दहशतवाद्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे ! – नरेंद्र मोदी

अमेरिकेला भारतापुढे लोटांगण घालायला लावण्याचे स्वप्न पहाणार्‍या मोदींप्रमाणे देशात किती राज्यकर्ते आहेत ?

मुंबई, २७ सप्टेंबर (वार्ता.) – मूर्ख माणसे दहशतवाद्यांना संदेश देतात. त्यांच्याविरोधात प्रत्यक्ष कृती केली पाहिजे. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, असे रोखठोक विचार गुजरातचे मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्‍त केले. मतपेढीचे राजकारण करून दहशतवाद्यांना मदत करणारेच कडक कायदा करण्यास विरोध करत असल्याचा आरोपही श्री. मोदी यांनी केंद्रातील काँग्रेसच्या आघाडी सरकावर या वेळी केला. `आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीवरील `सीधी बात’ या कार्यक्रमात श्री. प्रभू चावला यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत श्री. मोदी बोलत होते.

श्री. मोदी यांनी देशातील दहशतवाद चिरडून टाकण्यासाठी विचारलेल्या प्रश्‍नांवर परखड विचार मांडले. ते म्हणाले, “दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी `जशास तसे’ उत्तर दिले पाहिजे. तशी मानसिकता देशात तयार करण्याची आवश्यकता आहे. बाँबस्फोटांत निर्दोष व्यक्‍तींचा मृत्यू होतो; मात्र त्यांचा जीव वाचवण्याऐवजी दोषी असणार्‍यांची बाजू घेणारे दहशतवाद रोखण्यासाठी कडक कायदे करण्यास विरोध करत आहेत. ते कायदा होऊच देत नाहीत. “हा कसला न्याय आहे”, असा संतप्‍त प्रश्‍न श्री. मोदी यांनी केला. ते पुढे म्हणाले, “कायदा असूनही हत्या होतात, विनातिकीट प्रवास केला जातो; म्हणून त्यासंदर्भातील कायदे रद्द करण्याची मागणी कोणीही करत नाही, मग निर्दोष लोकांवर कारवाई झाल्याच्या नावाखाली `पोटा’सारखा कायदा का रद्द करण्यात आला ? गुजरात राज्याने तयार केलेल्या दहशतवादविरोधी कायद्याला केंद्रातील सरकार परवानगी का देत नाही ? जगातील प्रत्येक देशात कठोरातील कठोर कायदे आहेत. मानवाधिकाराचा ठेका घेतलेल्या देशांतही असे कायदे असतांना आपल्या देशातच असा विरोध का होत आहे ? (कारण मुसलमानांच्या मतांची या राज्यकर्त्यांना भीती वाटते. देशहितापेक्षा मतांचा विचार करणार्‍या अशा स्वार्थांध राज्यकर्त्यांच्या हातात देश सुरक्षित राहील काय ? त्यामुळे अशा स्वार्थी राज्यकर्त्यांना जनतेने निवडणुकीत कायमचेच घरी बसवावे. – संपादक) १९ व्या शतकातील कायद्याच्या आधारे आपण २१ व्या शतकातील `हायटेक’ दहशतवादाच्या विरोधात कसे लढणार आहोत”, असे परखड व मर्मभेदी प्रश्‍न विचारत श्री. मोदी यांनी, मतपेढीचे राजकारण करून दहशतवादाला मदत करणारेच या कायद्याला विरोध करत असल्याचा आरोप या वेळी केला. या वेळी श्री. मोदी यांनी देशात `इंडियन इंटेलिजन्स सर्व्हीस’ यासारखी पूर्णपणे व्यावसायिक स्तरावर काम करणारी गुप्‍तचर संघटना स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. गुजरातमध्ये आम्ही `फोरेन्सिक सायन्स इंटेलिजन्स’ असे विद्यापीठ तयार करत आहोत. तसेच `रक्षाशक्‍ती’ या नावाने विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्याची व्यवस्थाही निर्माण करत असल्याचे त्यांनी सांगितले. (अशा प्रकारे दूरदृष्टी ठेवून राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने योजना आखण्याचा विचार देशातील एका तरी मुख्यमंत्र्याने केला आहे का ? – संपादक)

अमेरिकी लोकांनी भारताकडे `व्हिसा’ मागावा, असा भारत घडवण्याचे स्वप्न – नरेंद्र मोदी
मी कधीही अमेरिकेकडे `व्हिसा’ मागितलेला नाही. मी भारताला खूप मोठे बनवण्याचे स्वप्न पहाणारा व्यक्‍ती आहे. त्यामुळे मी अमेरिकेकडे व्हिसा मागण्याऐवजी देशालाच एवढे मोठे करीन की, अमेरिकन लोकांनी भारत पहाण्यासाठी आमच्याकडे व्हिसा मागावा, असे जाज्वल्य राष्ट्रप्रेमाचे विचार श्री. मोदी यांनी त्यांना अमेरिकेने दोन वेळा नाकारलेल्या `व्हिसा’वरील प्रश्‍नावर उत्तर देतांना काढले. (असा स्वाभिमान किती भारतीय राज्यकर्त्यांमध्ये आहे ? – संपादक)

Leave a Reply