ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांना `महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान
नवी मुंबई, २५ नोव्हेंबर (वार्ता.) – अंधश्रद्धा व व्यसनाधिनतेच्या विरोधात लढून शिस्तबद्ध व सुसंस्कृत समाज घडवण्याचे कार्य नानासाहेबांनी केल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी खारघर येथे एका कार्यक्रमात केले. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने सन २००८ वर्षाकरता रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे `महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचे आज खारघर येथे वितरण करण्यात आले. ५ लाख रुपये, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या प्रसंगी २५ लाखांहून अधिक भक्तगण उपस्थित होते. नानासाहेबांचे सुपुत्र श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नानासाहेबांना हा पुरस्कार दिल्याने पुरस्काराची उंची वाढली असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. एकीकडे संपत्ती वाढत असतांना व्यसनाधिनता वाढत आहे. नानासाहेबांच्या सात पिढ्या व्यसनमुक्तीसह अनेकविध कार्य करत आहेत. केंद्रशासनाने नानासाहेबांवर पोस्टाचे तिकीट काढून त्यांचे विचार देशपातळीवर पोहोचवावे, असे विचार उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी या वेळी व्यक्त केले. पुरस्काराला उत्तर देतांना श्री. अप्पासाहेब म्हणाले की, प्रत्येक माणसाला राष्ट्रासाठी कार्य करण्याची जाणीव आध्यात्मिकतेतूनच होते. अध्यात्म व संत शिकवण याचा अर्थ धार्मिकता असा नाही. मतभेद, जातीभेद व विचारभेद दूर करण्यासाठी मानवता धर्माची आवश्यकता आहे, असे श्री. अप्पासाहेब यांनी सांगितले. संत वा*मयाची शिकवण प्रत्येक शाळेतून दिली, तर विद्यार्थ्यांचे मन सुसंस्कारीत होईल, तरच राष्ट्राचे भवितव्य उज्ज्वल होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
क्षणचित्रे
* शासनाने आयोजित केलेला हा कार्यक्रम १ तास उशिरा सुरू झाला. त्यामुळे २५ लाख लोकांचे सुमारे २५ लाख तास वाया गेले.
* काँग्रेसचे नेते अ.र. अंतुले यांनी आमची भाषणबाजी ऐकायला तुम्ही आले नाहीत, असे सांगतांनाच स्वत: मात्र १५ मिनिटे भाषण केले. त्यामुळे रणरणत्या उन्हात भक्तगणांना ते ऐकणे भाग पडले.


