।। श्री गणेशाय नम: ।।
वक्रतुंड महाकाय कोटीसूर्य समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।
अशी प्रार्थना घरोघरी गजाननाच्या पूजेला सुरुवात करण्यापूर्वी प्रत्येक ठिकाणी करतात; पण गणेशमूर्ती घरी आल्यापासून विसर्जनापर्यंत गजाननाच्या आराधनेसाठी / उपासनेसाठी काय केले जाते ?
घरगुती गणेशपूजनाला सध्या आलेले विकृत स्वरूप
१. गजाननाला घरी आणण्याच्या वेळी त्याच्यापुढे अचकट विचकट नाच केले जातात. सिनेमातील (चित्रपटातील) गाणी म्हणतात. एकमेकांच्या अंगावर गुलाल उधळतात आणि मग सार्वजनिक ठिकाणी किंवा घरोघरी मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
२. प्रतिष्ठापनेच्या वेळी पूजा सांगणारे गुरुजी रात्री एक वाजल्यापासून पूजकाच्या घरी जातात. २० मिनिटांत गणपतीची स्थापना केली जाते व गुरुजी आपल्या स्कूटरवरून (दुचाकीवरून) दुसर्या ठिकाणी जातात.
३. दिवसभर घरची मुले-बाळे सिनेमांतील (चित्रपटांतील) गाणी लावतात, कोणी पत्त्याचे डाव खेळतात, कोणी गप्पा मारतात. दुपारी एक वाजेपर्यंत घरोघरी हा कार्यक्रम चालतो. दुपारी उकडीचे मोदक, मसाले भात, निरनिराळया भाज्या यांचे सुग्रास भोजन पोटभर खाल्ले जाते व नंतर ३ तास झोप काढली जाते.
४. संध्याकाळी मित्र परिवार व नातेवाईक घरोघरी जातात. आल्याबरोबर घरचे मालक हसतमुखाने त्यांचे स्वागत करतात व येणार्या पाहुण्याला गणपतीचे दर्शन घेण्यास वाव न देता आल्याबरोबर विचारतात, “काय घेणार ? चहा घेणार, कॉफी घेणार का सरबत घेणार ?” पाहुणे स्थानापन्न झाले की, त्यांच्यासमोर घरात केलेले फराळाचे जिन्नस आणून ठेवले जातात. त्या वेळी गप्पा मारल्या जातात. त्यामध्ये `देशाचे राजकारण, एकमेकांची उणी-दुणी व कोण कोणत्या रोगाने आजारी आहेत व कोणाला रुग्णालयामध्ये ठेवले आहे’, असे विषय असतात. तास दोन तास या गप्पा मारल्यानंतर पाहुणे घरी निघाले की, त्यांच्या हातात प्रसाद ठेवला जातो आणि पाहुणे मंडळी एकीकडे घर मालकाचा निरोप घेतात व गजाननाकडे कटाक्ष टाकतात आणि एकमेकांना नमस्कार करून चालायला लागतात.
५. सायंकाळी आरती होते. त्या वेळी झांजांच्या स्वरामध्ये निरनिराळया देवतांच्या आरत्या म्हटल्या जातात आणि आरत्या म्हणण्याची चढाओढ लागते. एक-दीड तास आरती म्हणून गजर केला जातो, `मंगलमूर्ती मोरया.’
६. तोपर्यंत रात्रीचे १० वाजतात. घरची बायका मंडळी दिवसभरच्या गणपतीस येणार्या मंडळींचे स्वागत करून दमलेल्या असतात. त्यांना स्वयंपाक करायचा कंटाळा येतो. त्या मुगाच्या डाळीची खिचडी करतात व त्या दिवसाच्या परिश्रमातून मुक्त झाल्याचा सुस्कारा टाकतात.
७. प्रत्येकाला विचारले, `तुम्ही गजाननापुढे बसून श्री गणपति अथर्वशीर्षाचे किती पाठ केले ? गणपतिस्तोत्र किती म्हटले ? `ॐ गँ गणपतये नम: ।’ जप किती केला ? गजाननाचे लीलाचरित्र ज्या ग्रंथात समाविष्ट केले आहे, असे मुद्गल पुराण, चिंतामणी विजय यातील पठण काही केले का ? किंवा कोणा अधिकारी व्यक्तीकडून गजाननाच्या लीला ऐकल्या का’, तर याचे उत्तर `नाही’, असे येईल.
गणेशोत्सवाचे स्वीकृत स्वरूप – असा गणेशोत्सव साजरा करा !
