उद्योगपती भवरलालजी जैन यांनी अंनिसच्या व्यासपिठावरच दिले डॉ. दाभोलकरांना श्रद्धेचे धडे !

धर्मद्रोह पसरवणार्‍या अंनिसच्या परिषदेतच डॉ. दाभोलकर यांना खडे बोल सुनावणारे श्री. भवरलालजी जैन यांचे अभिनंदन !

 

अंनिसची वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रद्धा निर्मूलन शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषद

 

हिंदूंनो, या यशाबद्दल ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्‍त करा !

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्वत:च्या कार्याद्वारे समाजात अंधश्रद्धा निर्माण केली आहे. श्रद्धा व अंधश्रद्धा यांतील फरक ओळखण्यासाठी कुठल्याही सीमारेषा नाहीत, हे त्यांना माहीत नाही. दृश्याची संवेदना जाणण्यासाठी प्रत्येक कृती व व्यक्‍ती यांना अध्यात्माची जोड आवश्यक आहे.

 

नरेंद्र दाभोलकर यांनी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील, असे वक्‍तव्य करू नये, अशा शब्दांत जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष पद्मश्री श्री. भवरलालजी जैन यांनी त्यांचे मित्र असलेल्या डॉ. दाभोलकर यांना समज दिली. श्री. जैन पुढे म्हणाले, “हिंदु धर्माची संस्कृती महान आहे. ही संस्कृती कोणीही नष्ट करू शकत नाही. या संस्कृतीला हजारो वर्षांचा इतिहास असल्याने तिला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अंनिसच्या या राज्यव्यापी परिषदेतील स्वीकृत जाहीरनाम्यास माझा पूर्ण पाठिंबा नसून अंशत: पाठिंबा आहे. श्रद्धा व परमेश्‍वर यांचे अस्तित्व मी स्वत: मानतो. बाकी कुठल्याही गोष्टीवर माझा विश्‍वास नाही. अंधश्रद्धा काय व ती कशी आहे, यापेक्षा श्रद्धा किती महत्त्वाची आहे, हे आपल्याला दिसून येते. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत; पण त्यांनी या कार्यक्रमाविषयी मला पूर्णत: अंधारात ठेवले.”

शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके, देवीसिंग शेखावत परिषदेला अनुपस्थित
जळगाव, २८ सप्टेंबर (वार्ता.) – येथे कालपासून सुरू असलेल्या `वैज्ञानिक दृष्टीकोन व अंधश्रद्धा निर्मूलन यांचा शैक्षणिक जाहीरनामा स्वीकृती परिषदे’ला आज दुसर्‍या दिवशीही नियोजित प्रमुख पाहुण्यांपासून श्रोत्यांचाही अल्प प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष डॉ. देवीसिंग शेखावत व शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमास अनुपस्थित होते. दुसरीकडे कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रसिद्ध उद्योगपती पद्मश्री श्री. भवरलालजी जैन यांनी व्यासपिठावरच डॉ. दाभोलकर यांना श्रद्धेचे धडे दिले. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांनी या परिषदेला केलेल्या तीव्र विरोधाला मोठे यश मिळाले. या वेळी काँग्रेसचे माजी आमदार श्री. गुलाबराव पाटील, नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. अजित वाघ व `लातूर पॅटर्न’चे जनक श्री. किशोर पाटील हे उपस्थित होते. (अंनिसच्या धर्मद्रोहात सहभागी होणार्‍यांचा निषेध ! – संपादक)

अंनिसची `स्मशानयात्रा’ रद्द ?
आज अंनिसच्या वतीने रात्री ९ ते १ या वेळेत स्मशानयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. तथापी दोन दिवसांच्या या परिषदेला झालेल्या प्रचंड विरोधानंतर या उपक्रमाला आज पोलिसांनी संरक्षण नाकारल्याने हा उपक्रम रद्द करण्यात आला, असे अंनिसच्या एका सदस्याने सांगितले.त्यामुळे स्मशानयात्रा होणार कि नाही याविषयी प्रश्‍नचिन्ह आहे.

क्षणचित्रे : या वेळी उपस्थित पत्रकार म्हणाले, “या परिषदेला झालेला विरोध व आज व्यासपिठावरच उद्योगपती श्री. भवरलालजी जैन यांनी मांडलेले मुद्दे, यांमुळे हिंदुत्ववाद्यांनी एक मोठा विजय मिळवला !”

 

  निगडीत वृत्त : असे धर्माभिमानी हिंदू सर्वत्र हवे