांना प्रेक्षणीय स्थळ पहाण्यासाठी आलेल्या पर्यटकांप्रमाणे वावरणारे हे बघे लष्करासाठी मोठा अडसर होते. हॉटेल ताजसमोर दहशतवाद्यांनी ग्रेनेडचा स्फोट घडवून आणल्यावर काही बघ्यांनी त्या वेळी टाळया वाजवल्या. भारतीय अस्मितेवर घाला घालणार्‍या दहशतवादी कारवायांचा निषेध करण्याऐवजी अशा प्रकारे आसुरी वृत्तीचे दर्शन घडवून आणणारी जनता वैचारिक क्रांती अपरिहार्य करते ! नरीमन हाऊस येथेही कमांडो कारवाई करत असतांना बघ्यांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी केली. कमांडोंची मोहीम संपलेली नसतांनाही तेथील जमावाने मोहीम संपल्याच्या आविर्भावात घोषणा देण्यास सुरुवात केली. दहशतवाद निपटण्यासाठी स्वत: काही ठोस कृती तर करायची नाहीच, उलट दहशतवाद निपटण्याच्या कार्यात मग्न असलेल्यांना अडसर निर्माण करणारा समाज कधीतरी दहशतवादाच्या विरोधात खंबीर लढा देऊ शकतो का ? दहशतवाद्यांनी हल्ले केल्यानंतरच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, याचे प्रशिक्षण जनतेला देणे आवश्यक आहे, हे यातून दिसून आले.

दहशतवादाला पोषक ठरलेल्या वृत्तवाहिन्या !
आणीबाणीच्या काळात समाजाला दिशा देण्याचे कार्य प्रसारमाध्यमांनी करणे आवश्यक होते; मात्र मुंबईवरील दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांनंतर भारतीय वृत्तवाहिन्या `ब्रेकिंग न्यूज’च्या मागे लागल्या होत्या. २६ नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांनी ठिकठिकाणी हल्ले केल्यानंतर काही वृत्तवाहिन्यांवर `दहशतवाद्यांनी मंत्रालयाच्या समोर ग्रेनेड फेकले’, अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध झाले. मुंबईच्या पूर्व विभागाचे अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त श्री. सदानंद दाते हे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले; मात्र अनेक वृत्तवाहिन्यांवर दहशतवाद्यांशी लढतांना त्यांना वीरमरण आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले. नरीमन हाऊसमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या कमांडरांना पाचारण करण्यात आले. या कमांडरांना हॅलिकॉप्टरच्या साहाय्याने नरीमन हाऊसमध्ये उतरवण्यात आले. वास्तविक पहाता दहशतवाद्यांना अंधारात ठेवून त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक होते; मात्र `टीआर्पी’ वाढवण्याच्या अट्टाहासापायी वृत्तवाहिन्यांनी ताळतंत्र सोडून दहशतवाद्यांच्या विरोधात चाललेल्या लष्करी कारवायांचे मुक्‍तपणे चित्रण केले. असे करून या वृत्तवाहिन्या दहशतवाद्यांना सावधच करत होत्या. कर्तव्य विसरलेल्या अशा वृत्तवाहिन्या समाजप्रबोधन करण्यास लायक नाहीत.
या सर्व घटनांमध्ये राज्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत काही भाष्य न करणेच इष्ट ठरेल. या हल्ल्यांमागे पाकिस्तानचा हात आहे, हे आता समोर आले आहे; मात्र काँग्रेस सरकारने पाकिस्तानला दमदाटी करण्यापलीकडे जाऊन काहीही केलेले नाही व सरकार काही करणारही नाही ! भारत दहशतवादमुक्‍त करण्यासाठी आता पाकिस्तानवर चढाई करणारे राज्यकर्ते भारताला लाभणे आवश्यक आहे. ते वैचारिक क्रांतीनेच प्राप्‍त होऊ शकतात, हे जनतेने लक्षात घ्यावे.

निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत

Leave a Reply