एखाद्या मुद्यावरून कायदा व सुव्यवस्था बिघडवणार्या प्रसिद्धीमाध्यमांवर अंकुश न ठेवणारे काँग्रेस सरकार !
मराठी भाषिक जनतेच्या न्याय्य हक्कासाठी प्रयत्नशील असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेने(मनसे)चे नाव आता देशाच्या कानाकोपर्यात पोहोचले आहे. तसे पहाता मनसेचा उदय झाल्यापासून त्या संघटनेचे ध्येयधोरणाला अनुसरून कार्य सुरूच आहे; मात्र दोन आठवड्यांपूर्वी रेल्वे नोकरभरती परीक्षेच्या वेळी परीक्षार्थींना पळवून लावायचा जो प्रकार झाला, तेव्हापासूनचा पुढील घटनाक्रम लक्षवेधी ठरला आहे.
मनसेचे प्रमुख श्री. राज ठाकरे यांना रत्नागिरी येथे पहाटेच्या वेळी अटक झाली, त्यांना तेथून आणून मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले, मुंबईच्या न्यायालयात जामीन मिळाल्यावर त्यांचा ताबा कल्याण पोलिसांनी घेतला व तेथून नेऊन त्यांना कल्याणच्या न्यायालयात हजर करण्यात आले. कल्याण न्यायालयाची वेळ त्या दिवशी संपलेली असल्यामुळे श्री. राज ठाकरे यांना पोलीस ठाण्यात रात्र घालवावी लागली. राज्य सरकारनिर्मित हे नाट्य सुरू असतांना मुंबई, ठाणे, नाशिक, नागपूर, पुणे या महत्त्वाच्या शहरांत मनसेच्या कार्यकर्त्यांर्ची जोरदार चळवळ सुरू होती. या चळवळीच्या दरम्यान राष्ट्रीय संपत्तीचे झालेले नुकसान अपरिमित होते, हे लक्षात घेऊन ही नुकसानभरपाई संबंधितांकडून वसूल करण्याची तरतूद असलेला कायदा महाराष्ट्र मंत्रीमंडळात संमत झाला. रेल्वे कर्मचारी भरती परीक्षा देण्यासाठी बिहारमधून आलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. हा मृत्यू परीक्षेच्या वेळी झालेल्या हिंसाचारामुळे झाली कि रेल्वे अपघातामुळे झाला, याविषयी मतप्रदर्शन करण्यास वाव नाही. बिहारच्या सरकारला हा मृत्यू रेल्वे अपघातामुळे झाला आहे, असे कळवण्यात आल्याचे एका दूरचित्रवाहिनीवर सांगितले गेले. मनसेचे नेते श्री. राज ठाकरे यांची हत्या करण्यासाठी बिहार राज्यातील राहुल राज हा तरुण मुंबईत आला. मुंबई शहराच्या कुर्ला उपनगरात तो एका बसमध्ये चढला, त्या वेळी त्याच्याजवळ एक पिस्तूल होते. बिहारमध्ये शस्त्रास्त्रे बाळगणे व त्यांचा उपयोग करणे किती सोपे आहे, हे यावरून लक्षात येते. त्याने राज ठाकरे यांना ठार मारण्याचा स्वत:चा मनोदय उघड केला आणि पोलिसांबरोबर उडालेल्या चकमकीत तो तरुण मारला गेला. सकाळच्या प्रहरी कामाधंद्यावर जाणार्या कार्यालयीन कर्मचार्यांनी भरगच्च भरलेल्या बसमध्ये त्या तरुणाने गोळीबार केला असता, तर तो काश्मीरमधील दहशतवादी घातपातांची आठवण करून देणारा प्रसंग ठरला असता. हा तरुण पोलिसांबरोबरच्या चकमकीत ठार झाला, तेव्हा राज्याचे गृहमंत्री श्री. रा.रा. पाटील यांनी गर्जना केली, ` गोळीचे उत्तर गोळीनेच मिळेल.’
वस्तूस्थिती ओळखा !
गृहमंत्र्यांनी केलेली ही घोषणा वस्तूस्थितीला नजरेसमोर ठेवून अभ्यासायला हवी. राहुल राज ज्या बसमधून प्रवास करत होता, त्या बसमध्ये शंभरच्या आसपास प्रवासी असणे केव्हाही स्वाभाविक आहे. श्री. राज ठाकरे यांची हत्या करण्यासाठी सैरभैर झालेल्या या तरुणाने जर निराशेच्या गर्तेत बसमध्येच गोळीबार केला असता, तर जे परिणाम झाले असते, त्यांची कल्पनाच केलेली बरी. बसप्रवाशांवरील मोठे संकट टळले, एक जण मारला गेला तरी हरकत नाही, या विचाराने हर्षभरित गृहमंत्र्यांनी त्यांची प्रतिक्रिया देतांना `गोळीचे उत्तर गोळीनेच मिळेल’, असे म्हटले असावे, असा एक मतप्रवाह आहे. डोईजड ठरणार्या गुन्हेगाराला कायद्याचा बडगा दाखवून त्याच्यात सुधारणा होईल याची काय हमी ? `जशास तसे’ उत्तर देण्याचा प्रघात आहे, तसेच आपला इतिहास सांगतो त्याप्रमाणे पायदळाशी पायदळाचे युद्ध आणि घोडेस्वारांशी घोडेस्वारांचे युद्ध. बिहारचे नेते म्हणतात त्याप्रमाणे सशस्त्र राहुल राज याला पकडण्यासाठी पोलीस गेले असते, तर ते जिवंत राहिले असते का ?
उपद्व्याप व सारवासारव !
गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रसिद्धी माध्यमे नव्याने वादळ उठवण्याचे उपद्व्याप कशासाठी करत आहेत ते मात्र कळत नाही. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र मंत्रीमंडळातील सदस्य श्री. छगन भुजबळ नांदेड आणि पुणे येथे दौर्यावर असतांना गृहमंत्र्यांनी गोळीबाराची भाषा केल्याबद्दल पत्रकारांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले. गोळीला गोळीने उत्तर देण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही, कोणी तसे विधान केले असेल, तर ते त्यांचे वैयक्तिक मत असेल, असे श्री. भुजबळ यांनी उत्तर देऊन वेळ निभावून नेली. श्री. भुजबळ यांची ही सारवासारव काहीच उपयोगाची नाही. गृहमंत्री हे राज्याच्या मंत्रीमंडळातील जबाबदार व्यक्तीमत्त्व असल्यामुळे त्यांचे विधान म्हणजे `राज्यशासनाचे धोरण’ असे साधे समीकरण असते. तसे असतांना गृहमंत्र्यांच्या विधानाची जबाबदारी त्यांच्या पक्षाने कशाला घ्यायला हवी ? `गोळीचे उत्तर गोळीने देऊ’, असे गुन्हेगारांना ठणकावून सांगण्यात अधर्म तो कोणता ?



