* १३ वर्षांत प्रथमच काश्मीर खोर्‍यात संचारबंदी * अमरनाथ प्रश्‍नावरील चर्चा निष्फळ

श्रीनगर/जम्मू, १२ ऑगस्ट (प्रे.ट्र.) – काल काश्मीरमधील मुसलमान त्यांचा माल पाकिस्तानमध्ये विक्री करण्यासाठी नेत असतांना पोलिसांनी त्यांना रोखले होते. त्या वेळी हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या गोळीबारात २ जण ठार झाले. त्यामध्ये हुरियतचे नेते शेख अब्दुल अझीझ यांचाही समावेश होता.

या घटनेचा निषेध करण्यासाठी मुसलमानांनी आज ठिकठिकाणी निदर्शने केली. हिंसक आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आज १२ जण ठार झाले. काश्मीर खोर्‍यातील वातावरण तंग झाल्यामुळे संचारबंदी लागू करण्यात आली. मागील १३ वर्षांत प्रथमच संपूर्ण काश्मीर राज्यात संचारबंदी लागू करण्याची ही पहिलीच वेळ आहे. जम्मूमधील किशत्वरमध्ये उसळलेल्या हिंसाचारात ३ जण ठार झाले व २० जण जखमी झाले. किशत्वर येथील हिदायल चौकामध्ये आज मुसलमान व हिंदू यांनी एकमेकांवर दगडफेक केली. हिंसक जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला. आज पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये बंदीपाड्यामध्ये १, श्रीनगरमधील लासजान, झूमनार, नागाबल, भागेमतहब व रैनावेरी येथे प्रत्येकी १ व अन्य ठिकाणी उसळलेल्या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ३ जण ठार झाले. आज श्रीनगरमध्ये सलग दुसर्‍या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आली.

अमरनाथ वादावर उपाययोजना काढण्यास सरकारचे शिष्टमंडळ अयशस्वी !
अमरनाथ मुद्यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय समिती स्थापन केली होती. ही समिती प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी आजही अयशस्वी ठरली. (हिंदूंचे हितसंबंध जेथे जोपासले जाणार आहेत तेथे लवकर निर्णय कधी शक्य आहे का ? – संपादक) आज केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तीन तास बैठक चालली. या बैठकीमध्ये सर्व सदस्यांनी वेगवेगळी मते मांडली व मुद्यावर सदस्यांचे एकमत झाले नाही. त्यामुळे आज या मुद्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी आज अमरनाथ संघर्ष समितीच्या सदस्यांना बैठकीसाठी निमंत्रित करण्याबाबत जोरदार मागणी केली. कालही झालेल्या बैठकीत निष्फळ चर्चा करण्यात आली. “अमरनाथ मुद्यावर जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करावी”, अशी मागणी भाजपचे नेते श्री. अरुण जेटली यांनी केली.

Leave a Reply