लक्षवेधी `मनसेनीती’ !

सनदशीर मार्गाच्या आंदोलनांकडे दुर्लक्ष करणार्‍या राजकर्त्यांना आक्रमक आंदोलनांनी वठणीवर आणणारी मनसे !

 

जागतिक मंदीचा धसका घेऊन `जेट एअरवेज’ने त्यांच्याकडील काही कर्मचार्‍यांना कमी केले, तेव्हा निम्म्याहून अधिक अमराठी असलेल्या जेटच्या कर्मचार्‍यांना
श्री. राज ठाकरे व त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा आधार वाटला ! जेटच्या कर्मचार्‍यांना `असे का वाटले’, याचा विचार अन्य राजकीय पक्षांनी अंतर्मुख होऊन केला पाहिजे.

 

आतापर्यंत संस्था, संघटना व राजकीय पक्ष यांनी विविध प्रकारची अनेक आंदोलने केली असली, तरी ज्या कारणांसाठी ही आंदोलने त्यांनी केली, त्यामुळे जनतेतील काही घटकांची पूर्तता झाली असेल, तर काहींना फक्‍त आश्‍वासने मिळाली असतील. असे आपल्याबाबतीत घडू नये, यासाठी `जेट एअरवेज’मधून कमी केलेल्या कर्मचार्‍यांनी थेट श्री. राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आणि श्री. राज यांनी त्यांना अभय देत `जेट एअरवेज’ला खास ठाकरी शैलीत `कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकल्यास एकही विमान उडू दिले जाणार नाही’, असा इशारा दिला ! त्यांनी इशारा देताच जेटच्या व्यवस्थापकांची विमाने जमिनीवर आली व कर्मचारी कपातीचा निर्णय मागे घेण्याची हुशारी त्यांनी दाखवली !

पूर्ती न होणार्‍या राज्यकर्त्यांच्या आश्‍वासनांना विटलेली जनता ! कर्मचारी कपातीच्या घटनेनंतर झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत गरमागरमी झाली. तथापी तोडगा न काढता समस्या भिजत ठेवण्याची परंपरा असलेल्या काँग्रेसचे विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री श्री. कपिल सिब्बल आणि व्यापारमंत्री श्री. कमलनाथ यांनी `हा जेट एअरवेज’चा अंतर्गत प्रश्‍न आहे’, असे म्हणत या विषयापासून आपले हात नेहमीप्रमाणे वर केले. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा नागरी विमान वाहतूकमंत्री श्री. प्रफुल्ल पटेल यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देशमुख, उपमुख्यमंत्री श्री. रा.रा. पाटील, राज्याचे शक्‍तीशाली नेते व केंद्रीय कृषीमंत्री श्री.शरद पवार, समाजवादी पक्षाचे चाणक्य अमरसिंग, रिपाईचे एकमेव खासदार श्री. रामदास आठवले यांसारखे दिग्गज नेते श्री. भुजबळ यांच्यावर वाढदिवसानिमित्त स्तुतीसुमने उधळत होते. या दिग्गज मंडळींकडून आश्‍वासनांशिवाय आपल्या पदरी काहीएक पडणार नाही, हे `सत्य’ जेटच्या कर्मचार्‍यांनी जाणले असावे, हे वेगळे सांगायला नको. पूर्ती न होणार्‍या आश्‍वासनांना आता जनता विटली आहे, हेच यातून स्पष्ट होते.

मनसेनीती !
श्री. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या वेळी पक्षाची `ध्येय व धोरणे’ निश्चित करून त्याप्रमाणे कृतीला रोखठोक प्रारंभ केला. त्यांनी प्रथम राज्यात सर्वत्र मराठी वापर, स्पर्धा परीक्षा व नोकरी यांत मराठी माणसाला प्राधान्य यांसाठी आवाज उठवला, तसेच सामंजस्याला फाटा देणार्‍यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी `मनसे स्टाईल’ इंगा दाखवला. मराठी पाट्यांच्या मुद्यावर मराठीद्वेष्ट्या व्यापारांच्या दुकानांच्या पाट्यांची तोडफोड करण्यात आली व प्रसंगी त्यांना डांबरही फासण्यात आले. सरकारला आंदोलनाची व संपाची भाषा पूर्वी समजायची; मात्र आता राज्यकर्त्यांनी गेंड्याची व्रतडी पांघरली आहे. मुसलमान झुंडशाहीने वागून सरकारांना झुकवतात, ही बाब शिवसैनिकांनी काही वर्षांपूर्वी हेरली होती. सरकारला झुकवण्यासाठी मग ठिकठिकाणी राडे, धिंगाणे घालण्यास सुरुवात झाली. त्याला समाजातून प्रतिसाद मिळाला. हीच रणनीती मनसेने अधिक आक्रमक होऊन राबवली. आक्रमक इशारे व तोडफोडबाजी ही `मनसेनीती’ अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळेच मनसेने केलेली आंदोलने कोणाला आपलीशी, तर कोणाला मुंबई उच्च न्यायालयाप्रमाणे ती `दहशतवादी’ वाटतात. पुणे तालुक्यात परदेशस्थ `डाऊ’ या विषारी कंपनीमुळे तेथील संत तुकारामांची तपोभूमी असलेल्या भामचंद्र डोंगराला धोका व पवित्र इंद्रायणी नदीचे पाणी दूषित होणार असल्याने त्याच्या विरोधात ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी आक्रमक आंदोलन छेडले होते. त्याचे समर्थन करतांना गांधीवादी अहिंसावादाचे कट्टर पुरस्कर्ते माजी न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांनी “जेव्हा सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनाची सरकार दखल घेत नाही, तेव्हा आंदोलक आक्रमक होतात”, असे विधान केले होते. सनदशीर मार्गाच्या विरुद्ध जाऊन केलेली अशी आंदोलने ही अयोग्य असली, तरी गेंड्याची व्रतडी पांघरलेल्या राज्यकर्त्यांना वठणीवर आणण्यासाठी दुसरा पर्यायही नाही, हेच काय ते वारकरी व मनसे यांच्या आंदोलनातून वारंवार स्पष्ट होते. सध्याच्या काळात केवळ मवाळ राहून चालत नाही, तर प्रसंगी त्याला छेद द्यावा लागतो, हेच सध्याचे मनसेचे सूत्र दिसते.