पळू नका, देव कुठे जात नाही !

नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी जोधपूरच्या प्राचीन चामुंडादेवीच्या मंदिरात १८० हून अधिक माणसे चेंगराचेंगरी होऊन प्राणास मुकली. हा नुसता अपघात नाही, आपल्या व्यक्‍तीमत्त्वाचा आणि चारित्र्याचा तो अंश झाला आहे.

 

अचानक आपत्ती ओढावली की, आपण घाबरून जातो आणि पळ काढण्याचा प्रयत्‍न करतो. ताठ मानेने पाय रोवून उभे राहून परिस्थितीला धीटपणे आपण सामोरे जात नाही. चामुंडादेवीसमोर झालेली चूक अध्यात्मात आणि ऐहिकतेत दोन्ही ठिकाणी आपण कमी पडलो, याचे निदर्शक आहे. प्रत्यक्ष देवळात जाण्याचा रस्ता म्हणजे तेथे उभी चढण होती. देवळाचे दरवाजे उघडल्यावर आत जाण्यासाठी अविचारी धावपळ झाली. चढणीवर काहींचे पाय घसरले. ते खाली पडले; मात्र लोक त्यांच्या अंगावरून पुढे धावत गेले. जे मेले ते गुदमरून मेले. अंगावर कसलाही घाव न होता भीतीने ते मेले. भगवंतांनी अर्जुनाला विश्‍वरूपदर्शन दाखवले, तेव्हा एवढा मोठा अजिंक्य धनुर्धर भयभीत झाला होता आणि त्याला स्थिरचित्त करण्यासाठी श्रीकृष्णाला आपले सौम्यरूप दाखवावे लागले होते. मंगळवारी दुर्घटना होऊन जी माणसे इहलोक सोडून गेली, ती भगवंताच्या दर्शनाची इच्छा करत गेली; पण त्यांना दर्शन झाले नाही. त्यांनी अध्यात्मातील आणि इहलोकातील अनुशासन पाळले नाही. परमेश्‍वर सर्वत्र असतो, तो प्रत्येकाच्या हृदयात असतो, हे कळल्यावर धावपळ होत नाही. शांतचित्ताने संवाद सुरू होतो. आपण मनापासून संवाद करत असू, तर परमेश्‍वर तो संवाद अर्धवट टाकून जात नाही. त्याला घाई नसते. भक्‍तासाठी तिष्ठत रहाण्यात त्याला आनंद असतो. चामुंडादेवीच्या दर्शनासाठी झालेली धावपळ कर्मकांड होते, उपचार होता. तो पार पाडतांना ऐहिक जगाचे नीतीनियम नीट पाळले असते, तर जीवितहानी झाली नसती. एक माणूस पाय घसरून पडल्यानंतर मागच्या माणसाने वेग मंदावून आणि उलटे फिरून मागच्या माणसांना हात उंचावून रोखले असते, तर पडलेल्या माणसाला उठण्याची संधी मिळून मार्ग मोकळा झाला असता. भक्‍त म्हणविणारे हे लोक पडलेल्यांच्या अंगावर पाय देऊन देवीच्या दर्शनासाठी धावत गेले. अशा निर्दय लोकांना देव भेटत नाही. जेवणाच्या ताटातील पोळी उचलून कुत्रा पळाला, तेव्हा `कोरडी पोळी का खातोस ?’, असे म्हणत तुपाची वाटी घेऊन संत नामदेव त्याच्या मागे पळत गेले. ही आपली परंपरा आहे. बुभु:क्षितांच्या पोटात मायेने ओथंबलेले दोन घास घालण्यासाठी भक्‍ताने धावपळ करायची असते. जो पडलेला आहे, त्याला उभा करण्यासाठी ज्ञानेश्‍वर, गाथा, दासबोध सांगितला गेला. वैयक्‍तिक जीवनाची जोड राष्ट्रीय जीवनाशी लावण्यासाठी लोकमान्यांनी `गीतारहस्य’ लिहिले. गणेशोत्सव सुरू केला. दुसर्‍याच्या अंगावर पाय देऊन पुढे जाण्याची आणि `मलाच दर्शन हवे’, असे म्हणत त्यासाठी वाटेल तो भ्रष्टाचार करण्याच्या सवयी भारतियांना स्वतंत्र झाल्यावर काँग्रेसच्या राजवटीत लागल्या. आतंकवाद्यांचे बाँबस्फोट होणार आणि फार मोठी धावपळ होणार आहे. आपल्याच लोकांच्या अंगावर पाय देऊन जीव वाचवण्यासाठी आपण पळू लागलो, तर आपण आतंकवाद्यांना प्रसन्न करू. प्रत्येक भारतीय ईश्‍वरीय अनुबंधाने आपला आप्‍त आहे, असे मानून तो संकटात असतांना त्याला साह्य करून आपल्याबरोबर त्याला मार्गस्थ करणे, हे आपले ध्येय असले पाहिजे.
- सुघोष

  निगडीत वृत्त : शरसंधान