शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजापूरमध्ये हिंदूंच्या संघटित शक्‍तीचे दर्शन !

राजापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेस ४ हजार ५०० हिंदूंची उपस्थिती !

राजापूर, १६ नोव्हेंबर (वार्ता.) – समर्थ रामदासस्वामी व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि महान योगी प.पू. गगनगिरी महाराज यांचे साधनास्थळ असलेल्या राजापूर नगरीत ४ हजार ५०० हून अधिक हिंदूंनी `हिंदु धर्मजागृती सभे’ला उपस्थिती लावून त्यांच्या संघटित शक्‍तीचे दर्शन घडवले.

हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या या `हिंदु धर्मजागृती सभे’ची सुरुवात ब्रह्मवृंदाने केलेल्या वेदमंत्रांच्या पठणाने झाली. वेदमंत्रांतून निर्माण झालेल्या चैतन्यदायी वातावरणात ओणी-कोंडीवळे येथील प.पू. गगनगिरी महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते कयपंजीने दीपप्रज्वलन करण्यात आले. व्यासपिठावर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख श्री. राजन साळवी, धर्मशक्‍ती सेनेचे श्री. विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे, सनातन संस्थेचे श्री. मदन सावंत आदी उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा समितीचे श्री. संजय जोशी यांनी मांडला.

निधर्मी शिक्षणप्रणालीमुळे समाज धर्मशिक्षणापासून वंचित ! – प.पू. उल्हासगिरी महाराज
हिंदूंना आज धर्मशिक्षणाची अत्यंत गरज आहे. निधर्मी शिक्षणप्रणालीमुळे समाजाला धर्मशिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. तरुण पिढीला धर्मसंस्कारापासून दूर नेले जात आहे. मंदिर सरकारीकरण कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली केला जात असलेला अंधश्रद्धा निर्मूलन कायदा यांद्वारे हिंदूंच्या धार्मिक श्रद्धांना तडा देण्याचे काम केले जात आहे. सनातन संस्थेसारख्या राष्ट्र व धर्म यांसाठी कार्य करणार्‍या संस्थेवर बंदी आणण्याचे षड्यंत्र आखले जात आहे. हिंदु धर्मातील देवतांचे सर्रास विडंबन होत आहे. अनेक संतांवर हल्ले होत आहेत. त्यांना जिवे मारण्याच्याही धमक्या दिल्या जात आहेत. हिंदुबहुल भारतामध्ये हिंदूंचे धर्मग्रंथ जाळले जात आहेत. अशा स्थितीत निद्रिस्त हिंदूंना जागृत करून आपल्या धर्माचा भगवा ध्वज या विश्‍वात चिरंतन फडकत ठेवूया !

सण व उत्सव साजरे करण्यात धार्मिकता असावी ! – मदन सावंत, सनातन संस्था
आपण करत असलेल्या धर्मजागृतीच्या चळवळीला ईश्‍वराचे अधिष्ठान पाहिजे. आपल्या देवतांची अश्लील चित्रे काढली जात असतांना निद्रिस्त हिंदू षंढपणे बघत रहातात. धर्मावरील आघातांना जो विरोध करतो, तोच खरा हिंदुत्ववादी. हिंदूंनी व्यष्टी साधनेकडे लक्ष देऊन स्वत:मधील अहं व दोष यांचे निर्दालन केले पाहिजे. सण व उत्सव साजरे करण्यात धार्मिकता असली पाहिजे. उत्सव त्या त्या तिथीला साजरे केले, तरच देवतांच्या तत्त्वाचा लाभ होतो. आपण जे संस्कार करतो, त्यांना मनुष्याच्या जीवनात खूपच महत्त्व आहे. आज राज्यकर्ते हिंदु असूनही धर्मासाठी काहीही करत नाहीत. त्यामुळे आता हिंदु जनतेनेच धर्माकरता कृतीशील व्हायला हवे !

