मुंबई महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात चालते हिंदूंच्या धर्मांतरासाठी येशूची प्रार्थना !

धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांना रोखण्यासाठी धर्मांतरबंदीचा कायदा करण्यास सरकारला भाग पाडा !

मुंबई, २१ सप्टेंबर (वार्ता.) – विलेपार्ले (पू.) येथील मुंबई महानगरपालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात `जिझस क्रिस्ट ऑफ नाझारेथ मिनिस्ट्री’, मुंबई ख्रिस्ती मिशनरी यांच्यातर्फे काल येशूची प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.

 

(हिंदुत्ववादी शिवसेनेची सत्ता असणार्‍या महापालिकेच्या दीनानाथ नाट्यगृहात हिंदूंचे फसवून धर्मांतर करण्याचा ख्रिस्त्यांचा कुटील डाव सुरू आहे. शिवसेनेने हे थांबवावे, अशी हिंदूंची रास्त अपेक्षा आहे ! – संपादक) त्यामध्ये बहुतांश करून धर्मांतरीत झालेले तेलगु भाषिक हिंदू आणि धर्मांतरीत होण्याच्या मार्गावर असलेले तेलगु भाषिक हिंदु सहभागी झाले होते. पाद्री के. शामकिशोर यांच्या नेतृत्वाखाली ही प्रार्थना घेण्यात आली.या प्रार्थनेसाठी मोफत प्रवेश देण्यात येत होते. प्रार्थनेसाठी येणार्‍या भोळयाभाबड्या हिंदूंच्या हातात बायबलच्या तीन प्रती मोफत दिल्या जात होत्या. त्याचे वाचन करण्याचा आग्रह धरला जात होता. (हिंदूंनो, या हजारो हिंदूंना धर्मांतरापासून वाचवण्यासाठी आणि तुमचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धर्मशिक्षण घ्या आणि धर्मशिक्षण द्या ! – संपादक) प्रार्थनेसाठी सभागृहात आलेल्यांना पाद्री येशूचे गुणगान गाऊन त्यांना “येशूची प्रार्थना करा, त्याने सर्व सुख-दु:खे दूर होतील”, असे सांगत होते. बायबलमधील उतारे वाचून “आपण जर असाच धर्मप्रसार सुरू ठेवला तर सहा महिन्यांनी आपल्याला धनलाभ होतो”, असेही या वेळी सांगण्यात आले. (हिंदूंना धनाचे आमिष दाखवून धर्मांतर करण्याची ख्रिस्त्यांची ही चाल जुनीच आहे. हिंदूंनो, धर्मांतराच्या विरोधात राज्यात कडक कायदे करण्यास सरकारला भाग पाडा ! – संपादक) पाद्री बायबलमधील काही भाग इंग्रजी भाषेत वाचून दाखवत, त्यानंतर त्याचे हिंदी व तेलगु या दोन भाषांत भाषांतर करून सांगितले जात होते. दीनानाथ नाट्यगृह हे महापालिकेच्या मालकीचे आहे. या सभागृहात आणि विशेषत: विलेपार्ले या ठिकाणी ख्रिस्ती मिशनरी धर्मांतराचा उपक्रम राबवत आहेत. यामुळे महापालिकेच्या प्रतीही स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्‍त केला जात होता. येथे दर महिन्याला प्रार्थना आयोजित केली जाते. यापूर्वी १२ जुलै आणि ९ ऑगस्ट रोजी प्रार्थना आयोजित करण्यात आली होती.

  निगडीत वृत्त : धर्मांतराचे संकट

देवतांची विटंबना रोखण्याच्या चळवळीत मनसेची उडी !

