सलमानचा गणपति आणि फतवा

`दारूल उलूम हिजाजिया चिस्ती’ या मुंबईतील मुसलमानांच्या संघटनेने `चित्रपट अभिनेते सलमान खान, त्यांचे पिताजी पटकथाकार सलीम खान आणि त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्यावर इस्लाम धर्मियांनी सामाजिक बहिष्कार टाकावा’, असा फतवा काढला आहे. रविवारी संपलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवात या कुटुंबाने भाग घेतला, तसेच श्री गणेशाची मूर्ती वांद्रे येथील स्वत:च्या निवासस्थानी आणून तिची विधीवत पूजा केली, म्हणजे इस्लामविरोधी अक्षम्य आणि दंडनीय कृत्य केले, म्हणून त्याला वाळीत टाकण्याचे फर्मान निघाले आहे.

 

मुसलमान आई-बापाच्या पोटी जन्म घेतल्याने माणूस मुसलमान होत नाही, तर `अल्ला हा एकच देव आहे, कुराण धर्मग्रंथ आहे आणि महंमद पैगंबर हा एकच शेवटचा प्रेषित आहे’, हे जो इस्लाममधील धर्मगुरूंसमोर शपथेवर मान्य करतो, त्यालाच मुसलमान म्हणून जगण्याचा हक्क इस्लाम देतो. खरे म्हणजे त्यालाच जगण्याचा हक्क धर्मगुरु देतात; कारण मुसलमान आई-बापाच्या पोटी जन्म घेऊनही जो अल्लाव्यतिरिक्‍त दुसर्‍या देवाचे अस्तित्व मान्य करतो, तो जगण्याचा हक्क गमावतो. तेव्हा `दुसर्‍या देवाचे अस्तित्व मान्य करण्याचा सलमान खान यांच्या कुटुंबियांना हक्क आहे’, हे हिंदूंनी पुढे येऊन आग्रहाने आणि नि:संदिग्धपणे सांगितले नाही, तर श्री गणपतीची पूजा केल्यामुळे सलमान खान आणि त्यांचे कुटुंबीय यांना जगण्याचा हक्क पोहोचत नाही, हा इस्लामी धर्मगुरूंचा दावा हिंदूंनी अप्रत्यक्षपणे मान्य केल्यासारखे होईल. या फतव्यामुळे सर्वधर्मसमभावाचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. भारत सरकारचे धर्मविषयक अधिकृत धोरण `सेक्युलर’पणाचे म्हणजे धर्मनिरपेक्षतेचे आहे. तथापी भारत सरकारवर गांधी विचारांचा प्रभाव आहे. गांधी विचारांचे धर्मविषयक धोरण इस्लामला प्रतिष्ठा देणे, हे आहे; म्हणून धर्मनिरपेक्षतेऐवजी प्रत्यक्षात सर्वधर्मसमभावाचे धोरण सरकार राबवत आहे. धर्माच्या विषयात हिंदू अत्यंत उदासीन असल्यामुळे `या धोरणाच्या परिणामाचा विचार करावा’, अशी जागरूकता ते दाखवत नाहीत; पण आता इस्लामच्या धर्माचार्यांनी सर्वधर्मसमभाव हे धोरण त्यांना मान्य नाही, हे स्पष्ट करून गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. `हिंदी राष्ट्राची कल्पना आम्हाला मान्य नाही’, हे मुसलमानांनी १८८८ मध्ये स्पष्ट केले, तरी गांधी आणि नेहरू यांनी अट्टाहासाने हिंदी राष्ट्र निर्मितीचा प्रयोग चालू ठेवला. त्यातून देशाचे विभाजन झाले. सर्वधर्मसमभावाचे धोरण एकतर्फी चालू ठेवल्यास हिंदूंची शक्‍ती कमी होईल आणि परिणामी दुसरी फाळणी होईल; म्हणून धर्मनिरपेक्षतेचे धोरण जसे युरोपात आणि अमेरिकेत राबवतात, तसे राबवावे लागेल. भारतात हिंदूंच्या मनात भयापोटी इस्लामविषयी सहानुभूती आणि प्रेम निर्माण करण्याची आवश्यकता नसून मुसलमानांच्या मनात हिंदु धर्माविषयी आणि संस्कृतीविषयी प्रेम, आस्था आणि सहानुभूती निर्माण करण्याची आवश्यकता आहे. सलमानची गणपतिभक्‍ती हे बहिष्काराचे मुख्य कारण नाही, हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. महंमद अली जीना इस्लामच्या तत्त्वांचे काटेकोर पालन करत नसत. खरे म्हणजे ते कर्मकांडाविषयी अनभिज्ञ होते. ते नेते झाल्यावर पहिल्यांदा मशिदीत गेले तेव्हा बूट न काढताच आतपर्यंत गेले होते. `पादत्राणे बाहेर काढून या’, असे त्यांना सांगावे लागले. त्यांना डुकराचे मांस अतिशय प्रिय होते. उपाहारगृहात त्यांचा आवडता पदार्थ तोच असे. `तेव्हा एखादा मुसलमान कार्यकर्ता त्यांना भेटायला आला, तर ती `डीश’ झाकून ठेवतांना आमची तारांबळ उडत असे’, असे न्यामू छागलांनी लिहिले आहे. तरीही जीना हिंदूंचा आणि भारताचा द्वेष करू लागले तेव्हा मुसलमानांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले. सलमान आणि त्याचे कुटुंबीय हिंदूंचा द्वेष करत नाहीत, ही मुसलमान धर्माचार्यांची खरी पोटदुखी आहे; पण ती त्यांना दाखवता येत नाही. ही द्वेषभावना कमी करण्याचा मार्ग सर्वधर्मसमभाव नसून मुसलमानांना त्यांच्या मूळ परंपरांची जाणीव करून देणे, हा आहे.
- सुघोष

 |  मित्रांना पाठवा छापील प्रत

  निगडीत वृत्त : शरसंधान

Leave a Reply