मालेगाव बाँबस्फोट प्रकरण
गोरखपूर, ११ नोव्हेंबर (वृत्तसंस्था) – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात उत्तरप्रदेशमधील एका आमदाराची चौकशी करण्यासंदर्भात उत्तरप्रदेश सरकारने परवानगी देऊन सहकार्य करावे, असे पत्र महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने त्यांना लिहिले आहे, असे काल दहशतवादविरोधी पथकाच्या वकिलाने सांगितले. त्यावर “केंद्र सरकार व महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक यांनी तसे करूनच पहावे”, असे आव्हान देणारी प्रतिक्रिया भाजपचे गोरखपूर येथील खासदार योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने कोणाच्या सांगण्यावरून कारवाई करू नये, असा सल्ला त्यांनी केंद्र सरकारचे नाव टाळून दहशतवादविरोधी पथकाला दिला. ते म्हणाले, “साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या चाचण्यांवर चाचण्या सुरू आहेत; पण त्याच पद्धतीने मागे बाँबस्फोट करणार्या अन्य जिहादी दहशतवाद्यांच्या चाचण्या करण्यात आल्या नाहीत.” (चौकशी करतांना राजकारण्यांप्रमाणे मुसलमानांना झुकते माप देणारे महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक ! – संपादक) दहशतवादविरोधी पथकाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. त्यामुळे खासदार योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या वक्तव्याला काही महत्त्व नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्यावर नोंदवली. लेफ्टनंट कर्नल श्री. श्रीकांत पुरोहित यांनी लष्करी गुप्तचर यंत्रणेचा निधी मालेगावमध्ये बाँबस्फोट करण्यासाठी व `अभिनव भारत’ ही संघटना उभारण्यासाठी केला, असा आरोप त्यांच्या चौकशीनंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने केला आहे. लेफ्टनंट कर्नल श्री. श्रीकांत पुरोहित यांच्या चौकशीनंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने उत्तरप्रदेशकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी फारुखाबाद व पूर्व उत्तरप्रदेश येथे घडलेल्या घटनांचा वेध महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथक घेत आहे.
योग गुरु बाबा रामदेव यांचा साध्वी प्रज्ञा यांना पाठिंबा
अहमदाबाद – सुप्रसिद्ध योग गुरु बाबा रामदेव यांनी मालेगाव येथील बाँबस्फोटाच्या प्रकरणात अटकेत असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे.