कुलाबा येथे प्रदर्शन बंद पाडले

मुंबई, २१ सप्टेंबर (वार्ता.) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी कुलाबा पोलीस ठाण्याच्या मदतीने कुलाबा येथील `म्युझीयम आर्ट गॅलरी’मध्ये भरवण्यात आलेले हिंदूंच्या देवतांची विटंबना करणारे प्रदर्शन बंद पाडले. `दी फाईन आर्ट’कडून `सिरॅमिक्स’ दगडापासून पादत्राणांच्या प्रतिकृती तयार करून त्यांवर रेखाटलेली हिंदूंच्या देवतांची चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.

 

(हिंदू मृतवत असल्यानेच कुणीही उठतो व त्यांच्या देवतांचा कसाही अवमान करतो ! – संपादक) या गॅलरीमध्ये दिल्ली येथील श्री. विनीत कक्कर या चित्रकाराचे `अ सोलो एक्झिबीशन ऑफ न्यू सिरॅमिक’ या विषयावर सोमवारपासून प्रदर्शन सुरू होते. यात `सिरॅमिक्स’ दगडाला रबरी सपातांसारखा आकार देण्यात आला होता. या सपातांवर भगवान शंकर, नटराज आदी देवतांची चित्रे रेखाटण्यात आली होती. असे पादत्राणांचे ७ जोड या ठिकाणी ठेवण्यात आले होते. (कलेच्या नावाखाली देवतांची विटंबना करणारे हिंदूच हिंदु धर्माचे खरे वैरी होत ! – संपादक) याची माहिती मनसेचे कुलाबा विभाग अध्यक्ष श्री. अरविंद गावडे यांना मिळाली. श्री. गावडे यांनी सिरॅमिक्सच्या सपातांवर रेखाटण्यात आलेल्या देवतांच्या चित्रांच्या संदर्भात कुलाबा पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडे कलम २९५ (अ) अंतर्गत तक्रार करून ती चित्रे जप्‍त करण्यास भाग पाडले व प्रदर्शनही बंद पाडले. (धर्मरक्षणार्थ सनदशीर मार्गाने पोलिसांत तक्रार दाखल करून चित्रे जप्‍त करण्यास भाग पाडणार्‍या मनसेच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन ! – संपादक) या प्रकरणी `दी फाईन आर्ट’ या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवतांची विटंबना रोखणार्‍यांनाच अटक : पोलिसांची उफराटी भूमिका
`म्युझीयम आर्ट गॅलरी’च्या श्रीमती हिंदुजा यांनी श्री. गावडे यांना विरोध केला. श्रीमती हिंदुजा यांच्या तक्रारीवरून श्री. गावडे आणि त्यांचे सहकारी यांच्या विरोधात कलम ३४३ (घेराव घालणे) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी श्रीमती हिंदुजा यांना रात्रीच्या न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्यांना १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्‍त केले, तर श्री. गावडे व त्यांचे सहकारी यांना वैयक्‍तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. या काळात या कलादालनाने प्रदर्शनातील पोलिसांनी जप्‍त केलेली देवतांची चित्रे असणारी सातही पादत्राणे संकेतस्थळावर विक्रीस ठेवली होती. त्यांतील बरीचशी पादत्राणे विकली गेली असल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेबाबत श्री. गावडे यांनी `दैनिक सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीला सांगितले, “पोलिसांनी आमच्या विरोधात दाखल करून घेतलेली तक्रार हा अन्याय आहे. पोलिसांनी चित्रप्रदर्शन भरवण्यात आलेल्या `म्युझीयम आर्ट गॅलरी’च्या विरोधातही गुन्हा दाखल केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारचे प्रदर्शन भरवण्याचे धाडस त्यांना पुन्हा होणार नाही. हिंदूंच्या षंढपणामुळेच कोणीही देवतांची विटंबना करण्याचे धाडस करत आहे. प्रत्येक हिंदूने देवतांच्या होणार्‍या विटंबनेच्या विरोधात कृती करणे आवश्यक आहे.”

  निगडीत वृत्त : देवतांचे विडंबन रोखणारे धर्माभिमानी हिंदू