मुंबई, ३१ ऑक्टोबर (वार्ता.) – बिहारमधील एकमेकांचे हाडवैरी असलेले ते तिघे एकत्र येतात; पण मराठीच्या अस्मितेच्या मुद्यावर महाराष्ट्रातील ४८ खासदारांची तोंडे लोकसभेत वेगवेगळया दिशांना असतात. कोणीच बोलत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
(लोकहो, ज्यांना भाषिक अस्मितेचा मुद्दा लावून धरण्याची इच्छा नाही, त्यांना पुढील निवडणुकीत निवडून द्यायचे का, हे आताच ठरवा ! – संपादक) त्यामुळे दिल्लीचे फावते, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दिल्लीच्या तुकड्यावर रहाणार्या मुख्यमंत्र्यांबाबत आम्हाला आशा वाटत नाही. शहरात एकही नवी झोपडी बांधू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री म्हणतात; मात्र प्रत्यक्षात त्यांच्या डोळयांदेखत झोपड्या उभ्या रहात आहेत. महाराष्ट्रात परप्रांतियांचे लोंढे येतात, किंबहुना पाठवले जातात. त्यांचे मतदारसंघात रूपांतर करण्याचा प्रयत्न होतो. याला आमचा तीव्र विरोध आहे. महाराष्ट्रात
मराठी अस्मितेला नाकारणे कदापी सहन केले जाणार नाही, असा इशारा श्री. ठाकरे यांनी दिला. श्री. लालूप्रसाद बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर असतांना १ हजार २०० खून झाले. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी का होत नाही ? मणीपुरात १० बिहारींना ठार केले गेले. गोवा-पाटणा रेल्वे सुरू करतेवेळी `आम्हाला भिकारी नकोत’, अशी गोव्यातील मंत्र्यांनी हेटाळणी केली. याच मुद्यावर बेंगळुरू रेल्वेस्थानक फोडले गेले. दिल्लीच्या मुख्यमंत्री श्रीमती शीला दीक्षित यांनीही बिहारींची हेटाळणी केली. या सर्व मुद्यांवर कोणी बोलत नाही; पण महाराष्ट्रात राज ठाकरे बोलला की, त्याच्यावर `रासुका’नुसार कारवाईची मागणी केली जाते, हे राजकारण का केले जात आहे, असा प्रश्न श्री. ठाकरे यांनी विचारला. रेल्वे मंडळातील परीक्षार्थींना
श्री. लालूप्रसाद यादव यांनी जबरदस्तीने महाराष्ट्रात परीक्षेला पाठवून राजकारण केले, असे सांगत राहुल राजवर गोळया झाडून पोलिसांनी योग्यच केल्याचे ते म्हणाले. बाबरी मशीद पाडल्यावर ज्या नेत्यांवर गुन्हे होते, त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. गोध्रा घटनेनंतर श्री. नरेंद्र मोदी यांची सुरक्षा वाढवली. महाराष्ट्रात असे काहीच घडले नाही. तरीही माझी सुरक्षा काढली. सरकार बदलत असते. उद्या आम्हालाही संधी मिळणार आहे, असे श्री. ठाकरे म्हणाले.
निगडीत वृत्त : नालायक लोकप्रतिनिधी
|


