मुंबई, २० ऑक्टोबर (वार्ता.) – समाजवादी पक्षावर बंदीची मागणी घालून मुलायमसिंग, अमरसिंग व मला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी करणार्या बाळ ठाकरे यांना वेड्यांच्याच रुग्णालयात पाठवावे. तसेच त्यांच्यावर व राज ठाकरे यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे खासदार अबू आझमी यांनी आज आझाद मैदान येथे केली.
ते काल मनसे व शिवसेना यांच्याकडून रेल्वे नोकर भरतीच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याच्या निषेधार्थ आज आझाद मैदान येथे करण्यात आलेल्या आंदोलनात ते बोलत होते. या ठिकाणी समाजवादी पक्षाकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मनसेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले. (असे नैतिकताहीन कार्यकर्ते देणारे पक्ष लोकशाही निरर्थक ठरवतात. – संपादक) आझमी पुढे म्हणाले की, मनसेची गुंडगिरी आता सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. मुंबई ही कोणाच्या बापाची नाही. आम्ही टिपू सुलतानचे वंशज आहोत. आम्ही कोणाच्या जिवावर येथे जगत नाही. मुंबईतील ४० लाख उत्तर भारतियांना येथून हाकलवण्यासाठी बाळ ठाकरे व राज ठाकरे यांना २० जन्म घ्यावे लागतील, असे सांगत समाजवादी पक्षाकडून दादागिरीला अशा दादागिरीने उत्तर देऊ, असे अबू आझमी यांनी जाहीर केले.
छटपूजेला मनसेकडून होणार्या विरोधावर बोलतांना अबू आझमी यांनी समाजवादी पक्ष छटपूजेत सहभागी होणार आहे. ती होण्यापासून कोण रोखते हे आम्ही पाहून घेऊ, अशी धमकी त्यांनी दिली


