मुंबई, ९ सप्टेंबर (वार्ता.) – सध्या गणेशोत्सव आला की, वर्षभर झोपी गेलेले पर्यावरणवादी जागे होतात आणि पर्यावरणाची हानी होत असल्याची आरोळी ठोकतात. यासाठी ते शासनालाही वेठीस धरतात. याद्वारे `गणेशोत्सव म्हणजे प्रदूषण’, असे समीकरण बनवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातो.
मुळात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होत असल्याची जी ओरड या तथाकथित पर्यावरणवाद्यांकडून केली जात आहे, ती निरर्थक असल्याचे महाराष्ट्र शासन, तसेच पर्यावरणतज्ञ यांच्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे सिद्ध झाले आहे. एवढेच नव्हे, तर मूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्यातील प्रदूषित घटक कमी होत असल्याची माहिती सामोरी आली आहे, असे प्रतिपादन संस्थेचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी आज `प्रेस क्लब’ येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केले.
या वेळी संस्थेचे श्री. सुरेश सावंत हेही उपस्थित होते. श्री. वर्तक पुढे म्हणाले, “राज्यभरात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन होणारे तलाव, नद्या व तत्सम ठिकाणे यांचा
विसर्जनापूर्वीचा पाण्याची प्रत, विसर्जनाच्या वेळची पाण्याची प्रत व विसर्जनानंतरची प्रत यांत प्रदूषणाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर बदल झाला नसल्याचे या माहितीद्वारे उघड झाले आहे. सर्वांत आश्चर्याची गोष्ट म्हणजे श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनानंतर प्रदूषित पाण्यातील प्रदूषणाचे घटक कमी झाल्याचे या माहितीतून सामोरे आले आहे. हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. श्री गणेश हा अष्टदिशांचा स्वामी आहे. या दिशांतून येणार्या रज-तम गुणांचे प्राबल्य कमी करणारी ही देवता आहे. अशा देवतेच्या उत्सवातून प्रदूषण होण्याऐवजी ते कमी होत आहे. असे असतांना तिच्याविरोधात प्रदूषणाच्या नावाखाली धर्मविसंगत गोष्टी करणार्या तथाकथित पर्यावरणवाद्यांनी याचा विचार केला पाहिजे.”
`सृष्टी इको रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेचे पर्यावरण अधिकारी श्री. अमित नरेगलकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी वैज्ञानिक श्री. जयेश रमेश वर्तक, पुणे येथील `ओअँसिस एन्व्हायर्न्मेंटल कन्स्ल्टंट्स’चे अध्यक्ष डॉ. विश्वंभर चौधरी व जलप्रदूषणाच्या विरोधात लढा देणारे पर्यावरणवादी श्री. अजय वैशंपायन यांनी मूर्तीविसर्जनामुळे प्रदूषण होत नसल्याचा निष्कर्ष अभ्यासाद्वारे मांडला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार प्लास्टर ऑफ पॅरीस हे `कॅल्शियम सल्फेट’पासून बनवले जाते. ते `अल्कलिक’ वा `अँसीडिक’ नसून `न्युट्रल’ असल्यामुळे पाण्यात विरघळल्याने कोणतीही हानीकारक प्रक्रिया घडत नाही, तसेच एकदा पाण्यात विरघळल्यानंतर त्याचा घट्टपणा व चिकटपणा उरत नाही. त्याची माती होते. त्यामुळे नदीच्या पात्रातील झर्यांची छिद्रे बुजण्याचाही प्रश्न येत नाही. उलट पाण्याच्या शुद्धीकरण प्रक्रियेत त्याचा
वापर केला जातो, असे श्री. वर्तक यांनी स्पष्ट केले. श्री. वर्तक यांनी कारखान्यांतून होणार्या प्रदूषणाच्या बाबत माहिती देतांना सांगितले, “देशातील एकूण कारखान्यांतील २२ टक्के कारखाने, म्हणजे ५३ हजारांपेक्षा अधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. यांतील ८ हजार कारखान्यांतून तीव्र स्वरूपाचे अतीदूषित पाणी, ८ हजारांमधून मध्यम दूषित पाणी, तर उर्वरित कारखान्यांतून कमी प्रमाणात दूषित पाणी, असे एकूण दररोज ८ लाख घनमीटरपेक्षा अधिक दूषित पाणी नदी व समुद्र यांत सोडले जाते. यामुळे वारंवार मोठे मासे व जलचर पाण्यात मरून पडल्याची सचित्र वृत्ते प्रसिद्ध होत असतात, तसेच नद्यांची गटारे झाल्याचेही निदर्शनास येते. या वर्षभर होणार्या जलप्रदूषणाच्या विरोधात हे पर्यावरणवादी कधी आवाज उठवतांना दिसत नाहीत. शासनाचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळही या प्रदूषणासंदर्भात काहीच कारवाई करत नाही; मात्र गणेशोत्सवातील मूर्तींमुळे न होणार्या प्रदूषणाबाबत सर्व जण बोलतात. इतर धर्मियांच्या, उदा. ताबूत व नाताळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर उपयोगात आणल्या जाणार्या `थर्माकोल’ व `प्लास्टीक’च्या साहित्यामधून होणार्या प्रदूषणाबाबत कोणीही बोलत नाही. केवळ हिंदु धर्मातील उत्सवावरच सातत्याने टीका करण्यात येते. टीकाकारांतील एक `महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ गणेशोत्सवात प्रदूषण टाळण्यासाठी श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करते. या धर्मद्रोही मोहिमेला सर्वांनी कडाडून विरोध करून आपल्या धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पाण्यातच करावे, असे विन्रम आवाहन सनातन संस्था करत आहे.”
क्षणचित्रे
* सनातन संस्थेने तयार केलेली श्री गणेशाची सात्त्विक मूर्ती येथे दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.
* सनातन संस्थेच्या बालसंस्कारवर्गातील साधक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गणेशोत्सवातील गैरप्रकारांच्या विरोधात प्रबोधन करणारी नाटिका या वेळी सादर केली. या नाटिकांचे आतापर्यंत १० शाळा व ४० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यांतून प्रयोग करण्यात आले आहेत. नाटिकेला गणेशभक्तांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाल्याचे साधक श्री. विश्वनाथ कुंटे यांनी सांगितले.
* पत्रकार परिषदेत पुढील वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या यांचे प्रतिनिधी उपस्थित होते -
दैनिक `नवाकाळ’, दैनिक `पुण्यनगरी’, `मुंबई लक्षद्वीप’, `तेजस्वी महाराष्ट्र’, `जनसमाचार’, `नूतन सबेरा’, `चक्र न्यूज’, `मुंबई न्यूज’, `एन्एा्एम्टीव्ही’
| मित्रांना पाठवा | छापील प्रत
निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मशिक्षण घ्या!