लोकमान्य टिळक यांनी हा गणेशोत्सव सार्वजनिकरित्या प्रथम सुरू केला. त्या वेळी आपला देश पारतंत्र्यात होता. लोकांना आपल्या देशाबद्दल प्रेम वाटावे व परकियांच्या सत्तेविषयी खंत वाटावी, तसेच `आपल्या हिंदु धर्मातील लोक धर्मांतरित कसे केले जातात व त्यासाठी आपण काय करणे आवश्यक आहे’, याचा विचार हिंदूंनी करावा, यासाठी लोकमान्यांनी निरनिराळया विद्वानांची प्रवचने-व्याख्याने यांद्वारे हा विषय जनतेपुढे मांडला. `त्यासाठी नुसता विचार करून काही उपयोग नाही, तर ठोस कृती करणे आवश्यक आहे’, हे लोकांना पटवले. नुसते मोर्चे काढून निषेध करून काही उपयोग नाही. तसे केले, तर आपल्यातील मान्यवर व्यक्तींकडून परकीय सत्तेचा प्रत्यक्ष वापर आपल्या लोकांच्या विरुद्धच केला जातो.
१८५७ च्या स्वातंत्र्य समरात हे समर अयशस्वी ठरण्यास किती परकीय (अहिंदु) लोकांनी भाग घेतला होता ? सैन्यामध्ये आपलेच लोक होते कि नाही ? या आपल्या लोकांच्या अंगातील रक्त कसे उसळेल व परकियांना येथे रहाणे मुश्किल करता येईल, याचा प्रयत्न गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकमान्यांनी सुरू केला. गणेशोत्सवात मेळे असायचे. त्यातून देशभक्तीपर गीते मुलामुलींकडून म्हणवून घेत असत. कीर्तनकार अशा उत्सवांतून कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले अशांबद्दल वीरश्रीयुक्त शब्दांनी कीर्तन करत असत. पैशांची वारेमाप उधळपट्टी निष्कारण करत नसत.
सार्वजनिक गणेशोत्सव नव्हे, तर धांगडधिंगा !
सध्या जे उत्सव साजरे केले जातात ते किती विकृत स्वरूपात केले जातात, याचा विचार करण्याची वेळ आता नाही का आली ? सध्या उत्सव साजरे केले जातात, त्याला `उत्सव’ म्हणण्यापेक्षा `धांगडधिंगा’ हे नाव शोभेल. सध्या उत्सवामध्ये दररोज रात्री कोणता ना कोणता चित्रपट दाखवण्याची प्रथा पडून गेली आणि त्याला नाव `आम्ही गजाननापुढे ३ वाजेपर्यंत जागरण केले’; पण ते कसे जागरण केले हे न सांगण्याची खबरदारी घेतली जाते. मोठमोठ्या मूर्ती आणायच्या, आरास करावयाची, आरतीच्या वेळी फटाक्याची आतषबाजी करावयाची, यासाठी किती द्रव्य (पैसा) खर्च केले जाते, याचा विचार कोण करतो का ? म्हणजे गणेशोत्सव करण्याचा मुख्य उद्देश बाजूलाच रहातो.
गैरप्रकारांसंबंधी प्रबोधन करणार्या `सनातन प्रभात’चा प्रचार करा !
या सर्व गैरप्रकारांसंबंधी योग्य प्रबोधन करण्याचे कार्य फक्त `सनातन प्रभात’च करत असते. बाकीचे कुठलीही वृत्तपत्रे या कार्याबद्दल उदासीन आहेत; पण अशी एक म्हण आहे – `एकेनपी सुवृक्षेण पुष्पीतेन सुगंधिता, वासीतं तद्वनं सर्वं ।’, म्हणजे `सुगंधी पुष्प असलेल्या एका वृक्षानेही सर्व वन सुगंधित होते’, याप्रमाणे `सनातन प्रभात’ कार्य करत आहे. याचे जेवढे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे. `या पत्राचे वाचक किती आहेत’, याचा विचार करण्याची आवश्यकता नाही. एखाद्या फराळाच्या दुकानात तिखटामिठाचे पुष्कळ पदार्थ ठेवले जातात; पण त्याचे ग्राहक १० टक्केच असतात. तसेच बी.ए. (कला पदवीधर), बी.एस्.सी. (विज्ञान पदवीधर), बी.कॉम (वाणिज्य पदवीधर) वगैरे पदव्या घेणारे अनेक विद्यार्थी असतात; पण पीएच्.डी. पदवी घेणारे किती विद्यार्थी असतात ? असे असले, तरी विश्वविद्यालयाने पीएच्.डी. परीक्षा घ्यायचे बंद केले नाही. याप्रमाणे `सनातन प्रभात’चे वाचक किती आहेत, याचा विचार न करता, ते किती पचवतात, याचा विचार करणे आवश्यक आहे. `सनातन प्रभात’ भाराभर लिहीत नाही; पण जे लिखाण केले जाते, ते वेचक असते. या नियतकालिकाचे वाचन अधिक होणे आवश्यक नाही का ? तेव्हा गणेशोत्सवामध्ये या नियतकालिकाचा आपण सर्वांनी जर प्रचार केला, तर ती गणरायाची सेवा होणार नाही का ? तशी सेवा करण्याची बुद्धी श्री गजाननाने सर्वांना द्यावी, अशी
आमची प्रार्थना आहे.
- व.न. झुरळे (प.पू. झुरळे महाराज), डोंबिवली, जिल्हा ठाणे.


