दहशतवादविरोधी पथकाच्या अन्यायाबाबत मानवाधिकार आयोगाकडे दाद मागणार ! – हिमानी सावरकर

पुणे, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाच्या तपासकामात दहशतवादविरोधी पथक (एटीएस्) दादागिरी करत असल्याचा स्पष्ट आरोप `अभिनव भारत’ संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती हिमानी सावरकर यांनी आज येथे एका पत्रकार परिषदेत केला. त्यांची दादागिरी व अन्याय आम्ही सहन करणार नसून याविरोधात त्वरित मानवाधिकार आयोग व महिला आयोग यांकडे दाद मागणार आहोत, असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेनंतर श्रीमती सावरकर या केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेण्यासाठी तातडीने दिल्लीला रवाना झाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “मालेगाव प्रकरणात दहशतवादविरोधी पथकाने साध्वी प्रज्ञासिंग यांना १० ऑक्टोबरला अटक करून २४ ऑक्टोबरला न्यायालयात हजर करणे, हे अन्यायकारक आहे. याशिवाय साध्वी प्रज्ञासिंग या संन्यासी आहेत. कायद्यानुसार संन्याशाची कुठलीच मालमत्ता असू शकत नाही. त्यामुळे मालेगाव बाँबस्फोटाच्या वेळी सापडलेली मोटरसायकल त्यांच्या मालकीची कशी असू शकते ? प्रज्ञासिंग या साध्वी असून त्यांना अटक करतांना पुरुष पोलिसाने गाडीत ढकलणेही अत्यंत आक्षेपार्ह आहे. (साध्वींना पुरुष पोलिसाने गाडीत ढकलले असेल, तर पोलिसांच्या या बेमुर्वतखोर वर्तनाचा धिक्कार प्रत्येक हिंदूने सनदशीर मार्गाने करावयास हवा ! – संपादक) साध्वी प्रज्ञासिंग यांच्या धार्मिक व सामाजिक कामांकडे डोळेझाक केली जात आहे”, असेही त्यांनी सांगितले.

श्रीमती सावरकर यांनी अनुभवलेला `पोलिसी दहशतवाद’ !
साध्वी प्रज्ञासिंग यांच्या समर्थनार्थ नाशिक येथील आंदोलनाच्या वेळी पोलिसांच्या दादागिरीचा आलेला अनुभव कथन करतांना त्या म्हणाल्या, “या आंदोलनाच्या वेळी साध्वी प्रज्ञासिंग यांना भेटून `भगवद्‍गीता’ हा ग्रंथ मला त्यांना द्यावयाचा होता, तसेच त्यांच्या वकिलांची भेट घ्यावयाची होती. मी पोलिसांना त्याबाबत विनंती केली. यासाठी मी रीतसर मार्ग अवलंबला; मात्र माझे म्हणणे ऐकून न घेता पोलिसांनी `तुम्ही जर न्यायालयाच्या आवारात आलात, तर तुम्हालाही आम्ही उचलून अटक करू’, अशा धमकीवजा शब्दांत मला उत्तर दिले. (जनतेशी असे वागणारे पोलीस स्वत:ला जनतेचे मालक समजतात कि काय ? या पोलिसांनी हे लक्षात ठेवावे की, ते जनतेचे सेवक आहेत व जनतेने घाम गाळून कर भरून शासनाकडे जमा केलेल्या पैशातून ते पगार घेत आहेत ! – संपादक) साध्वी प्रज्ञासिंग यांना भेटणे माझे कर्तव्य होते व भगवद्‍गीता देणे या माझ्या धार्मिक भावना होत्या. पोलिसांच्या या उत्तरामुळे आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. (मुसलमानांना असे उत्तर देण्याचे धाडस पोलिसांमध्ये आहे का ? हिंदू सनदशीर भाषेत बोलतात, म्हणून पोलीस हिंदूंवर रुबाबी करतात का ? – संपादक) पोलिसांचे असे वागणे हादेखील एक प्रकारचा `पोलिसी दहशतवाद’च म्हणावा लागेल.” मालेगाव बाँबस्फोटाबाबत वृत्तवाहिन्यांकडून वारंवार
`हिंदु दहशतवाद’ असा चुकीचा उल्लेख केला जात असल्याचे सांगून वृत्तवाहिन्यांच्या हिंदुद्वेषी पत्रकारितेचा श्रीमती सावरकर यांनी समाचार घेतला. “हिंदूंना दहशतवादी ठरवले जात असेल, तर आतापर्यंतचा दहशतवाद हा इस्लामी म्हणायचा का ?”, असा
प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्वश्री राकेश धावडे, कर्नल पुरोहित व अन्य दोघे वगळता उर्वरित सर्व `अभिनव भारत’चे कार्यकर्ते असून आम्ही सर्वांना कायदेशीर मदत करणार आहोत, असे श्रीमती हिमानी सावरकर यांनी या वेळी जाहीर केले. या पत्रकार परिषदेस स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे सचिव श्री. विद्याधर नारगोलकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सारंग अकोलकर, प्रतापगड उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. संजय भोसले व उपाध्यक्ष श्री. राज यादव, लष्कर विभाग गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अधिवक्‍ते प्रशांत यादव, मठ-मंदिर अधिग्रहण विरोधी समितीचे पश्चिम भागाचे संयोजक श्री. विजय कोल्हटकर आदी उपस्थित होते.

