२८ सप्टेंबरला लता मंगेशकर ह्यांनी ८० व्या वर्षात प्रवेश केला. लताबाई म्हणजे समूर्त संगीत आहे आणि त्यावर वाढत्या वयोमानाचा कसलाही उणा परिणाम झालेला नाही. आजही संगीताचा प्रातिनिधिक माणूस म्हणून जगातून एकच एक कलावंत निवडायचा झाला, तर लताबाईंनाच तो मान मिळेल.
त्यानंतरचा दुसरा क्रमांकही अन्य कोणाला मिळणार नसून तो धाकटी बहीण आशाबाई ह्यांनाच द्यावा लागेल. लताबाई गेली ६० वर्षे गात आहेत. चित्रपटाला त्यांनी पार्श्वगान केले. स्वतंत्रपणे गायन केले. माणसाच्या अभिव्यक्ती शास्त्राचे जे प्रकार आहेत, त्यात कंठस्थ गायकी सर्वश्रेष्ठ मानली जाते. ह्या कलेची उपासना लताबाईंनी कशी केली, ह्याचा सगळया भारतियांनी मुद्दाम अभ्यास करावा, इतके ते प्रेरणादायी आहे. सतत ६ दशके गातांना त्यांचा सूर नेहमी शुद्ध लागला. सर्व प्रकारच्या भावभावना समर्थपणे, अचूकपणे आणि काळजाला जाऊन भिडतील, इतक्या स्पष्टपणे त्यांनी गायनातून व्यक्त केल्या. सर्व वयोगटांतील कलाकारांना त्यांनी आपला स्वर दिला. खरे सांगायचे, तर प्रत्येक भारतियाला लताबाईंनी स्वरांची सोबत दिली. ह्या देशाचा राष्ट्रवाद, अस्मिता आणि संस्कृती नष्ट करून निराशेचे साम्राज्य सर्वत्र पसरवण्याचा चंग काँग्रेस संस्कृतीने बांधला असतांना लोकांत मिसळून त्यांची उभारी कायम ठेवण्यासाठी ज्या महाभागांनी आपल्या आयुष्याचा होम केला, त्यात लताबाईंचा समावेश आहे. त्यांनी गाणे गायले म्हणून त्यांची सेवा कमी महत्त्वाची ठरत नाही. उलट तीन पिढ्यांना त्यांनी भरवशाची सोबत दिली, हे कार्य ऋषीतुल्य आहे. भारताने आजपर्यंत निर्माण केलेल्या अत्युच्च, सुसंस्कृत, अभिजात, समर्पित, शुद्ध, तेजस्वी आणि शुचिर्भूत माणसांपैकी लताबाई एक आहेत. वयाच्या तेराव्या वर्षापासून आई, तीन बहिणी आणि एक भाऊ ह्यांच्या संसाराचा गाडा ओढण्याचे दायित्व त्यांनी आपल्या अंगावर घेतले आणि कुरकूर न करता, न थकता सगळया भावंडांकडून त्यांनी संगीताची उपासना करून घेतली आणि प्रत्येकाने शिखर गाठले, हे कर्तृत्व दैवी आहे. लताबाई आणि त्यांची भावंडे ह्यांनी संगीत क्षेत्रातील आपल्या अतुलनीय स्थानाचा दुरुपयोग केला नाही, भ्रष्टाचार केला नाही, हपाप दाखवला नाही. ह्याला आई-वडिलांचे संस्कार कारणीभूत आहेत. पिताजी दीनानाथ ह्यांनी संगीताचा वारसा मुलांना दिला. लताबाईंच्या गळयात `गंधार’ आहे आणि हृदयात `सावरकर’ आहे. सर्व मंगेशकर कुटुंब सावरकर विचार संकुलाचा भाग आहे; म्हणून क्रांतीकारकांच्या तेजस्वीपणाने त्यांनी गानकलेची उपासना केली. एक कलाकार आपल्या दैवी गाण्याने ६० वर्षे कोट्यवधी लोकांना जगण्याचा हुरूप देतो, असा पराक्रम आजपर्यंत जगात कोणत्याही गायकाने केलेला नाही. लता गाते आणि तिच्यातून घराघरातला प्रत्येक जण गात असतो, असा हा खेळ ६० वर्षे चालला आहे. लता म्हणजे मंत्रमुग्ध करणारी, पण अगदी साधीसुधी अनलंकृत देवता आहे. तिने शतायुषी व्हावे ! भारत पुन्हा अखंड झालेला पहावा, ही महादेवापाशी प्रार्थना !
- सुघोष
निगडीत वृत्त : शरसंधान
|



