निधर्मीवाल्यांना अफझल प्यारा, तर आम्ही साध्वी प्रज्ञा, रमेश उपाध्याय व समीर कुलकर्णी यांच्यावर प्रेम का करू नये ? – शिवसेनाप्रमुखांचा घणाघात

मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात हिंदूंच्या बदनामीच्या विरोधात ठोस कृती करणार्‍या शिवसेनेचे अभिनंदन !

हिंदूंनो, प्रखर धर्माभिमान परखडपणे केवळ शिवसेनाप्रमुखच मांडतात. त्यांच्याप्रमाणे किमान धर्माभिमान शब्दांत व्यक्‍त करायला तरी शिका. अर्थात तो व्यक्‍त करायला अंगी धमक असावी लागते, हेही खरेच !


मुंबई, १ नोव्हेंबर (वार्ता.) – एकतर मुसलमानी धर्मांधता व दहशतवाद यांपासून हिंदूंना वाचवायचे नाही. तेथे शेपट्या हालवत किंवा घालून बसायचे व त्या दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी हिंदूंनी काही हालचाली केल्याच, तर त्यांना बदनाम करून संपवायचे.

प्रसारमाध्यमेदेखील सध्या साध्वी प्रज्ञा, मेजर उपाध्याय वगैरेंचा उल्लेख `हिंदु दहशतवादी’ असा जाणीवपूर्वक करत आहेत. कशासाठी हा उफराटेपणा ? जे मुस्लीम अतिरेकी अनेक वर्षे हिंदुस्थानात दहशतवादी हल्ले करून निरपराध्यांचे बळी घेत आहेत, त्यांचा उल्लेख `मीडिया’वाले कधी `मुस्लीम अतिरेकी’ असा करत नाहीत. तेथे त्यांना पत्रकारितेमधील नीतीमत्ता, नैतिकता आणि आचारसंहिता वगैरे आठवते. मग हिंदूंबाबत ती कुठे जाते ? हे दुर्दैव हिंदु समाजाचे नसून देशाचे आहे; म्हणूनच साध्वी प्रज्ञा, मेजर रमेश उपाध्याय यांच्यामागे समस्त हिंदु समाजाने खंबीरपणे उभे रहायला पाहिजे. हिंदु समाजाचा गौरव म्हणून त्यांच्याकडे पहायला हवे. या देशातील बेगडी निधर्मीवाद्यांना अफझल प्यारा असेल, तर आम्ही साध्वी प्रज्ञा, रमेश उपाध्याय व समीर कुलकर्णी यांच्यावर प्रेम का करू नये, असा परखड प्रश्‍न शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या दैनिक `सामना’च्या संपादकीयातून विचारला.

हिंदूंवर `शठं प्रति शाठ्यं’ अशी प्रतिक्रिया देण्याची वेळ का आली ?
हिंदूंना दहशतवादी ठरवणे, हे एखादे आंतरराष्ट्रीय कारस्थान आहे कि काय, असा प्रश्‍न विचारत श्री. ठाकरे यांनी पुढे लिहिले आहे की, या स्फोटामागे ते दहशतवादविरोधी पथकवाले म्हणतात तसे हिंदू खरोखरंच असतील, तर त्यांच्यावर ही `शठं प्रति शाठ्यं’ अशी प्रतिक्रिया देण्याची वेळ का आली, या प्रश्‍नाचे उत्तर कोणाकडे आहे का ? आसामात बांगलादेशी घुसखोरांकडून आसामी हिंदूंच्या कत्तली होत असतात. तेथील हिंदूंनी काय षंढासारखे पडून रहायचे ? हिंदूंनी नामर्द बनून जगावे व इस्लामी आक्रमकांनी आमच्या पिढ्याच्या पिढ्या नष्ट कराव्यात, हेच काँग्रेसवाल्यांचे धोरण असेल, तर एखादी साध्वी प्रज्ञा, एखादे मेजर उपाध्याय आणि एखादा समीर कुलकर्णी निर्माण झालाच, तर तो त्यांचा दोष नाही. आज तसा सर्वत्र हिंदु मार खातो आहे, तो फक्‍त सरकारी कृपेने.
मुसलमानी मतांसाठी येथील राज्यकर्त्यांनी जे कृपाछत्र धर्मांधांवर धरले आहे, ते दूर झाले, तर हिंदूही मेल्या आईचे दूध प्यायलेला नाही, हे दाखवून द्यायला आम्हाला कितीसा वेळ लागणार ? पण हिंदू जरा कुठे उसळी मारू लागला की, त्याला दाबता येईल तेवढे दाबायचे व मुस्लीम धर्मांधांना खुश करायचे. त्यांना जणू संदेशच द्यायचा, `बघा बघा, हिंदूंना त्यांच्या हिंदुस्थानात आम्ही कसे भरडतोय आणि चिरडतोय. हे सर्व आम्ही तुमच्या सेवेसाठी करतोय; पण उद्या निवडणुका आल्या म्हणजे आम्हाला विसरू नका.’ हा असा निर्लज्जपणा एकदा करायचाच म्हटला, तर हे दहशतवादविरोधी पथकवाले रोज चार साध्वी, पाच मेजर, पाच-पंचवीस लेफ्टनंट कर्नलना `हिंदु दहशतवादी’ ठरवून `बांग’ ठोकतील व समजा त्यांना ते मिळालेच नाहीत, तर एखाद्या सलमाच्या नाहीतर हसीनाच्या अंगावर भगवी वस्त्रे चढवून तिला साध्वी म्हणून पेश करतील व हिंदु दहशतवाद कसा पसरतो आहे, ते `मीडिया’समोर तोंड वेंगाडून सांगतील, असे श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे.

