श्री अमरनाथ यात्रेतील वाईट अनुभव !

श्री अमरनाथ देवस्थान येथे आषाढ पौर्णिमा ते श्रावण पौर्णिमा या काळात यात्रा भरते. फोंडा, गोवा येथे वास्तव्यास असणारे भाविक श्री. किरण कुलकर्णी यांनी यंदा या यात्रेत सहभागी झाले होते. त्यांना यात्रेच्या कालावधीत आलेले वाईट अनुभव हिंदूंना चीड आणणारे आहेत.

 

बालतल ते अमरनाथ यातील १६ कि.मी अंतराच्या प्रवासासाठी १० तास ताटकळावे लागले !
श्री अमरनाथ यात्रा पूर्वीपासूनच अतिशय असुरक्षित व अवघड आहे, असे ऐकले होते; पण त्याचा प्रत्यय या वेळी आला. आम्ही श्रीनगरहून पहाटे २ वाजता निघालो व सकाळी ६.१५ वाजता बालतल येथे आलो. बालतलहून १६ कि.मी.वर श्री अमरनाथची पवित्र गुहा आहे. आम्ही सकाळी ६.१५ पासून हेलीकॉप्टरसाठी रांगेत उभे होतो; पण आधीच लोकांनी हेलीकॉप्टरमधील जागा आरक्षित केल्या होत्या. त्यामुळे आम्हाला दुपारी ४.३० वाजताचे तिकीट मिळाले. यामध्ये कोणी तरी २०० तिकिटे गावच्या ओळखीच्या माणसाला दिली होती म्हणे. तेथे आम्हाला शिस्तीचा अभाव वाटला; परंतु उदार भाविकांनी आम्हाला तेथे चहा, बिस्कीटे, पराठे वगैरे दिल्याने संध्याकाळपर्यंत आम्ही टिकाव धरू शकलो.

हेलीकॉप्टरच्या ७ मिनिटांच्या प्रवासासाठी ३ हजार २०० रुपये भाडे !
संध्याकाळी ६ वाजता आम्ही हेलीकॉप्टरने अमरनाथ येथे पोहोचलो. बालतलहून अमरनाथ येथे हेलीकॉप्टरने पोहोचण्यासाठी ७ मिनिटे लागतात व त्यासाठी प्रत्येकी ३ हजार २०० रुपये भाडे आकारले जाते.

बेभरवशाचे हेलीकॉप्टर !
दर्शन घेवून हेलीकॉप्टरने परत जायचे; म्हणून आलो, तर ढगाळ वातावरणामुळे हेलीकॉप्टर आता येणार नाही, असे कळले. आता अमरनाथलाच मुक्काम करावा लागणार, हे समजले. आमच्यापैकी काही जण बालतल येथेच थांबले होते.

दानशूर हिंदूंचा यात्रेकरूंना आधार !
दानशूर हिंदूंनी अमरनाथ यात्रेकरूंसाठी वाटेत लंगर अर्थात भंडारे लावले आहेत. त्यात मोफत जेवण देण्यात येते. अमरनाथ येथे मुक्कामी थांबावे लागल्याने आम्ही लंगरमध्ये जेवण्यासाठी गेलो.

निवासी सुविधांचा अभाव !
अमरनाथ येथे मुक्कामी रहावे लागणार असल्याने व्यापार्‍यांकडून झोपडी (टेन्ट) भाड्याने घेतली. झोपडीसाठी १५० रुपये प्रत्येकी भाडे घेण्यात आले. झोपडीत काहीही सोय नव्हती. झोपण्यासाठी खाली प्लास्टिकचे कापड, त्यावर रजई आणि कमी व्होल्टेजमुळे एक मिणमिणता दिवा होता, तोही ११ वाजता बंद करण्यात आला. पिण्याचे पाणी किंवा इतर सोयी म्हणजे शौचालय वगैरे यांसाठी बाहेरच जावे लागत होते. जी शौचालये होती, ती अतिशय घाण होती. आम्ही दुसर्‍या दिवशी पहाटे ५.१५ वाजता अतिशय थंड पाण्याने चूळ भरून हेलीकॉप्टरच्या रांगेत येऊन उभे राहिलो; पण बालतल येथे गोळीबार झाल्याने हेलीकॉप्टर येणार नाही, असे समजले. मग आम्ही सकाळी १० वाजता घोड्यासाठी प्रत्येकी १२०० रुपये आणि डोलीसाठी प्रत्येकी ६ हजार रुपये भाडे देऊन खाली यायचे, असा निर्णय घेतला.
दरवर्षी अमरनाथ येथे एवढ्या मोठ्या संख्येने यात्री येतात; पण त्यांच्या मूलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत, याचे वाईट वाटले. काश्मीर सरकारतर्फे येथे वीज, निवासी खोल्या, गरम पाणी, सुलभ शौचालये इ. सोयी नक्कीच होऊ शकतील. एवढ्या अडचणी असूनही भाविक मोठ्या संख्येने येथे येतात, याचे कौतुक करावे, तेवढे थोडेच आहे !

 |  मित्रांना पाठवा |  5 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : भ्रष्टाचाराचा भस्मासूर

Leave a Reply