शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांची देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट
Read More About : Appeals To ALL Hindu Voters!
शिवसेनेचे नेते, खासदार व दैनिक `सामना’चे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला आज दुपारी ३ वाजता सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातन आश्रमाचे प्रवक्ते श्री. अभय वर्तक यांनी त्यांना आश्रमातील विविध विभागांत चालणार्या सेवकार्याची माहिती दिली. या वेळी श्री. राऊत यांनी आश्रमातील ध्यानमंदिरात जाऊन देवतांचे दर्शन घेतले. तसेच आश्रमातील `दैनिक सनातन प्रभात’चे कार्यालय, धर्मप्रबोधनासाठी धर्मसत्संगाची निर्मिती करणारा ध्वनिचित्रीकरण विभाग व भव्य चित्रीकरण विभाग यांचीही पहाणी केली.
देवद (ता. पनवेल), ३१ ऑगस्ट (वार्ता.) – “सनातन संस्था शांतपणे हिंदुत्वाचे, सामाजिक व धर्माचे काम करत आहे. असे कार्य करणार्या सर्वच संस्थांना होणारा त्रास सनातननेही अनुभवला. विविध वृत्तपत्रांत आश्रम व तेथील साधक यांच्याविषयी आलेल्या उलटसुलट बातम्या वाचून माझे मन अस्वस्थ व्हायचे. त्यामुळे आश्रमाचे दर्शन घेऊन साधकांची चौकशी करण्यासाठी आज मी येथे आलो. आम्हीही अशा कित्येक प्रसंगांतून गेलेलो आहोत. गरज लागेल, त्या वेळी हाक मारा, शिवसेना व दैनिक `सामना’ तुमच्या पाठिशी आहे, असे आश्वासक उद्गार शिवसेनेचे नेते, खासदार व दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी आश्रमातील साधकांना मार्गदर्शन करतांना काढले. या वेळी अकोला येथील संत प.पू. परशराम पांडे महाराज यांच्या हस्ते खासदार श्री. राऊत यांचा शाल व श्रीफळ, तसेच सनातन संस्थेने प्रकाशित केलेले श्रीकृष्णार्जुनाचे छायाचित्र भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन `दैनिक सनातन प्रभात’चे मुख्य वार्ताहर श्री. अरविंद पानसरे यांनी केले. या वेळी आश्रमातील ६० हून अधिक साधक उपस्थित होते.
गंभीर विषयांकडे दुर्लक्ष करून सनातनची चौकशी करणे अयोग्य
खासदार श्री. राऊत पुढे म्हणाले की, हिंदुुहृदयसम्राट श्री. बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीपासून हिंदुत्वासाठी कृतीच्या स्तरावर प्रयत्न करण्याचा विचार आम्हा शिवसैनिकांना दिला. तुम्ही साधनेचे काम करत आहात. साधनेचे विचार समाजात घट्ट रूजवा. आपण सर्व जण `सनातन वृक्षा’चेच घटक आहोत. आम्हीही राजकीय हिंदुत्वाचे कार्य करत आहोत. आज गंभीर दखल घेण्याजोग्या कित्येक गोष्टी घडत असतांना सनातनची चौकशी करणे योग्य नाही. तुम्ही देव, देश व धर्म यांसाठीचे कार्य साधना म्हणून अखंडपणे करत रहा. त्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. या कार्यात काहीही व्यत्यय आल्यास शिवसेना नक्कीच मदत करील, असे कार्यक्रमाच्या शेवटी खासदार श्री. राऊत म्हणाले.
धर्मकार्य करण्यासाठी हिंदूंनी दुर्बलतेचा त्याग करावा – प.पू. पांडे महाराज
“श्री. राऊत यांनी आश्वासन देत हिंदुत्वासाठी आम्ही तयार असल्याचे सांगत आपल्याला आधार दिला आहे. जगात कोणाचेही राज्य येवो; मात्र राज्य करणार्याची वृत्ती चांगली नसेल, तर जनता समाधानी होऊच शकत नाही. त्यामुळे सनातन संस्थेचे संस्थापक प.पू. डॉ. आठवले यांनी साधकांना स्वत:तील दोष घालवण्यासाठी मार्गदर्शन केले. वृत्तीत बदल होण्यासाठी साधना अपरिहार्य आहे. ज्याची वृत्ती चांगली नाही, तो सत्तेवर आल्यास पक्षाचे किंवा जनतेचेही भले करू शकत नाही. हिंदूंनी आपल्यातील भयावहता व मानसिक दुर्बलता सोडली, तर धर्माचे कार्य करण्यासाठी कोणत्या
शस्त्राचीही आवश्यकता नाही, असे प.पू. पांडे महाराज या वेळी म्हणाले.
श्री. राऊत यांच्यातील नम्रता !
सत्कारानंतर खासदार श्री. संजय राऊत यांनी प.पू. पांडे महाराज यांना वाकून नम्रपणे नमस्कार केला. तसेच प.पू. पांडे महाराज यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी स्वत:हून ध्वनिक्षेपक सुरू करून दिला.




July 29, 2009 at 12:49 pm
Aai Bhavani Amha Sarva Hindu Dharmabhimanyanna Takat Deil Yasathi Yogya Pudhakar Sanatan Sanstha Karit Ahe.