श्रीमती सावरकर यांच्याकडून `दैनिक सनातन प्रभात’चे विशेष अभिनंदन !
या सर्व प्रकरणास `दैनिक सनातन प्रभात’ या वृत्तपत्राने योग्य पद्धतीने प्रसिद्धी दिल्याचे सांगून श्रीमती हिमानी सावरकर यांनी `दैनिक सनातन प्रभात’चे विशेष अभिनंदन केले.

`हिंदु लीगल एड फर्म’ची स्थापना !
हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात हिंदूंनी एकत्र येऊन `हिंदु लीगल एड फर्म’ची स्थापना केली असल्याची माहिती श्रीमती सावरकर यांनी या वेळी दिली. जेव्हा जेव्हा हिंदूंवर अन्याय होईल, तेव्हा तेव्हा त्यांना याद्वारे मदत करण्यात येणार आहे. दिल्ली येथील कोटक महिंद्रामध्ये हे खाते उघडण्यात आले आहे, असे श्रीमती सावरकर यांनी सांगितले. (अन्यायग्रस्त हिंदूंसाठी संघटना स्थापन करणार्‍या समस्त संबंधित हिंदूंचे अभिनंदन ! प्रत्येक हिंदूने सनदशीर मार्गाने या संघटनेच्या कार्यात सहभागी व्हावे ! – संपादक)

शरद पवार व छगन भुजबळ यांना अटक केली का ?
नार्को चाचणीबाबत बोलतांना त्या म्हणाल्या, “व्यक्‍ती बेसावध असल्याने नार्को चाचणी हा ग्राह्य पुरावा धरला जाऊ शकत नाही; मात्र जर तो ग्राह्य धरला जात असेल, तर बनावट मुद्रांक प्रकरणाचा प्रमुख सूत्रधार अब्दुल करीम तेलगी यानेही त्याच्या नार्को चाचणीत शरद पवार व छगन भुजबळ यांची नावे घेतली होती. त्यांना अटक होत नाही; मात्र हिंदू सापडले की, त्यांना धरा व धोपटा, अशी नीती अवलंबली जात आहे.” (हिंदूंनो, असा हिंदुद्वेष्टा मनमानी कारभार करणार्‍या काँग्रेस सरकारला पुढील निवडणुकीत पराभूत करा ! – संपादक)

|

निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!

Leave a Reply