अहमदाबाद बाँबस्फोटांतील मुख्य सूत्रधाराला अटक

दहशतवाद्यांच्या अटकेची गुजरात पोलिसांनी दाखवलेली तत्परता, हे मोदी यांच्या नेतृत्वाचे प्रतीक !

 

* बाँबस्फोटांमागे सिमीच * १० दहशतवाद्यांना अटक * देशभरातील बाँबस्फोटांचे धागेदोरे उलगडणार

गुजरात पोलिसांना नेत्रदीपक यश !
अहमदाबाद, १६ ऑगस्ट (वृत्तसंस्था) २६ जुलै रोजी शहरात झालेल्या साखळी बाँबस्फोटांमागील प्रमुख सूत्रधाराला अटक करण्यात गुजरात पोलिसांना यश आले आहे. या बाँबस्फोटांमागे सिमी या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेचा हात असून सूत्रधार मुफ्ती अबू बशीर याला उत्तरप्रदेशातील आजमगढ येथे अटक करण्यात आली, अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक श्री. पी.सी. पांडे यांनी दिली.

गुजरात पोलिसांनी पत्रकार परिषद आयोजित करून याबाबत माहिती दिली. बशीर याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असून त्याला विशेष विमानाने गुजरातमध्ये आणण्यात येणार आहे. भारतात अनेक ठिकाणी बाँबस्फोट झाले; मात्र ते घडवून आणणार्‍या प्रमुख सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात पोलीस अयशस्वी ठरत असत. या वेळी प्रथमच बाँबस्फोट घडवून आणणार्‍या प्रमुख सूत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, असे श्री. पांडे म्हणाले. २६ जुलै रोजी अहमदाबादमध्ये १७ बाँबस्फोट झाले होते, तर दुसर्‍या दिवशी सुरत शहरात २४ बाँब सापडले होते.

बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी ४० दहशतवाद्यांना प्रशिक्षण
हे बाँबस्फोट घडवून आणण्यासाठी ४० दहशतवाद्यांना केरळमधील अरण्यामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. एप्रिल २००८ मध्ये हा कट रचण्यात आला. हे बाँबस्फोट घडवून आणण्यात सहभागी झालेले दहशतवादी हे केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात या राज्यांतील आहेत. अहमदाबादमध्ये घडवून आणलेले बाँबस्फोट हा पूर्वनियोजित कट होता. या बाँबस्फोटांसाठी आवश्यक असलेले सामान बाहेरून आणण्यात आले; मात्र बाँबची जोडणी गुजरातमध्ये करण्यात आली. बाँबस्फोटांचे नियोजन करण्यासाठी गुजरातमधील बडोदा, अहमदाबाद, सुरत व भरूच, तर केरळ व कर्नाटक या राज्यांतही दहशतवाद्यांनी बैठका घेतल्या. या प्रकरणात आतापर्यंत १०५ संशयितांची चौकशी करण्यात आली. सिमीच्या दहशतवादी तळांवर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देतांना त्यांचे नाव बदलले जाते. त्यामुळे एखादा दहशतवादी पकडला गेला, तरी त्या दहशतवाद्याला इतर दहशतवाद्यांचे खरे नाव माहीत नसते. या कारणामुळे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमार्फत इतर दहशतवाद्यांपर्यंत पोहोचणे कठीण जाते. त्यामुळे अहमदाबादमधील बाँबस्फोटांमागील खर्‍या सूत्रधारापर्यंत पोहोचणे, हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. दहशतवाद्यांना अटक करण्यासाठी महाराष्ट्र व राजस्थान या राज्यांतील पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी १ जण विप्रो या प्रसिद्ध कंपनीमध्ये अभियंता म्हणून काम करत होता.

अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा लष्कर- ए-तोयबाशी संबंध
आज अबु बशीर याच्या व्यतिरिक्‍त सिमीच्या १० दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यांपैकी २ दहशतवाद्यांचा पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याची माहिती श्री. पांडे यांनी दिली. बशीर हा आजमगढ येथील असून त्याला उत्तरप्रदेश व गुजरात या राज्यांतील पोलिसांच्या पथकांनी अटक केली. गुजरातमधील सिमीचे अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.

`इंडियन मुजाहिदीन’ म्हणजेच `सिमी’ असल्याचे उघड !
अहमदाबादमध्ये साखळी बाँबस्फोट घडवून आणण्याच्या आधी त्याबाबत `इंडियन मुजाहिदीन’ या दहशतवादी संघटनेने याबाबत वृत्तवाहिन्यांना ई-मेलद्वारे कळवले होते. चौकशीअंती सिमीचेच दुसरे नाव `इंडियन मुजाहिदीन’ आहे, असे उघडकीस आले आहे.

देशातील घातपाती कारवायांमागे सिमी
गुजरात, उत्तरप्रदेश, दिल्ली, जयपूर, महाराष्ट्र व हैद्राबाद येथे झालेल्या बाँबस्फोटांमागे सिमी या दहशतवादी संघटनेचा हात आहे, अशी माहिती श्री. पांडे यांनी दिली. “गुजरात पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर इतर राज्यांत झालेल्या बाँबस्फोटांचे धागेदोरे मिळू शकतील, असेही ते म्हणाले. (सिमीची पाठराखण करणारे राजदचे नेते व रेल्वेमंत्री श्री. लालूप्रसाद यादव व समाजवादी पक्षाचे श्री. मुलायमसिंग यांना याबाबत काय म्हणायचे आहे ? – संपादक)

केंद्र सरकारसाठी लज्जास्पद दिवस ! – भाजप
संयुक्‍त पुरोगामी आघाडी सरकारमधील घटकपक्ष असलेले राष्ट्रीय जनता दल, समाजवादी पक्ष व लोकजनशक्‍ती पक्ष यांचा सिमीला पाठिंबा आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या बाँबस्फोटांच्या मागे सिमीचा हात असल्याचे उघड झाल्यामुळे आजचा दिवस केंद्र सरकारसाठी लज्जास्पद आहे, असे वक्‍तव्य भाजपचे नेते श्री. अरुण जेटली यांनी केले. “सरकारच्या घटकपक्षांनीच सिमीला पाठिंबा दिल्यामुळे दहशतवाद निपटण्याच्या सरकारच्या धोरणांबाबत संशय निर्माण झाला आहे. गेली दोन वर्षे भारतात ठिकठिकाणी साखळी बाँबस्फोट होत आहेत; मात्र दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी सक्षम कायदे अस्तित्वात नसल्यामुळे या प्रकरणांचा तपास धिम्या गतीने होत आहे”, असेही श्री. जेटली म्हणाले.

देशाची सूत्रे मोदी यांच्याच हाती द्या !
देशभरात अनेक बाँबस्फोट झाले; पण सूत्रधारासह सर्व दहशतवाद्यांच्या मुसक्या बांधण्यात केवळ गुजरात पोलीस यशस्वी झाले, हे गुजरातचे कणखर मुख्यमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांचेच यश ! देश दहशतवाद मुक्‍त करण्यासाठी आता देशाची सूत्रे श्री. मोदी यांच्याच हाती द्या !

 |  मित्रांना पाठवा |  10 – वाचक संख्या |  छापील प्रत

  निगडीत वृत्त : दहशतवादाने पोखरलेला भारत

Leave a Reply