हिंदुत्वाचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शेकडो धर्माभिमानी रस्त्यावर उतरले !

विविध नामदिंड्यांना असलेली धर्माभिमान्यांची उपस्थिती, ही सनातनवर बंदी आणू पहाणार्‍यांना चपराक !

पुणे जिल्ह्यातील २ नामदिंड्यांनतर ठाणे व सोलापूर येथेही उत्स्फूर्त नामदिंडी : ठिकठिकाणच्या धर्माभिमानी हिंदूंकडून शासनाचा तीका निषेध !

सनातनवरील संभाव्य बंदीच्या निषेधार्थ नामदिंडी

ठाणे, ९ नोव्हेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र शासन सनातन संस्थेवर आणू पहात असलेल्या अन्याय्य बंदीच्या निषेधार्थ हिंदुत्वाचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शेकडो धर्माभिमानी महिला व पुरुष आज रस्त्यावर उतरले आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सज्ज असल्याचा प्रत्ययच जणू ठाणेकरांना दिला !

अकराशेहून अधिक धर्माभिमान्यांनी आज सायंकाळी ४.३० वाजता तलावपाळी येथील दत्तमंदिर येथून निघालेल्या नामदिंडीत सहभागी होत देशप्रेमी व धर्मप्रेमी सनातनवर बंदी आणू पहाणार्‍या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात नामदिंडीच्या माध्यमातून निषेध नोंदवला. ह.भ.प. एकनाथ महाराज सद्‍गीर यांच्या हस्ते ध्वजपूजन झाल्यावर शिवसेनेचे आमदार व ठाणे जिल्हाप्रमुख श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नारळ वाढवून नामदिंडीस प्रारंभ झाला. सनातनचे साधक, वाचक, हितचिंतक व अन्य धर्माभिमानी हिंदू सहभागी झालेली व दीड किलोमीटर लांबीची ही नामदिंडी ठाण्यातील गजबजलेला राम मारुती मार्ग व ठाणे शहरातील मुख्य रस्ता असलेल्या गोखले मार्गावरून निघून परत दगडी शाळामार्गे जाऊन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ समाप्‍त झाली व तिथे तिचे उत्स्फूर्तपणे निषेधसभेत रूपांतर झाले. या निषेधसभेत मान्यवरांनी मांडलेल्या हिंदुत्वाच्या प्रखर विचारांनी उपस्थित धर्माभिमान्यांचे क्षात्रतेज जागृत होऊन धर्मशक्‍तीचे प्रकटीकरण झाले !

सनातनरूपी सूर्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्‍न केलात, तर भस्म व्हाल ! – रमेश शिंदे, महाराष्ट्र प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती
आज सनातनने आपली शक्‍ती दाखवलेली आहे. ही शक्‍ती धर्माची शक्‍ती आहे. धर्माच्या प्रसारासाठी ही शक्‍ती वापरली जात आहे. आज या नामदिंडीमध्ये सहभागी झालेली बालसंस्कारवर्गातील लहान मुले, सुसंस्कृत व मध्यमवर्गातील महिला व पुरुष यांना महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील दहशतवादी म्हणत असतील, तर त्यांनी मदरशामध्ये जाऊन बघावे, तेथे लहान मुलांना काय शिकवले जाते. राज्यकर्त्यांनी सनातनवर बंदी आणण्याचा प्रयत्‍न केल्यास सनातनचे साधक घरोघरी जाऊन सरकारच्या विरोधात `हे सरकार कसे हिंदूविरोधी आहे, हिंदूवर कसा अन्याय करत आहे’, याबाबत प्रचार करतील. तेव्हा तुमच्या खुर्च्या कुठच्या कुठे उडून जातील, ते कळणारसुद्धा नाही. सनातनरूपी सूर्यावर बंदी घालणे, तर दूरच; पण जवळ जाण्याचा प्रयत्‍न जरी केला, तर तुम्ही भस्म व्हाल, असा इशारा हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्‍ते श्री. रमेश शिंदे यांनी दिला.

रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावून केलेली चूक करू नका ! – अभय वर्तक, प्रवक्‍ते, सनातन संस्था
सनातन संस्था देशद्रोही आहे. तिच्यावर बंदी घातली पाहिजे, असे चिंतन कृषिमंत्री व गृहमंत्री यांनी केले आहे. सनातनने केलेल्या सूक्ष्मातील संशोधनानुसार आसुरी शक्‍ती संत व साधक अशा सात्त्विक व्यक्‍तींच्या समोर आल्या की, त्यांना त्रास होतो, ते तडफडायला लागतात, त्याचप्रमाणे सनातन संस्था व तिचे साधक म्हटल्यावर राज्यकर्त्यांमधील असुरांना त्रास होऊ लागला आहे व सनातन दहशतवादी असल्याचे ते ठरवू पहात आहेत. सनातन संस्था ही आध्यात्मिक व राष्ट्रप्रेमी संस्था आहे. ईश्‍वराच्या संकल्पाने स्थापन झालेल्या संस्थेवर बंदी घालण्याचा विचार करू नका, ती तुमच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. नुसता विचार केल्यावर इतके हिंदू रस्त्यावर आले आहेत. आबा, रावणाने हनुमानाच्या शेपटीला आग लावून जी चूक केली ती तुम्ही करू नका, असा इशारा सनातन संस्थेचे प्रवक्‍ते श्री. अभय वर्तक यांनी दिला.

