मातृभाषा `मराठी’कडे दुर्लक्ष करून `उर्दू’चा उदोउदो करणे म्हणजे `पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा व वेश्येला मणीहार’ !
मुंबईतील मराठी पत्रकार संघात पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला. या वेळी महाराष्ट्रात चार वर्षे सत्तेवर असूनही मराठी भाषेकडे दुर्लक्ष केलेले व आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठीचा साक्षात्कार झालेले काँग्रेस शासनाचे मुख्यमंत्री म्हणाले, `मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आणि मातृभाषा आहे. राज्यातील कोणत्याही शाळेत मराठी विषयाला अन्य भाषांचा पर्याय देता येणार नाही. वेळप्रसंगी मराठी विषयाची सक्ती सुद्धा सक्तीने केली जाईल.’
आपल्या कारकिर्दीत काँग्रेस शासनाने मराठीला किमान महाराष्ट्रात न्याय मिळेल, यासाठी काय केले, हेही मुख्यमंत्री महोदयांनी या वेळी सांगायला हवे होते. त्यांच्या शासनाने असे काहीच न केल्याने ते या मुद्याला हात कसा घालणार ? या सोहळयात मराठीच्या मुद्यावर मुख्यमंत्री श्री. देशमुख यांना शालजोडे हाणतांना `नवाकाळ’चे संपादक श्री. निळकंठ खाडिलकर म्हणाले, “तुम्ही चारवर्षे खूप काम केलेत. सत्तेच्या पाचव्या वर्षी तरी मराठीला निवारा द्या. फाटक्या वस्त्रात दारात बसलेल्या मराठीला नवा शालू नेसवून मंत्रालयात बसवा.” महाराष्ट्रातील माणूस मराठी त्याची भाषा मराठी. तरीही वरील आवाहन मराठीचा द्रोह करणार्या काँग्रेस शासनाच्या मुख्यमंत्र्यांना करावे लागते, हे मराठी माणसाचे व त्याच्या भाषेचे दुर्दैव म्हणावे लागेल !
मराठी शाळा, मुसलमान आणि उर्दू भाषा !
आपण ज्या राज्यातून निवडून येऊन मंत्रीपद उपभोगत आहोत, त्या राज्यातील जनता ही मराठी भाषिक आहे, हे मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य (अ)मराठी मंत्री सोयीस्कररीत्या विसरले आहेत. मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना (अमराठी सोडून) राज्यातील मराठी माणसे व त्यांची मराठी मातृभाषा यांचे महत्त्व लक्षात घ्यायला वेळ नाही. मुसलमानांची एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी काँग्रेसला त्यांचा व त्यांच्या उर्दू भाषेचा विकास कसा होईल, याचा विचार करण्यास व त्यावर प्रसंगी कृती करण्यास वेळ आहे. महाराष्ट्राचे पाकिस्तान करायला निघालेले मुख्यमंत्री श्री. देशमुख काही दिवसांपूर्वी म्हणाले होते, “मराठी माध्यमाच्या शाळांत उर्दू विषयाचे शिक्षण देण्यात येईल.” राजभाषा मराणासन्न अवस्थेत असतांना व संस्कृत भाषेला हद्दपार करण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस शासनाच्या मुख्यमंत्र्यांना उर्दू भाषेत कोणता जिवंतपणा आढळला ? मातृभाषा मराठीकडे दुर्लक्ष करून उर्दूचा उदोउदो करणे म्हणजे `पतिव्रतेच्या गळयात धोंडा वेश्येला मणीहार’! अशीच अवस्था होईल.
मुख्यमंत्र्यांना मराठीची आठवण का झाली ?
येथे लक्षात घेण्यासारखा प्रश्न म्हणजे मुख्यमंत्री यांना मराठीची सक्ती करण्यासारखी कठोर भाषा आताच का वापरावी लागली ? याचा मागोवा घेतल्यास लक्षात येईल की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी `मराठी’ हा त्यांच्या कार्यक्रमाचा मुख्य मुद्दा बनवला व त्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मराठीच्या मुद्याचे श्रेय श्री. ठाकरे यांना जाणार व आपल्यापासून मराठी माणूस दूरावणार, याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो, हे जाणून काँग्रेसमधील काहींनी (ज्यांना मराठीबद्दल काही तरी वाटते) मराठी भाषेची बाजू घेण्यास सुरुवात केली. जर पुढे होणार्या निवडणुका घोषित झाल्या नसत्या, तर काँग्रेसमधील तथाकथित मराठी मंडळींनी मराठीचे नावतरी घेतले असते का, ते देवच जाणो !
काँग्रेस शासनाचा घातकी निर्णय !
महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये काँग्रेस शासनाने पहिलीपासून इंग्रजी विषय सक्तीचा करण्याचा घातकी निर्णय घेऊन मराठीच्या पायावर कुर्हाडच मारली आहे. पहिलीपासून पदवीपर्यंत इंग्रजी भाषा विषय अनिवार्य करण्यात आला आहे. हा न्याय इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणात मराठीला लागू नाही. हा इंग्रजीधार्जिणा निर्णय घेतांना शासनाने जी तत्परता दाखवली, ती मराठी भाषेचा प्रसार व विकास यांसाठी दाखवली असती, तर आज वेगळे चित्र पहायला मिळाले असते. दक्षिणेतील राज्यांमध्ये तेथील भाषेच्या विकासासाठी मंत्रिमंडळात स्वतंत्र खाते आहे; मात्र अशा खात्याची महाराष्ट्र शासनाला आवश्यकता वाटत नाही हे मराठीचे दुर्दैव ! अशा खात्याची मागणी मराठी जनतेने लावूनच धरली, तर शासन ते निर्माणही करील; मात्र अशा खात्यावर मंत्री म्हणून कृपाशंकरसिंह यांच्यासारख्या अमराठींची वर्णी काँग्रेस शासनाने लावली तर नवल वाटायला नको !
मराठीच्या सर्वंकष उत्कर्षासाठी काँग्रेसच्या शासनामध्ये प्रचंड राजकीय इच्छाशक्ती हवी. स्वत:ला जमत नाही तर समाजातील भाषेच्या निष्णातांची मदत घेऊन मातृभाषा मराठीचे वैभव वाढवणे कठीण नाही. तसे झाले तरच मराठीविषयी बोलल्याचे सार्थकी लागेल अन्यथा नाही, हे काँग्रेस शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यावे !