सरकारात मुस्लीम मतांचे अनेक अब्दुल्ले व गब्दुल्ले !
सरकारांत मुस्लीम मतांचे अनेक अब्दुल्ले व गब्दुल्ले बसले आहेत. त्या अब्दुल्ल्यांच्या हुकमावरून पोलीसवाले काम करत असल्याने या आमच्या हिंदुस्थानात दुसरे काय घडायचे, असा प्रश्‍न श्री. ठाकरे यांनी विचारला आहे.

एखादा `मेमन’ साध्वी प्रज्ञा, उपाध्याय व कुलकर्णी यांच्यासाठी उभा राहील का ?
दाऊद इब्राहीमच्या भावासाठी, बाँबस्फोटांतील आरोपींसाठी एखादा माजीद मेमन अभिमानाने वकिलीचा काळा डगला घालून उभा रहातो. असा एखादा `मेमन’ साध्वी प्रज्ञा, उपाध्याय व कुलकर्णी यांच्यासाठी उभा राहील का, असा आवाहनात्मक प्रश्‍न श्री. ठाकरे यांनी शेवटी हिंदु वकिलांना विचारला आहे.


शिवसेना मालेगाव बाँबस्फोटातील आरोपींना वकील देणार ! – खासदार संजय राऊत
मुंबई, १ नोव्हेंबर (वार्ता.) – मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सर्वश्री समीर कुलकर्णी, शिवनारायण व श्याम साहू या आरोपींना वकील देऊन मदत करणार असल्याचे शिवसेनेचे खासदार व प्रवक्‍ते श्री. संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना सांगितले.
श्री. राऊत पुढे म्हणाले, “प्रत्येक आरोपीला कायदेशीर मदत मिळवण्याचा हक्क आहे. ते चुकीचेही नाही. या स्फोटातील आरोपींवरील आरोप सिद्ध होण्यापूर्वी त्यांना `हिंदु दहशतवादी’ म्हणणे आम्ही सहन करणार नाही. संसदेवर हल्ला करणार्‍या अफझलला मदत देण्यासाठी अनेक जण पुढे आले व त्यासाठी गोंधळही घातला गेला, तर साध्वी व इतर आरोपी यांना अशी मदत करणे चुकीचे कसे ठरेल ? धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली देशात राजकारण करून हिंदूंची बदनामी कोणी करत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही.” (कुठल्याच हिंदूने हे सहन करायला नको. न्यायालयात अद्यापपर्यंत काहीही सिद्ध झालेले नसतांना साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, सर्वश्री समीर कुलकर्णी, शिवनारायण व श्याम साहू यांना `हिंदु दहशतवादी’ म्हणून हिंदूंची बदनामी करणार्‍यांचा प्रत्येक हिंदूने सनदशीर मार्गाने निषेध करावा ! – संपादक)