हिंदु धर्माला पाठिंबा देणारे राज्यकर्ते निवडा ! – भगवान ढाकणे, अध्यक्ष, नवी मुंबई, भाजप
राष्ट्रीय स्वयंसेवक संघानंतर आता सनातनवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे. सनातन संस्थेने केलेले कार्याचा अभिमान वाटला पाहिजे. सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आज संभाव्य बंदीच्या निषेधासाठी मिळालेल्या या प्रतिसादानंतर सरकारच्या आता लक्षात आले असेल. यापुढे सर्व हिंदूंना विनंती आहे की, येत्या निवडणुकीत हिंदु धर्माला पाठिंबा देणारे राज्यकर्ते निवडून द्या, असे आवाहन नवी मुंबई भाजप शहर अध्यक्ष श्री. भगवान ढाकणे यांनी केले.

मान्यवर म्हणतात…
सनातनवर बंदी घालणे घोर पाप ! – ह.भ.प. एकनाथ महाराज सद्‍गीर, अध्यक्ष, ठाणे जिल्हा विहिंप – सनातन संस्थेसारख्या पवित्र हिंदु धर्माचे कार्य करणार्‍या संस्थेवर बंदी घालणे म्हणजे आणखी एक घोर पाप केल्यासारखे आहे.
श्री. रवींद्र प्रभुदेसाई, कोकण प्रांत उपाध्यक्ष, विहिंप – सरकारच्या विरोधात बोलण्याचा व्यक्‍ती, तसेच संस्था यांना अधिकार असतो. मुळात गडकरी रंगायतन येथे झालेल्या बाँबस्फोटाला संस्थेने कधीही पाठिंबा दिलेला नाही. तरीही तिच्यावर बंदी आणण्याचे जे षड्यंत्र सुरू आहे, ते बरोबर नाही. सरकार ज्या मूलभूत समस्या सोडवू शकत नाही, त्या सनातनसारखी संस्था बदलू शकते.
श्री. शॉन क्लार्क, संपादक, स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन - सनातन संस्था ही संपूर्णत: धर्मासाठी वाहून घेतलेली आणि राष्ट्राची एकता व रक्षण यांसाठी कार्य करणारी संस्था आहे. तिच्यावर बंदी आणून तिच्या कार्यात बाधा आणली जात आहे. संस्थेच्या विरोधात कोणतेही पुरावे नसतांना तिच्यावर कारवाई केली जात आहे. जर हिंदूंनी अशा बंदीला विरोध केला नाही, तर दुर्दैवी तेच असतील.
श्री. संदीप लेले, सरचिटणीस, भाजप ठाणे शहर जिल्हा - जे केंद्र सरकार अफजलला फाशी देण्याचा निर्णय अमलात आणत नाही, त्याचे पाईक असलेले राज्यशासन सनातनवर बंदी आणण्याचा विचार करत आहे, हे म्हणजे मुसलमानांच्या लांगूलचालनाची परिसीमा आहे. असे केले, तर महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने हा शिशुपालाचा शेवटचा अपराध समजावा. मग त्यांची गच्छंती अटळ आहे.
एक पोलीस अधिकारी - आजच्या घडीला हिंदूंमध्ये जागृती झालीच पाहिजे. हिंदुत्व म्हणजे काय, हे समजून घेतले पाहिजे. सरकार कोणत्याही परिस्थितीत सनातनवर बंदी आणूच शकत नाही. ही नामदिंडी अत्यंत शिस्तबद्ध व शांतपणे सुरू होती. त्यामुळे आम्हाला व वाहतुकीला कोणताच त्रास झाला नाही.
एक पोलीस कर्मचारी - आम्हालाही या सर्व गोष्टींचा अभिमान आहे. केवळ वर्दी असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही. आम्ही तुमच्या सेवेसाठी आहोत, ही फेरी अत्यंत शिस्तबद्ध आहे.

क्षणचित्रे
* या नामदिंडीत अनेक वृद्ध महिला सहभागी झाल्या होत्या. त्यांना काही वेळाने गाडीत बसण्याची विनंती केली असता त्यांनी संपूर्ण दिंडी चालण्याचा निर्धार व्यक्‍त केला.
* नामदिंडींतील साधकांची प्रत्येक कृती पोलीस टिपून घेत होते.
* सभेच्या शेवटी `वन्दे मातरम्’ सुरू झाल्यावर पोलिसांच्या गाडीत आसनावर बसलेले पोलीस जागेवर उभे राहिले.
* या वेळी `सनातनवर बंदी’ विशेषांकाचे व सनातनवर बंदी घालण्याच्या निषेधार्थ पत्रकांचे वितरण करण्यात आले.
* फेरीच्या सुरुवातीस ध्वजपूजनापूर्वी व श्रीफळ वाढवल्यावर दोन वेळा केलेल्या शंखध्वनीने वातावरणात चैतन्य निर्माण झाले व धर्माभिमान्यांमध्ये उत्साह संचारला.
* रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतींवरून अनेक जण उत्सुकतेने नामदिंडी बघत होते.
* अबालवृद्ध सहभागी झालेल्या या दिंडीने कोणताही वाहतूक अडथळा झाला नाही.

पोलिसांचा मोठा बंदोबस्त
या नामदिंडीला पोलिसांकडून उत्तम सहकार्य लाभले. फेरीला पोलीस उपायुक्‍त जातीने हजर होते. दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी, चार पोलीस निरीक्षक, अनेक हवालदार व महिला पोलीस, तसेच पोलिसांच्या तीन गाड्या असा पोलीस बंदोबस्त होता.

सनातनवरील बंदीच्या निषेधार्थ सनातनने काढलेल्या या नामदिंडीला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा होता.

Leave a Reply