कर्नाटकमधील भाजप सरकार व पोलीस यांचा पाठिंबा !

हिंदु जनजागृती समितीची गणेशोत्सव जनजागृती चळवळ

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्याकडून चळवळीला सकारात्मक प्रतिसाद !
बेंगळुरू, २३ ऑगस्ट (वार्ता.) – सार्वजनिक गणेशोत्सवात होणारे गैरप्रकार व विविध आकारांच्या अशास्त्रीय श्री गणेशमूर्तींची होणारी प्रतिष्ठापना यांच्याबाबत हिंदु जनजागृती समितीने गेली ५ वर्षे जनजागृती चळवळ राबवली आहे. समितीने यंदा मोठ्या प्रमाणात कर्नाटक राज्यात ही चळवळ आरंभली. समितीच्या या चळवळीला कर्नाटकमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि पोलीस यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.

नुकतीच हिंदु जनजागृती समितीच्या कुणीगल येथील सदस्या सौ. सरला मुनीराजी यांनी मुख्यमंत्री श्री. बी.एस्. येडीयुरप्पा यांची भेट घेतली व त्यांना समिती राबवत असलेल्या गणेशोत्सव जनजागृती चळवळीबद्दल माहिती दिली. या वेळी श्री. येडीयुरप्पा यांनी “लोकमान्य टिळक यांनी दूरदृष्टी ठेवून सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हा उत्सव सुरू करण्यामागील त्यांचा हेतू साध्य करण्याची वेळ आली आहे”, असे वक्‍तव्य केले. या प्रसंगी श्री. येडीयुरप्पा यांनी समितीच्या कार्याचा गौरव केला. समितीच्या सदस्यांनी श्री. येडीयुरप्पा यांना गणेशोत्सव जनजागृती चळवळीची माहिती देणारी ध्वनीचित्र-तबकडी व सनातनचे सात्त्विक श्री गणेशाचे चित्र भेट दिले. या बैठकीच्या वेळी अनेक मंत्री व आमदार यांनी ध्वनीचित्र-तबकडी व गणपति हा ग्रंथ खरेदी केला. या चळवळीद्वारे समिती श्री गणेशाबद्दल देत असलेल्या अमूल्य माहितीबद्दल त्यांनी आभार व्यक्‍त केले.

भाजपकडून समितीच्या जनजागृती चळवळीला कृतीशील पाठिंबा !
हिंदु जनजागृती समितीचे श्री. अरविंद बाळीगा यांनी भाजपच्या मुख्य कार्यालयात जाऊन प्रदेशाध्यक्ष श्री. संतोष यांची भेट घेतली व त्यांना समिती राबवत असलेल्या गणेशोत्सव चळवळीबद्दल माहिती दिली. या वेळी श्री. बाळीगा यांनी त्यांना चळवळीबद्दल माहिती देणार्‍या ध्वनीचित्र-तबकड्याही दाखवल्या. त्या पाहून श्री. संतोष प्रभावित झाले. “प्रदेश भाजपतर्फे या ध्वनीचित्र-तबकड्या प्रायोजित केल्या जातील”, असे आश्‍वासन त्यांनी दिले. या चळवळीची माहिती भाजपच्या जास्तीतजास्त कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी श्री. संतोष यांनी समितीच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या राज्यस्तरीय बैठकीत येण्याचे निमंत्रण दिले. या बैठकीस भाजपचे ३०० कार्यकर्ते, आमदार व मंत्री उपस्थित रहाणार असल्याचे त्यांनी सांगितले. “या चळवळीला प्रदेश भाजप पूर्ण पाठिंबा देईल”, असेही ते म्हणाले. प्रदेश बैठकीच्या वेळी श्री. संतोष यांनी पुढाकार घेऊन समितीसाठी विशेष `स्टॉल’चे आयोजन केले. या स्टॉलमध्ये ध्वनीचित्र-तबकड्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. श्री. संतोष यांनी `आदर्श गणेशोत्सवा’च्या ध्वनीचित्र-तबकड्यांच्या ५० प्रती स्वखर्चाने वितरित केल्या व आवश्यकता भासल्यास आणखी ध्वनीचित्र-तबकड्या घेणार असल्याचे सांगितले. प्रदेश बैठकीच्या वेळी त्यांनी धर्मशिक्षणाचे फ्लेक्सही जास्तीतजास्त लोक पहातील, अशा ठिकाणी लावण्याची परवानगी दिली. प्रदेश बैठकीचे आयोजन करण्यात श्री. संतोष व्यस्त होते. असे असतांनाही ते वेळात वेळ काढून समितीच्या स्टॉलच्या ठिकाणी येऊन कार्यकर्त्यांना मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल विचारत होते.

