मायावतींना निष्प्रभ करण्यासाठी दलितांच्या सर्व राजकीय संघटना आणि समाजवादी पक्ष यांच्यासमवेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती करणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. दलितांनी काँग्रेसशी युती केली, तर त्यांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यापुढे लाचार व्हावे लागेल आणि भारताचा विध्वंस होईल, असे डॉ. आंबेडकर सांगत; म्हणून काँग्रेसने खिळखिळा केलेला भारताचा राष्ट्रवाद सुदृढ करण्यासाठी दलितांनी युती न करता स्वत:ची संघटना मजबूत करावी !
या देशातील सर्वांत जुना आणि मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसचे विचार आणि भारतीय सैन्याचे विचार कधीच सारखे नसतात. काँग्रेस आणि पोलीसयंत्रणेचे विचार कधीही सारखे नसतात. काँग्रेस राज्यकर्ता पक्ष आहे. सैन्याकडे बाह्य आक्रमणांपासून आणि पोलिसांकडे देशांतर्गत विघटनकारी शत्रूंपासून देशाचे रक्षण करण्याचे दायित्व आहे. काँग्रेसच्या विशिष्ट विचारसरणीमुळे सैनिक आणि पोलीस यांना त्यांच्या कर्तव्याचे पालन करता येत नाही, हे गेल्या ६१ वर्षांत अनेक वेळा सिद्ध झाले आहे. `दहशतवाद्यांचे बाँबस्फोट न होता गणेशोत्सव सुखरूप कसा पार पडेल ?’, याची पोलिसांना काळजी आहे. काँग्रेसला काळजी `आगामी लोकसभा निवडणुकीत आपण कसे निवडून येऊ ?’, याची आहे. गणरायाचे आगमन झाले, त्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष श्री. शरद पवार यांची मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. मायावती काँग्रेसची मते खातात आणि काँग्रेसच्या सत्तेकडे जाणार्या वाटा त्यामुळे बंद होतात. मायावतींना निष्प्रभ करण्यासाठी नवे सामाजिक समीकरण साधण्याचे पवारांनी ठरवले आहे. दलितांच्या सर्व राजकीय संघटना आणि समाजवादी पक्ष यांच्यासमवेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती करणार असल्याची घोषणा पवारांनी केली आहे. पवारांना आपल्याशी युती करण्याचा हक्क आहे का, याचा विचार दलितांनी केला पाहिजे. समाजवादी पक्ष पाकिस्तानवादी आहे. बाँबस्फोट करणार्या सिमी संघटनेचे समर्थन हा पक्ष करतो. मुलायमसिंग यांची पाकिस्तानवरील जुनी वक्तव्ये पाहिली असता समाजवादी पक्षाच्या देशभक्तीविषयी संशय येतो. अशा पक्षाशी काँग्रेस युती करणार आहे, याचा अर्थ सत्तेवाचून काँग्रेसला कशाचेच सोयरसुतक नाही, असा होतो. म्हणजे दलितांविषयी काँग्रेसला प्रेम नसून सत्तेसाठी दलितांना वापरणे, एवढेच काँग्रेसला करायचे आहे.
वास्तविक भारताची राष्ट्रधारणा जशी वरिष्ठ वर्णांमुळे झाली आहे, तशी ती दलितांमुळेही झाली आहे. दलित आणि दूर्वा यांच्यात खूप साम्य आहे. सगळया पृथ्वीला दूर्वांचे आच्छादन आहे. तरीही सगळयांकडून सगळया ठिकाणी दूर्वा पायाखाली तुडवल्या जातात. दूर्वांइतके पददलित कोणीही नसेल. म्हणूनच श्री गणपतीने त्यांना डोक्यावर स्थान दिले. श्री गणपतीला दूर्वा प्रिय आहेत, म्हणजे दलितांचे हित प्रिय आहे. श्री गणपतीच्या सर्वांगावर दूर्वा वाहिलेल्या असतात, याचा अर्थ दलितांच्या हिताचा विचार सदैव त्याच्या डोक्यात असतो. गरिबांच्या हिताकडे तो सूक्ष्मदृष्टीने पहातो. शोषकांचे चित्कार ज्याच्या कानांना प्रथम ऐकू येतात आणि जो दलितांच्या हातात हात मिळवून चालतो, तो खरा राजाधिराज असतो. श्री गणपतीने एकदा अनल नावाच्या राक्षसाला गिळून टाकल्यावर त्याच्या पोटात भयंकर आग उत्पन्न झाली. ती दूर्वा खाल्ल्यावर शमली. दूर्वा ही अमृतासमान वनौषधी आहे. इस्लामी दहशतवाद्यांच्या बाँबस्फोटांनी भारतात जे जाळे पसरवले आहे, ते शमवण्यासाठी दलितांना शांत आणि समाधानी करून त्यांची संघटना बांधावी लागेल. दलितांना शांत आणि समाधानी करण्याचा विचार काँग्रेसच्या मनात येत नाही. दलितांनी काँग्रेसशी युती करायला आंबेडकरांचा विरोध होता. `दलितांनी काँग्रेसशी युती केली, तर त्यांना मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्यापुढे लाचार व्हावे लागेल आणि भारताचा विध्वंस होईल’, असे आंबेडकर सांगत; म्हणून दलितांनी काँग्रेसशी युती करण्याचा मोह टाळून स्वत:ची संघटना बांधून इस्लामी आतंकवाद्यांचा पाडाव करण्यात शक्ती एकवटली पाहिजे. काँग्रेसने भारताचा राष्ट्रवाद खिळखिळा केला. तो दलितांनी सुदृढ केला पाहिजे.
- सुघोष
| मित्रांना पाठवा | छापील प्रत
निगडीत वृत्त : शरसंधान
|



