जम्मू, २६ ऑगस्ट (प्रे.ट्र.) – काही पोलीस अधिकार्यांनी येथील निरपराध जनतेवर गोळीबार केला. त्यांची त्वरित बदली करण्यात यावी अन्यथा सरकारशी सुरू असलेल्या चर्चेतून माघार घेण्यात येईल, असा इशारा अमरनाथ संघर्ष समितीने दिला आहे. तीन दिवसांपूर्वी अमरनाथ संघर्ष समिती व राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांनी स्थापन केलेली समिती यांची बैठक पार पडली.
ही बैठक फलदायी झाल्याचे सांगण्यात आले होते. “जम्मूमधील पोलीस महानिरीक्षक श्री. राजेंद्र कुमार, जम्मूचे पोलीस अधीक्षक श्री. मनोहर सिंग व कटुआ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. एस्.पी. पानी यांची बदली झाल्याशिवाय सरकारशी पुढील चर्चा करणार नाही”, अशी भूमिका समितीने घेतली आहे. अमरनाथ देवस्थान मंडळाला भूमी परत द्यावी, यासाठी अमरनाथ संघर्ष समितीने आंदोलन छेडले आहे. आज सलग ५९ व्या दिवशी जम्मूमधील जनजीवन विस्कळीत राहिले. आज दुकाने व व्यापारी आस्थापने बंद राहिली. शहरातील वाहतूक ठप्प असल्यामुळे शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमधील उपस्थितीवर त्याचा परिणाम झाला. आज कटुआ जिल्ह्यातील परिस्थिती पूर्वपदावर आल्यामुळे तेथील संचारबंदी उठवण्यात आली. पूंछमध्ये जातीय दंगल भडकल्यामुळे तेथे गेले चार दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे. किश्तवारमध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येत आहे.
| मित्रांना पाठवा | छापील प्रत
निगडीत वृत्त : हिंदूंनो धर्मयोध्दे व्हा!
|


