कुलाबा येथे प्रदर्शन बंद पाडले
मुंबई, २१ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कुलाबा पोलीस ठाण्याच्या मदतीने कुलाबा येथील `म्युझीयम आर्ट गॅलरी’मध्ये भरवण्यात आलेले हिंदूंच्या देवतांची विटंबना करणारे प्रदर्शन बंद पाडले. `दी फाईन आर्ट’कडून `सिरॅमिक्स’ दगडापासून पादत्राणांच्या प्रतिकृती तयार करून त्यांवर रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.
(हिंदू मृतवत असल्यानेच कुणीही उठतो व त्यांच्या देवतांचा कसाही अवमान करतो ! – संपादक) या गॅलरीमध्ये दिल्ली येथील श्री. विनीत कक्कर या चित्रकाराचे `अ सोलो एक्झिबीशन ऑफ न्यू सिरॅमिक’ या विषयावर सोमवारपासून प्रदर्शन सुरू होते. यात `सिरॅमिक्स’ दगडाला रबरी सपातांसारखा आकार देण्यात आला होता. या सपातांवर भगवान शंकर, नटराज आदी देवतांची चित्रे रेखाटण्यात आली होती. असे पादत्राणांचे ७ जोड या ठिकाणी ठेवण्यात आले होते. (कलेच्या नावाखाली देवतांची विटंबना करणारे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! – संपादक) याची माहिती मनसेचे कुलाबा विभाग अध्यक्ष श्री. अरविंद गावडे यांना मिळाली. श्री. गावडे यांनी सिरॅमिक्सच्या सपातांवर रेखाटण्यात आलेल्या देवतांच्या चित्रांच्या संदर्भात कुलाबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे कलम २९५ (अ) अंतर्गत तक्रार करून ती चित्रे जप्त करण्यास भाग पाडले व प्रदर्शनही बंद पाडले. (धर्मरक्षणार्थ सनदशीर मार्गाने पोलिसांत तक्रार दाखल करून चित्रे जप्त करण्यास भाग पाडणार्या मनसेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक) या प्रकरणी `दी फाईन आर्ट’ या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवतांची विटंबना रोखणार्यांनाच अटक : पोलिसांची उफराटी भूमिका
`म्युझीयम आर्ट गॅलरी’च्या श्रीमती हिंदुजा यांनी श्री. गावडे यांना विरोध केला. श्रीमती हिंदुजा यांच्या तक्रारीवरून श्री. गावडे आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कलम ३४३ (घेराव घालणे) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी श्रीमती हिंदुजा यांना रात्रीच्या न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त केले, तर श्री. गावडे व त्यांचे सहकारी यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या काळात या कलादालनाने प्रदर्शनातील पोलिसांनी जप्त केलेली देवतांची चित्रे असणारी सातही पादत्राणे संकेतस्थळावर विक्रीस ठेवली होती. त्यांतील बरीचशी पादत्राणे विकली गेली असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेबाबत श्री. गावडे यांनी `दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले, “पोलिसांनी आमच्या विरोधात दाखल करून घेतलेली तक्रार हा अन्याय आहे. पोलिसांनी चित्रप्रदर्शन भरवण्यात आलेल्या `म्युझीयम आर्ट गॅलरी’च्या विरोधातही गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे प्रदर्शन भरवण्याचे धाडस त्यांना पुन्हा होणार नाही. हिंदूंच्या षंढपणामुळेच कोणीही देवतांची विटंबना करण्याचे धाडस करत आहे. प्रत्येक हिंदूने देवतांच्या होणार्या विटंबनेच्या विरोधात कृती करणे आवश्यक आहे.”



