गुरु-ता-गद्दीची त्रिशताब्दी !

हिंदूंनो, स्वधर्म व स्वदेश यांच्यासाठी समर्पित वृत्तीने कार्य करणार्‍या खालसा पंथियांचा आदर्श घ्या !

शिखांच्या चार प्रमुख तीर्थस्थानांपैकी एक असलेल्या नांदेडग्रामी गुरु-ता-गद्दीच्या त्रिशताब्दी सोहळयाला आजपासून प्रारंभ झाला आणि लक्षावधींची गर्दी गोदावरीच्या तटी दिसू लागली.

शिखांसाठी गुरुस्थानी असलेल्या `गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र धर्मग्रंथाबद्दल श्रद्धा बाळगणार्‍या २० लाखांचा समुदाय या सात दिवस चालणार्‍या भक्‍तीमय सोहळयाला उपस्थित राहील, हे गृहित धरून येथील प्रसिद्ध गुरुद्वारा परिसराचा विकास करण्यात आला आहे. पायाभूत सुविधांपासून ते येथे येणार्‍या लाखो भाविकांच्या रहाण्यापासूनच्या ते सुरक्षेपर्यंतच्या सार्‍या सुविधांची तयारी तेथे करण्यात आली आहे. राजकीय नेते व प्रशासन यांची इच्छाशक्‍ती असली, तर काय होऊ शकते, हे नांदेड शहराचा कायापालट पाहून लक्षात येते. भव्य विमानतळ, प्रचंड मोठे रस्ते, गोदावरीवरील अतिभव्य घाट, अवाढव्य रेल्वे स्थानक आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिखांसाठी पवित्र ठिकाण असलेले गुरुद्वारा या सर्वांचा चेहरामोहरा बदलला आहे. अवघ्या २१ महिन्यांत हा झालेला चमत्कार म्हणजे ठिकठिकाणच्या शहर विकासात नाकर्तेपणा दाखवणार्‍या शासन व प्रशासन यांसाठी एक वस्तूपाठ आहे !

गुरु-ता-गद्दीचा धर्मरक्षणाचा इतिहास !
औरंगजेबाने शिखांचे नववे गुरु तेगबहादूर यांचा अत्यंत क्रूर पद्धतीने दिल्लीच्या चांदणी चौकात वध केला. तत्पूर्वीच्या शीखगुरूंचाही दिल्लीपती सुलतानांनी अमानुष छळ केला होता. त्यामुळे शिखांमध्ये सूडाग्नी धगधगत होता. वयाच्या दहाव्या वर्षी शिखांचे दहावे गुरु झालेल्या गोविंदसिंग यांनी गुरुगादीवर आरूढ होताच दुष्ट सुलतानी शक्‍तींचा नि:पात करत, शिखांना सामर्थ्यशाली बनवले. गुरु गोविंदसिंग यांनी त्यांच्या अनुयायांना आनंदपूरनजीक कोट्टनयना देवीच्या ठाण्यापाशी १६९९ मध्ये धर्मरक्षणासाठी एकत्र आणले. त्यांनी शिखांना `खालसा’ म्हणजे विशुद्ध धर्मशील जीवन जगण्यासाठी आणि दुर्जनांचा प्रतिकार करत सृजनांचा सांभाळ करण्यासाठी एक नवा मार्ग दाखविला. या मार्गावरून क्रमण करणार्‍यांच्या पंथाला `खालसा पंथ’ संबोधले जाते. खालिस म्हणजे तावून सुलाखून निघालेला. हा पंथ शीख बांधवांसाठी तारक, तर भारतियांच्या भूमीत राहून हिंदूंना छळणार्‍या आक्रमकांसाठी मारक ठरला. या पंथाने शीख व हिंदू बंधू आहेत, अशी गर्जना केली. गुरु गोविंदसिंग यांनी नांदेड येथे १७०८ मध्ये देह ठेवला. तत्पूर्वी त्यांनी `गुरुग्रंथसाहिब’ या पवित्र धर्मग्रंथाची स्थापना शिखांसाठी शाश्‍वत गुरुपदी केली. या दोन्ही घटनांना येत्या गुरुवारी ३०० वर्षे पूर्ण होत आहेत. गुरु गोविंदसिंग त्यांच्या अखेरच्या दिवसांत नांदेड येथेच राहिले. येथूनच त्यांनी खालसांचे नेतृत्व करून शिखांना १७०८ साली `गुरु मानियो ग्रंथ !’ अर्थात `श्रीगुरुग्रंथसाहिब हाच यापुढील गुरुचैतन्याची ओळख घडवील’, अशी आज्ञा दिली. शिखांसाठी वेगळा मानवी देहातील गुरु आता नाही. गेल्या ३०० वर्षांपासून गुरु-ता-गद्दी हेच त्यांच्यासाठी गुरुस्थान आहे.

खालसा पंथाची आधुनिक कामगिरी !
गुरु गोविंदसिंगांनी अकारावे गुरु म्हणून गुरुग्रंथसाहिब यांना मान्यता दिली व खालसाचे प्रमुख बंदा बैरागी यांना बनवले. बंदा बैरागी धर्मवीर होते. त्यांनी केलेले धर्मरक्षणाचे कार्य अचाट आहे. त्यांना सुलतानी आक्रमकांनी ठार मारले, तर त्यानंतर खालसाचे नेतृत्व स्वीकारणार्‍या रणजीतसिंग यांनी शीख साम्राज्य उभे केले. त्या पुढच्या काळात शीख खालसा ही भारतीय सैन्यातील सर्वांत मोठी शक्‍ती ठरली. भारतीय क्रांतीकारकांचे मुकूटमणी ठरलेले सरदार भगतसिंगही खालसा होते. या समुदायाला गेली ५ शतके अत्याचार सोसावे लागले. देशविभाजन, पाकिस्तानी आक्रमणे आणि युद्धे यांत हा समाज होरपळून निघाला. गुरु-ता-गद्दीच्या तीन शतकांच्या इतिहासात अनेक बरेवाईट प्रसंग आले आणि कधी संघर्ष करून किंवा कधी सहन करून खालसा अधिकच उजळत गेला. स्वदेश, स्वधर्म व सज्जन यांच्या रक्षणासाठी खालसा पंथ समर्पित वृत्तीने आजही कार्यरत राहिला आहे. आज देश जिहादी आक्रमकांच्या विळख्यात सापडला असतांना खालसाचे धर्मरक्षक हिंदु धर्मासाठी आशेचा किरण आहेत. गुरु-ता-गद्दीच्या त्रिशताब्दी सोहळयाच्या निमित्ताने शिखांनी त्यांचा भूतकाळातील पराक्रम आठवावा व `सत् श्री अकाल’ हा वीरघोष करत देशाला जिहाद्यांच्या व धर्मांधांच्या तावडीतून सोडवावे, ही श्रीगुरुचरणी प्रार्थना !

Leave a Reply