कुडाळ येथील हिंदु धर्मजागृती सभेत धर्माभिमानी हिंदूंचा देश व धर्म द्रोह्यांना इशारा !
३ हजारहून अधिक धर्माभिमानी उपस्थित
कुडाळ, १८ नोव्हेंबर (वार्ता.) – एखाद्या देशात जो समाज बहुसंख्येने असतो, त्या समाजाच्या स्थितीवर त्या देशाचे भवितव्य अवलंबून असते. या तत्त्वानुसार विचार करायचा झाल्यास सद्यस्थितीत धर्मद्रोही राज्यकर्त्यांमुळे या देशात बहुसंख्येने असलेले हिंदू असुरक्षित बनले आहेत व परिणामी देशविरोधी घटक सबल होऊन देशाच्या सुरक्षिततेसमोरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही स्थिती बदलण्यासाठी देशात फोफावलेला जिहादी दहशतवाद, धर्मांतर, मंदिर सरकारीकरण कायदा, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, हिंदु संतांच्या हत्या इत्यादी राष्ट्र व हिंदु धर्म यांच्यावरील आघातांच्या विरोधात उभे ठाकणे, हे या देशातील बहुसंख्येने असलेल्या हिंदु धर्मियांचे कर्तव्य ठरते. या दृष्टीने हिंदूंमध्ये जागृती होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीतर्फे आज येथे पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला ३ हजार २०० हून अधिक धर्माभिमानी हिंदूंनी उपस्थित राहून हिंदुसंघटनाचा आविष्कार दाखवला. त्याचबरोबर मान्यवर वक्त्यांनी `हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका’, असा इशारा देश व धर्म द्रोह्यांना दिला. हिंदु संघटनांवर बंदी आणण्याच्या दोन्ही काँग्रेसच्या सरकारच्या प्रयत्नाचा निषेधही या वेळी करण्यात आला. या वेळी सन्माननीय वक्त्यांनी त्यांच्या विचारांतून धर्माभिमानी हिंदूंमध्ये धर्मरक्षणाचे स्फुल्लिंग चेतवले. येथील कुडाळ हायस्कूलच्या भव्य पटांगणावर या सभेचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील वेदपाठशाळेतील ब्रह्मवृंदाने वेदमंत्र म्हणून व भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्री. मधू चव्हाण यांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करून सभेचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी व्यासपिठावर भाजपचे सिंधदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रमोद जठार, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे, धर्मशक्ती सेनेचे श्री. विनय पानवळकर व सनातन संस्थेचे श्री. मदन सावंत हे उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा हिंदु जनजागृती समितीतर्फे सत्कार करण्यात आला. या सभेचे सूत्रसंचालन श्री. संदेश गावडे व कु. शोभना बेहरे यांनी केले. धर्मसभेच्या वेळी देण्यात आलेल्या विविध आवेशपूर्ण घोषणांमुळे हिंदूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
हिंदूंनो, विराट रूप दाखवा, म्हणजे देशद्रोही व हिंदुद्वेषी बांडगुळे आपोआपच नष्ट
होतील ! – आमदार मधू चव्हाण
युद्धभूमीवर अर्जुन नातेवाइकांमध्ये अडकला, तेव्हा श्रीकृष्णाने विराट रूप दाखवले व अर्जुनाला सांगितले, `सर्वकाही मीच करणार तू निमित्तमात्र हो !’ आपण १०० कोटी हिंदू एकत्र येऊन आपल्या शक्तीचे विराट रूप देशद्रोह्यांसमोर उभे करूया. आपोआप देशातील हिंदुद्वेषी बांडगुळे नष्ट होतील. आज हिंदू लाचार झाल्यामुळे आपल्या धर्माला ग्लानी आली आहे. अनेक अत्याचार सहन करावे लागत आहेत. लाचार झाल्यामुळे सर्वच बाजूंनी आपल्यावर अत्याचार होत आहेत. हे बदलण्यासाठी चार लोकांनी नव्हे, तर सर्व हिंदूंनी धर्मरक्षणासाठी एकत्र येऊन हलकल्लोळ केला पाहिजे, असे आवाहन भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्री. मधू चव्हाण यांनी येथे आयोजित हिंदु धर्मजागृती सभेत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना केले. या वेळी अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली.
`दैनिक सनातन प्रभात’चे पत्रकार श्री. संजय जोशी यांचा सत्कार !
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या धर्मरक्षणाच्या कार्याला सातत्याने व्यापक स्तरावर प्रसिद्धी देणार्या `दैनिक सनातन प्रभात’ या वृत्तपत्राचे प्रतिनिधी श्री. संजय जोशी यांचा श्री. मधू चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
हिंदु धर्मजागृती सभेचे वैशिष्ट्य
`समाज, संघटना व साधक यांना अध्यात्म आणि धर्म या विषयी जागृत करणारी, हिंदु संघटनेत एकजूट निर्माण करणारी आणि साधकांमध्ये उत्साह निर्माण करणारी अशी ही धर्मसभा आहे. – ईश्वर (कु. क्षिप्रा वेद यांच्या माध्यमातून)
१. `कुठे निवडणुका आल्यावरच निवडून येण्यासाठी सभा घेणारे सर्व राजकीय पक्ष, तर कुठे केवळ राष्ट्र व धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी सभा घेणार्या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
२. `कुठे जनतेला विविध प्रलोभने दाखवून स्वार्थी बनवणारे व नंतर काही न देणारे राजकीय पक्ष, तर कुठे राष्ट्र व धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणार्या व ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणार्या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
३. कुडाळ शहराची लोकसंख्या १८ हजार आहे. त्याशिवाय कोकणातील गावे दुर्गम भागात असल्यामुळे रहदारीसाठी हा भाग खूप त्रासदायक आहे. असे असतांना कुडाळ येथील सभेला ३ हजार २०० हून अधिक हिंदू उपस्थित असणे, हे हिंदु जनजागृती समितीबद्दल हिंदूंच्या मनात विश्वास व आशा निर्माण होत असल्याचे द्योतक आहे.
हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठिकठिकाणी धर्मजागृती सभा होत आहेत. या सभांच्या वेळी वाईट शक्तींचा त्रास होतो, हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. तो त्रास दूर होण्यासाठी व धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सनातनचे संत पू. निकमतात्या नामजप करत आहेत. – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था
निगडीत वृत्त : धर्मजागृती सभा




