ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांना झालेली अटक, हे काँग्रेस सरकारने केलेल्या अनेक पापांच्या शृंखलेतील महापाप आहे. औद्योगीकरणाच्या नावाखाली या सरकारने आतापर्यंत शेतकर्यांना नाडले व आता ते हिंदु संतांना छळत आहे. ह.भ.प. बंडातात्या यांच्यावर पोलिसांनी दरोडेखोरी, जाळपोळ यांसारखे गुन्हे दाखल केले, हे तर अगदीच भयंकर आहे. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात संतांची अशी अवहेलना केली जाते, हे महाराष्ट्रातील सश्रद्ध हिंदू कधीही खपवून घेणार नाहीत.
ह.भ.प. बंडातात्या यांची अटक हा केवळ वारकर्यांपुरता मर्यादित विषय नाही, तर समस्त हिंदूंना संताप आणणारे ते कुटील कारस्थान आहे. ते हाणून पाडण्यासाठी वारकर्यांनी उभारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात हिंदु जनजागृती समिती सर्व शक्तीनिशी ह.भ.प. बंडातात्या यांच्या मागे उभी आहे. संत तुकाराम महाराजांच्या तपश्चर्येचे ठिकाण असलेला भामचंद्र डोंगर तोडून त्या ठिकाणी महाप्रदूषणकारी `डाऊ’ प्रकल्प उभारण्यास समितीचा तीव्र विरोध आहे. `डाऊ’ ही रासायनिक कंपनी उभारण्यास ५३ देशांनी नकार दिला आहे. वास्तविक ही कंपनी अमेरिकेची; पण अमेरिकेनेही प्रदूषणाचे कारण देऊन `डाऊ’ला अमेरिकेत प्रयोगशाळा उभारण्यास नकार दिला. भोपाळमध्ये वायूगळतीमुळे हजारो लोकांचे प्राण घेणारा व लाखो लोकांना विकलांग करणारा `युनीयन कार्बाईड’ प्रकल्प `डाऊ’ने विकत घेतला आहे. तीन दशके होऊनही भोपाळ दुर्घटनेची तेथील लोकांची जखम आजही भळभळती आहे. प्रदूषण काय असते, हे भोपाळमधील जनतेने अनुभवले आहे. त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रात करण्याची पूर्वतयारी `डाऊ’च्या माध्यमातून सुरू असेल, तर ती राज्यकर्त्यांची वैचारिक दिवाळखोरी आहे. जगाने नाकारलेला संगणक कचरा व टाकाऊ वस्तू, भंगारात निघालेल्या जहाजांची प्रदूषणकारी विल्हेवाट, जगात कुठेही न चालणारी औषधे व आता जगाने नाकारलेले प्रदूषणकारी प्रकल्प, हे सर्व भारतात येतात. राज्यकर्त्यांच्या धोरणांमुळे भारत आज अक्षरश: `जागतिक उकीरडा’ बनला आहे. एरव्ही होळीला लाकूड जाळल्यावर `पर्यावरणाचा र्हास होतो’ असे म्हणणारे व श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे `पाणी प्रदूषित होते’ म्हणून शंख करणारे पर्यावरणवादी अशा प्रदूषणकारी प्रकल्पांना विरोध करण्यासाठी काहीही करत नाहीत. यासाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यासारखे संत काहीतरी कृती करतात, तर सरकार त्यांना धाकदपटशा दाखवून तुरुंगात टाकते. ही लोकशाही आहे कि हुकूमशाही ? `डाऊ’ प्रकल्प होऊ नये, यासाठी ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी सर्व सनदशीर मार्गांचा अवलंब केला; पण सरकारने त्यांच्या भावनांना जुमानले नाही. सरकार हिंदूंच्या भावनांचा आदर करत नाही, हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. हिंदूंची आंदोलने कशी असावीत, याचा आदर्श जम्मूतील हिंदूंनी अमरनाथ भूमी प्रश्नाच्या निमित्ताने आम्हा हिंदूंना घालून दिला आहे. `डाऊ’सारख्या संस्कृतीचा विध्वंस करणार्या उद्योगांना हाकलण्यासाठी हिंदूंनी अशाच संघटित शक्तीचा प्रत्यय सरकारला पुन्हा एकदा आणून देण्याची गरज आहे. काँग्रेस सरकार स्वत:ला लोकशाहीच्या मार्गाने चालणारे सरकार समजत असेल, तर रायगडमधील `सेझ’ प्रश्नावर जशी तेथील शेतकर्यांची मते जाणून घेतली, तसा `डाऊ’ प्रकल्पाच्या बाबतीतही वारकर्यांच्या भावनांचा आदर सरकारने केला पाहिजे, तसेच ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांच्यावरील सर्व आरोप मागे घेऊन त्यांची सन्मानाने मुक्तता केली पाहिजे, अन्यथा येत्या निवडणुकांत हिंदुरोषाच्या झंझावातात काँग्रेस सरकार पालापाचोळयाप्रमाणे उडून जाईल !


