लष्करी अधिकार्‍यांची अकाली निवृत्ती म्हणजे धोक्याची घंटा !

शत्रूराष्ट्रांविरोधात आक्रमक न होता लष्करी अधिकार्‍यांना अकाली निवृत्ती घ्यायला लावणार्‍या नाकर्त्या भारतीय राज्यकर्त्यांना हटवा !

यावर्षी ५८४ वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी अकाली निवृत्ती घेतली आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री ए.के. अँथनी यांनी लोकसभेत दिली. `सहाव्या वेतन आयोगाबद्दल असमाधानी असल्यामुळे लष्करी अधिकार्‍यांनी निवृत्ती घेतलेली नाही’, असेही अँथनी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लष्करी अधिकार्‍यांनी पैशाच्या हव्यासापोटी राजीनामे दिले, असे म्हणणे चुकीचे ठरेल.

 

मुळात लष्करी अधिकार्‍यांना निवृत्ती का घ्यावीशी वाटते, याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करण्याच्या विचाराने झपाटलेले तरुण भारतीय लष्करात भरती होतात; मात्र सैन्यात भरती झाल्यावर त्यांची स्थिती कशी असते ? पाकिस्तान व बांगलादेश यांच्या सीमारेषेवर शत्रूचे जवान अंदाधुंद गोळीबार करून भारताचे लष्करी अधिकारी व जवान यांना वाकुल्या दाखवतात; मात्र भारतीय जवानांना त्यांच्या विरोधात काहीही करता येत नाही. गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानने ५८ वेळा शस्त्रसंधी मोडून सीमारेषेवर तैनात करण्यात आलेल्या जवानांवर गोळीबार केला. यावर उपाययोजना म्हणून भारताने काय केले ? `भारत व पाकिस्तान यांच्या लष्करी अधिकार्‍यांच्या `फ्लॅग बैठकीत’ भारताच्या लष्करी अधिकार्‍यांनी याचा निषेध केला आहे’, अशी निलाजरेपणाने अँथनी यांनी लोकसभेत माहिती दिली. मुजोर बनलेले बांगलादेश व पाकिस्तान यांना रोखण्यासाठी त्यांचे कंबरडे मोडणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ निषेध व्यक्‍त करून गप्प न बसता आता आक्रमक होणे, हा एकमेव पर्याय आहे; मात्र मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांसाठी हपापलेल्या संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारला हे कोण समजावून सांगणार ? शत्रूशी दोन हात करायला लष्करी अधिकारी व जवान यांचे हात शिवशिवत असतात; मात्र राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे त्यांना हाताची घडी घालून गप्प बसावे लागते. त्यामुळे सतत तणावाखाली वावरणारे जवान अखेर आत्महत्येचा मार्ग पत्करतात. `भविष्यात जीवनमान उंचावण्यासाठी चांगल्या संधी मिळाव्यात, यासाठी लष्करी अधिकारी अकाली राजीनामा देतात’, असे जरी अँथनी यांनी सांगितले असले, तरी त्यात कितपत तथ्य आहे, हे पडताळून पहाणे आवश्यक आहे. निवळ देशाच्या रक्षणासाठी कोणतीही सोयीसुविधा नसतांना, भारतीय जवान व लष्करी अधिकारी कारगिलमध्ये कडाक्याच्या थंडीत पाकिस्तानी लष्कर व दहशतवादी यांचा सामना करतात. असे असतांना स्वत:च्या सुखासाठी लष्करी अधिकारी लष्करातून निवृत्त होण्याचा विचार करतील, हे तितकेसे पटत नाही. शत्रूशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्याचा घाट घालणार्‍या संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारबद्दल भारतीय लष्कराच्या मनात वाढता असंतोष आहे. त्याची परिणती लष्करी अधिकारी राजीनामा देऊन करत आहेत. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने ही धोक्याची घंटा आहे. ही परिस्थिती निर्माण करणार्‍या भारतीय राज्यकर्त्यांना हटवले, तरची ही समस्या सुटू शकते. त्यासाठी वैचारिक क्रांतीच हवी !

Leave a Reply