बेंगळुरूमध्ये पोलीसयंत्रणेकडून जनजागृती चळवळीस मोठ्या प्रमाणात हातभार !
११ ऑगस्ट रोजी बेंगळुरू शहराचे पोलीस आयुक्‍त श्री. शंकर बिद्री यांची हिंदु जनजागृती समितीच्या पाच सदस्यीय शिष्टमंडळाने भेट घेतली व त्यांना समितीच्या सार्वजनिक गणेशोत्सव जनजागृती चळवळीविषयी माहिती दिली. या वेळी शिष्टमंडळातील एक सदस्या सौ. पौर्णिमा प्रभू यांनी सार्वजनिक गणेशोत्सवात होणार्‍या गैरप्रकारांबाबत जनजागृती करणारी ध्वनीचित्र-तबकडी श्री. बिद्री यांना दाखवली, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यामागील लोकमान्य टिळकांचा उद्देश विशद केला. सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकारांबाबत जाणून घेतल्यानंतर श्री. बिद्री यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले व सर्व पोलीस ठाण्यांना या गैरप्रकारांबाबत आवश्यक कारवाई करण्याबाबतचे आदेशपत्र पाठवण्याचे आश्‍वासन दिले. त्यांनी तात्काळ याविषयी सर्व पोलीस उपायुक्‍तांना आदेश देणारे पत्र पाठवण्याबाबत अतिरिक्‍त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) श्री. एम्.आर्. पुजार यांना सूचना केली. त्यानुसार त्या संध्याकाळीच श्री. पुजार यांनी सर्व उपायुक्‍तांना सदर मुद्याविषयी सूचना पाठवली. `सार्वजनिक गणेशोत्सवात काय असावे व काय नसावे’, याविषयी सादर केलेल्या मुद्यांवर आपण लवकरच पत्रकार परिषद बोलावू, असे आश्‍वासन श्री. बिद्री यांनी समितीच्या शिष्टमंडळाला दिले.
२५ ऑगस्ट रोजी आदर्श हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या `आदर्श गणशोत्सव : कायदा व सुव्यवस्था’ या पत्रकार परिषदेला उपस्थित रहाण्याचे आश्‍वासन श्री. पुजार यांनी समितीला दिले आहे. पोलीस उपायुक्‍त (जनसंपर्क) श्री. रामय्या यांनी सोमवारी `सार्वजनिक गणेशोत्सवातील शिस्तपालन’ या विषयावर होणार्‍या पोलीस आयुक्‍तांच्या बैठकीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सनातन-निर्मित सात्त्विक श्री गणेशमूर्ती मागवली आहे. समितीच्या शिष्टमंडळाशी बोलतांना श्री. रामय्या म्हणाले, “मी कर्माने प्रखर हिंदुत्ववादी आहे. मी नेहमीच माझ्या कार्यालयातील टेबलवर भगवद्‌गीता बाळगतो. त्यामुळे काम करण्यास स्फूर्ती मिळते.” या वर्षी पोलीस `एक गाव एक गणपति’ ही संकल्पना राबवणार असून हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्‍नांमुळेच हा निर्णय घेतल्याचे पोलीस उपायुक्‍त श्री. गोचीनकट्टी यांनी सांगितले. येथील आयुक्‍तांच्या कार्यालयातून हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते बाहेर जात असतांना `संजीवनी’ या कन्नड दैनिकाचे वार्ताहर श्री. धनंजयप्पा यांनी त्यांना गाठून गणेशोत्सव जनजागृती चळवळीसंबंधी माहिती घेतली. तसेच दुसर्‍या दिवशीच या चळवळीविषयी बातमी प्रसिद्ध केली.

गणेशोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी पत्रकार परिषदेतून प्रबोधन !
सार्वजनिक गणेशोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने `प्रेस क्लब ऑफ बेंगळुरू’ येथे २२ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत ठेवण्यात आलेली सनातन-निर्मित श्री गणेशमूर्ती व श्री गणेशाचे सात्त्विक चित्र यांमुळे उपस्थित पत्रकार प्रभावित झाले.
श्री. सुरेश हेरूर यांनी उपस्थित पत्रकारांना लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यामागील दृष्टीकोन समजावून सांगितला व सद्यस्थितीत सार्वजनिक गणेशोत्सवात होणार्‍या गैरप्रकारांबाबत माहिती दिली. या वेळी `गणेश उत्सव’ ही कन्नड भाषेतील ध्वनीचित्र-तबकडी दाखवण्यात आली. या प्रसंगी सनातन-निर्मित श्री गणेशमूर्तीची वैशिष्ट्ये श्रीमती प्रभू यांनी सांगितली. सनातन-निर्मित श्री गणपतीचे चित्र व इतरत्र उपलब्ध चित्र यांचा प्रयोग उपस्थितांकडून करून घेण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सवात होणार्‍या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी सर्व पत्रकारांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. सुरेश यांनी केले. २६ ऑगस्ट रोजी बेंगळुरू येथील कॉर्ड रस्त्याच्या पश्चिमेला असलेल्या पद्मावती कल्याण मंडपामध्ये हिंदु जनजागृती समितीतर्फे साजर्‍या होणार्‍या आदर्श गणेशोत्सवाबाबतही पत्रकारांना माहिती देण्यात आली. पत्रकार परिषदेनंतर या चळवळीविषयी सविस्तर माहिती घेण्यासाठी `दी टाइम्स ऑफ इंडिया’, `डेक्कन हेराल्ड’, `उदयवाणी’ आणि `विजय कर्नाटक’ या वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी समितीच्या सदस्यांना संध्याकाळी परत दूरध्वनी केले. स्थानिक प्रसिद्धीमाध्यमांनी गणेशोत्सव मोहिमेला चांगली प्रसिद्धी दिली. येथील डेक्कन हेराल्ड, दी न्यू इंडियन एक्स्प्रेस, संजीवनी, प्रजावाणी, दी विजय कर्नाटक, संयुक्‍त कर्नाटक, दी टाइम्स ऑफ इंडियाची कन्नड आवृती व उदयनी या वृत्तपत्रांनी या चळवळीविषयी बातमी छापली.

जनतेचा प्रतिसाद
१. एनर्जी मॅनेजमेंट ग्रुपमधील श्री. सूद यांनी दूरध्वनी करून श्री गणेशमूर्तीसाठी नैसर्गिक रंग वापरावेत, या हिंदु जनजागृती समितीच्या सूचनेचे कौतुक करून समितीचे अभिनंदन केले, तसेच त्यांनी ज्या ठिकाणी मूर्तीविसर्जन केले जाते, त्या ठिकाणच्या लोकांना रासायनिक रंगांमुळे काय समस्या येतात, याविषयी माहिती दिली.
२. श्रीमती अनघा यांनी दूरध्वनीवरून त्यांच्यासाठी व त्यांच्या मित्रमैत्रिणींसाठी अशी श्री गणेशमूर्ती उपलब्ध होईल का, याविषयी दूरध्वनीवरून चौकशी केली.
३. श्री. शेषगिरी राव या ८० वर्षांच्या गृहस्थाने हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले व या विषयावर त्यांनी लिहिलेली काही माहिती पाठवण्याचे आश्‍वासन दिले, तसेच सायंकाळी परत दूरध्वनी करून त्यांनी आपण या मोहिमेसाठी काही देणगी देऊ शकतो का, अशी विचारणा केली.
४. येथील एक शिक्षक व पर्यावरणवादी श्री. उमाशंकर यांनी दूरध्वनी करून सांगितले, “बेंगळुरूपासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या बॅनरघाट्टा गावात जनजागृतीसाठी त्यांनी ३ हजार पत्रके छापण्याचे ठरवले आहे.” त्यांनी २० किलोमीटर अंतरावरून बेंगळुरू येथे येऊन या चळवळीसंबंधी पत्रके, श्री गणपतीचे छायाचित्र व ग्रंथ नेले, तसेच त्यांनी या गावात जनजागृती करण्यासाठी फेरी काढण्याकरता हिंदु जनजागृती समितीला निमंत्रित केले. श्री गणेशमूर्तींना दिल्या जाणार्‍या रासायनिक रंगांचा तळयातील पाण्यावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी श्री. उमाशंकर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने एक प्रकल्प हाती घेतला आहे.

| मित्रांना पाठवा | | छापील प्रत

निगडीत वृत्त : हिंदु जनजागृती समिती

Leave a Reply