कर्जत, १२ ऑक्टोबर – `डाऊ’च्या विरोधात संघटित झालेल्या वारकर्यांमध्ये फूट पाडा, असे विधान ऊर्जामंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
कर्जत आणि जामखेड या तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे `चिंतन शिबीर’ येथील श्रीराम मंगल कार्यालयात पार पडले. या वेळी श्री. वळसे-पाटील यांनी वनमंत्री श्री. बबनराव पाचपुते यांना वारकर्यांमध्ये फूट पाडण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. (लोकहो, राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांची चिंतन शिबिरे ही अशी स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाण्याच्या विचारांचे आदानप्रदान करणारी असतात, हे सत्य जाणा. अशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील निवडणुकीत पराभूत करा ! – संपादक) श्री. वळसे-पाटील म्हणाले, “डाऊ प्रकल्प पुणे जिल्ह्यात होत आहे; मात्र या प्रकल्पामुळे आळंदी आणि देहू या तीर्थक्षेत्रांचे नुकसान होईल, अशी भीती वाटून शांती आणि अहिंसा मानणार्या वारकर्यांनी राज्यभर आंदोलन केले. त्यास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर देता आले नाही. (जर राष्ट्रवादीचे राज्यकर्ते वारकर्यांचे योग्य उत्तरे देऊन समाधान करू शकले नाहीत, तर कार्यकर्ते काय समाधान करणार ? – संपादक) या आंदोलनामुळे श्री. शरद पवार आणि श्री. अजित पवार यांची बदनामी झाली. (लोकहो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची स्वार्थांध मानसिकता जाणा ! राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना पोलिसांनी अटक केली, याचे दु:ख नाही; शांतताप्रिय वारकर्यांना रस्त्यावर यावे लागले, याचे दु:ख नाही. त्यांना दु:ख आहे, ते दोन्ही पवारांच्या बदनामीचे ! – संपादक)
श्री. पाचपुते आणि खासदार श्री. जयसिंगराव गायकवाड यांनी आता पुढाकार घेऊन त्यांना मानणार्या वारकर्यांचा गट तयार करावा, म्हणजे ही माणसे आपले म्हणणे जनतेपर्यंत घेऊन जातील.” (वारकरी बांधवांनो, राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांच्या या डावाला बळी पडू नका व असले गटातटाचे राजकारण राजकारणी माणसे करतात, वारकरी करत नाहीत, हे तुमच्या एकजुटीतून त्यांना दाखवून द्या ! – संपादक)
वारकर्यांना विश्वासात घेऊ ! – विलासराव देशमुख
`डाऊ’ प्रकल्पाच्या संदर्भात निर्माण झालेल्या प्रश्नांबाबत वारकर्यांना विश्वासात घेऊन समन्वयाने तोडगा काढू, असे मुख्यमंत्री श्री. विलासराव देशमुख यांनी सांगितले. (ही भूमिका अगोदरच का घेतली नाही ? ह.भ.प. बंडातात्यांना अटक करून समस्त हिंदूंच्या धर्मभावनांचा अपमान का केला ? – संपादक) “पंढरपूर-देहू-आळंदी या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ४३४ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार झाला असून येत्या तीन महिन्यांत त्याची अंमलबजावणी सुरू होईल”, असेही ते म्हणाले. (या तीर्थक्षेत्रांचा विकास खरेतर यापूर्वीच व्हायला हवा होता. शासनाने तो केला नाही व आता वारकरी प्रदूषणकारी `डाऊ’ कंपनीच्या विरोधात आंदोलन करत आहेत, ते त्यांनी मागे घ्यावे, यासाठी सरकार वारकर्यांना विकासाचे आमीष दाखवत आहे का ? – संपादक)