हिंदूंना स्वत:चे रक्षण स्वत: करण्यासाठी धर्माचे पाठबळ आवश्यक ! – विनय पानवळकर, धर्मशक्‍ती सेना
जिहादी दहशतवाद, संतांच्या हत्या व हिंदु धर्मावर होत असलेले आघात यांची जाणीव होऊनही हिंदु जागा होत नाही. काँग्रेसवाल्यांना सगळीकडे बाँबस्फोट झाले की, सनातनवालेच दिसतात. काँग्रेस सरकार बजरंग दल, सनातन संस्था व अनेक हिंदुत्ववादी संघटनां यांना अडकवण्याचा प्रयत्‍न करत आहे. स्वत:चे रक्षण स्वत: करायला हिंदूंना धर्माचे पाठबळ आवश्यक आहे. समाजातील प्रत्येकाने शरीर बळकट करावे व हिंदूंना एकत्र करावे, यासाठी धर्मशक्‍ती सेनेची स्थापना करण्यात आली आहे. धर्मशक्‍ती सेनेने सुरू केलेल्या प्रशिक्षणवर्गात सहभागी व्हा. प्रत्येकाला जिवंत रहाण्यासाठी स्वत:चे मनगट बळकट करायला पाहिजे. मनाची शक्‍ती वाढवण्यासाठी स्वसंरक्षणाची आवश्यकता आहे.


हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने ठिकठिकाणी धर्मजागृती सभा होत आहेत. या सभांच्या वेळी वाईट शक्‍तींचा त्रास होतो, हा प्रत्येक वेळचा अनुभव आहे. तो त्रास दूर होण्यासाठी व धर्मजागृती सभा निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी सनातनचे संत पू. निकमतात्या नामजप करत आहेत. – डॉ. जयंत बाळाजी आठवले, संस्थापक, सनातन संस्था

१. `कुठे निवडणुका आल्यावरच निवडून येण्यासाठी सभा घेणारे सर्व राजकीय पक्ष, तर कुठे केवळ राष्ट्र व धर्म यांच्या संदर्भात जागृती होण्यासाठी सभा घेणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
२. `कुठे जनतेला विविध प्रलोभने दाखवून स्वार्थी बनवणारे व नंतर काही न देणारे राजकीय पक्ष, तर कुठे राष्ट्र व धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करायला शिकवणार्‍या व ईश्‍वरप्राप्‍तीचा मार्ग दाखवणार्‍या हिंदु जनजागृती समिती व सनातन संस्था !’
३. राजापूर शहराची लोकसंख्या ९ हजार आहे. त्याशिवाय कोकणातील गावे दुर्गम भागात असल्यामुळे रहदारीसाठी हा भाग खूप त्रासदायक आहे. असे असतांना राजापूर येथील सभेला ४ हजार ५०० हून अधिक हिंदू उपस्थित असणे, हे हिंदु जनजागृती समितीबद्दल हिंदूंच्या मनात विश्‍वास व आशा निर्माण होत असल्याचे द्योतक आहे.

हिंदु धर्मजागृती सभेचे वैशिष्ट्य
`समाज, संघटना व साधक यांना अध्यात्म आणि धर्म या विषयी जागृत करणारी, हिंदु संघटनेत एकजूट निर्माण करणारी आणि साधकांमध्ये उत्साह निर्माण करणारी अशी ही धर्मसभा आहे.- ईश्‍वर (कु. क्षिप्रा वेद यांच्या माध्यमातून)

`हिंदु धर्मजागृती सभे’चे वृत्त असलेले `दैनिक सनातन प्रभात’चे अंक व इतर वृत्तपत्रे पुढील धर्मजागृती सभांच्या व इतर प्रसारासाठी अर्पण करा !
हिंदु धर्मजागृती सभेचे छायाचित्र व वृत्त असलेले `सनातन प्रभात’ तसेच इतर वृत्तपत्रांचे अंक पुढील हिंदु धर्मजागृती सभांच्या वेळी व एरव्हीही करण्यात येणार्‍या प्रसारासाठी उपयोगी पडतील. प्रसार सेवकांनी स्वत:साठी ठेवलेले अंक कोणाला न देता फक्‍त दाखवण्यासाठी वापरावेत. साधकांनी ते अंक एकत्र करून नजीकच्या आश्रमात पाठवून द्यावेत. आज प्रसिद्ध झालेल्या इतर मजकुरासाठी हा अंक संग्रही ठेवणार असल्यास अंक जमा करण्याची आवश्यकता नाही.

निगडीत वृत्त : धर्मजागृती सभा

Leave a Reply